Skip to main content
x

पायगावकर, सुमती हरिश्चंद्र

     सुमती हरिश्चंद्र पायगावकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे सुमतीबाईंचे प्राथमिक शिक्षण प्रथम दिल्ली व नंतर इंदूर येथे झाले. शिक्षणाचे माध्यम उर्दू व हिंदी होते. इंदूर येथे माध्यमिक शिक्षण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालयात घेतले. बी.ए.बी.टी. ही पदवी संपादन करून त्या शिक्षिका झाल्या व नंतर शिक्षण-निरीक्षक पदावर कार्यरत असताना त्या सेवानिवृत्त झाल्या.

     शालेय काळात त्यांनी लेखन सुरू केले. त्यांची छोटी कादंबरी ‘सरोज’ प्रकाशित झाली. त्यानंतर त्या बालसाहित्याकडे वळल्या. इंग्रजी साहित्यात त्यांना रस होता. त्या भाषेतील बाल-वाङ्मयाने त्यांना आकर्षित केले. ‘देशोदेशींच्या कथा’ (१९९१) ह्या पुस्तकामध्ये त्या बाळगोपाळांना उद्देशून लिहितात, ‘या तुमच्यासाठी, तुम्हांला आवडतील अशा पद्धतीने मुद्दाम लिहून काढलेल्या आपल्या देशातल्या अन् परदेशातल्या काही छानदार कथा. निवडक म्हणजे काय? ज्या कथांत तुमच्यासारख्या चुणचुणीत नायकांनी काही विशेष केले आहे, किंवा ज्या कथांत नायकांच्या लक्षात आधीच आलेल्या काही विशेष गोष्टी अनुभवाने नंतर लक्षात आल्याचे सांगितले आहे; किंवा ज्या कथा अतिशय रम्य आहेत; अशांना मी निवडक कथा म्हणते.’

     केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी बक्षिसे देऊन गौरविलेली पुस्तके ‘उत्कृष्ट बालसाहित्य संच’ या मथळ्याखाली प्रकाशित झाली. ही पुस्तके त्यांतील आकर्षक व कथाप्रसंगानुरून चित्रांमुळे व मोहक मांडणीमुळे बालजगतात खूप लोकप्रिय झाली. गोष्टींची शीर्षकेच कुतूहलवर्धक आहेत.

     ‘स्वप्नरेखा’ भाग १, ‘चाफ्याची फुले’, ‘पोपटदादाचे लग्न’ ‘सोनपंखी’ भाग १, ‘रानगावची आगगाडी’; याखेरीज ‘यमाशी पैज’, ‘छोटा देवदूत’, ‘भुंगळे घर’ इत्यादी पुस्तके उल्लेखनीय आहेत. इंग्रजीतील पारंपरिक कथांचा त्यांनी सुटसुटीत, सुबोध शैलीत अनुवाद केला. मुलांसाठी लिहिणार्‍या मोजक्या लेखकांमध्ये सुमती पायगावकर यांचे स्थान आहे. 

     - वि. ग. जोशी

पायगावकर, सुमती हरिश्चंद्र