Skip to main content
x

पावटे, दादण्णा चिंतामणी

डी. सी. पावटे

     बेळगाव जिल्ह्यातल्या ममदापूर खेड्यातल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे दादण्णा चिंतामणी पावटे. आठव्या वर्षापर्यंत त्यांना शालेय शिक्षण मिळाले नाही. तरीही पुढे कोल्हापुरात वसतिगृहामध्ये वाढण्याचे काम करत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे केंब्रिजला जाऊन रँग्लर झाले. कर्नाटक विद्यापीठाचे ते १३ वर्षे कुलगुरूही होते. पंजाबचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले.

     ‘मी एक शिक्षण संचालक’ या त्यांच्या ग्रंथात एका संवेदनशील अधिकाऱ्याचे प्रांजल अनुभव कथन आहे, इतकेच नव्हे तर तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचे यथातथ्य चित्रण आहे. वयाच्या १९ व्या वर्षी दादण्णा त्यावेळची सहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी गिरिजा नाईक नावाच्या ८ वर्षाच्या मुलीबरोबर त्यांचे लग्न झाले. कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयामध्ये त्यांना मराठी भाषा शिकावी लागली.  मॅट्रिक परीक्षेत धारवाड केंद्रात ते पहिले आले आणि तेथे कर्नाटक महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेऊ लागले. शिष्यवृत्त्यांच्या आधारे दादण्णाचे शिक्षण होऊन १९२३ च्या बी. ए. परीक्षेत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व ऑगस्ट १९२४ मध्ये इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. ऑक्टोबरपर्यंत फ्रेंच शिकले. तिसऱ्या वर्षी दादण्णांनी ‘थिअरी ऑफ फंक्शन्स ऑफ रिअल व्हेरिएबल्स आणि इलेक्ट्रॉन थिअरी’ हा विषय घेऊन रँग्लर पदवी मिळवली. रँग्लर होऊन, जर्मनीत जाऊन जर्मन भाषा शिकून भारतात परतल्यावर पावटे यांना १५ जुलै १९२८ पासून बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. तेथे काही महिन्यातच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कॅलक्युलसचे पुस्तक तयार केले. तिथल्या पदवीदान समारंभात ‘तक्षशीला व नालंदा या प्राचीन विद्यापीठांची आठवण व्हावी असे वातावरण असे.’ बनारस विद्यापीठाप्रमाणे मुंबई शिक्षण खात्यात पहिल्या वर्गातील अधिकारी या पदावर त्यांची नेमणूक झाली. शिक्षणाधिकारी  हा शिक्षण प्रमुख असे. त्या वेळच्या मुंबई प्रांताची पाच भागात विभागणी होती. पावटे मध्य विभागाचे (पुणे) शिक्षणाधिकारी या पदावर १६ जून १९३० रोजी रुजू झाले. माध्यमिक शाळांबरोबर मुंबईतील अंध, मूकबधिरांच्या शाळा, सुधार शाळा, बालगृहे अशा विविध शाळांचीही त्यांना तपासणी करावी लागे. ‘अपंग मुलांच्या शाळांत मी खूप लक्ष घातले’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वाङ्मयाचे खूप वाचन करून प्राथमिक विभागाचा कारभार व त्यावरील सरकारी नियंत्रण यांचा बारकाईने अभ्यास केला. मोडी वाचनाची सवय केली. १९३०-३७ हा काळ त्यांच्या आयुष्यात कसोटीचा व फलदायी होता. अंदाजपत्रक तयार करून वर्षभर त्यानुसार खर्चावर नियंत्रण ठेवणे हे काम त्यांच्या जबाबदारीत अंतर्भूत होते. वर्षानुवर्षे वार्षिक अंदाजपत्रक ठराविक रकमेचेच असे.

      समाजातील मूठभर लोकांच्या हितापेक्षा संपूर्ण समाजाचे कल्याण हे उद्दिष्ट ठेवून धोरणाची पुनर्रचना, अभ्यासक्रमात सुधारणा, शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून तांत्रिक, शेती व्यापार, उद्योग यांच्या शिक्षणाची व्यवस्था, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षकांच्या व निरीक्षकांच्या नेमणुका, बदल्या इत्यादी विविध प्रश्‍न हाताळून त्यात सुसंगती व व्यवस्था निर्माण करण्याची कामगिरी पावटे यांनी विशेष परिश्रम घेऊन निःस्पृहपणे केली. जून १९३९ मध्ये पाठ्यपुस्तकांच्या प्रश्‍नावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पावटे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी व बिनसरकारी सदस्यांची समिती नेमली गेली.

     ‘विद्यार्थ्याची कृतज्ञता व प्रेम हेच शिक्षकाच्या व्यवसायातले फार मोठे पारितोषक होय’ अशी  पावटे यांची धारणा होती. त्यासोबत ‘चांगले शिक्षक म्हणजे शैक्षणिक पात्रता, शिकविण्यातील वाकबगारी व नैतिक दर्जा एवढेच नव्हे तर ते सुखी, समाधानी व सामाजिक कर्तव्याची जाणीव असणारे हवेत’ असा त्यांचा आग्रह होता. शाळा तपासनिसांच्या जागांवर सहायक उप शैक्षणिक निरीक्षक दर्जाच्या नव्या १०० जागा मंजूर करून घेऊन त्यावर ३० ते ३५ वयोमर्यादेतील उमेदवारांची नेमणूक करण्यास संमती मिळवली. खात्याची सर्व प्रकाशने, नियमावल्या अद्ययावत करून घेतल्या, आर्थिक वर्ष संपल्यावर ६ महिन्यातच खात्याचे अहवाल प्रसिद्ध झाले पाहिजेत असा दंडक घातला.

      २२ जून १९५४ ला शिक्षण संचालक पदावरून मुक्त होऊन पावटे कर्नाटक  विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रुजू झाले. कुलगुरू या पदावर सतत चार वेळा त्यांची निवड झाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारून संशोधनास उत्तेजन देणे, विद्यापीठ सरकार संबंध सुधारणे, जातीयवाद व गट यावर आधारलेली विद्यापीठातील गटबाजी मोडून काढणे, वाचनालय, प्रयोगशाळा, वर्ग, वसतिगृहे, शिक्षकांची निवासस्थाने आदि बांधण्याचा कार्यक्रम हाती घेणे, अशी विविध कामे केली. १९५६ मध्ये जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले. त्याच्या पुढच्याच वर्षी रॉकफेलर फौंडेशनच्या निमंत्रणावरून त्यांनी युरोप, अमेरिका व जपानमधील विद्यापीठांना भेटी दिल्या. १९६१ पासून पावटे विद्यापीठीय अनुदान मंडळाचे सदस्य होते.सामाजिक सेवेचा एक भाग म्हणजे शिक्षण अशी त्यांची धारणा असून ‘शिक्षक जर स्वार्थत्यागी, निष्ठावंत व देशभक्त असतील तर विद्यार्थीही होतील. तरुण मनावर शिक्षकाइतका कोणीही प्रभाव पाडू शकत नाही’ असे त्यांचे ठाम मत होते. पंजाबचे राज्यपालपदही पावटे यांनी भूषविले.

      - वि. ग. जोशी

पावटे, दादण्णा चिंतामणी