Skip to main content
x

पदमसी, अकबर

              धुनिक आणि उत्तर आधुनिक भारतीय चित्रकारांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार अकबर पदमसी यांचा जन्म मुंबई येथे १९२८ मध्ये झाला. त्यांचे पूर्वज पूर्वीचे काठियावाड आणि आजच्या गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यातील वाघानगर येथील होते. त्यांच्या आईचे नाव जेनाबाई. वडिलांचा व्यापार, व्यवसाय होता. मात्र पदमसी यांचा ओढा लहानपणापासून कलेकडे होता. लहानपणापासून त्यांना ‘दृश्य प्रतिमा’ आकर्षित करत असत. त्या वेळी आजच्यासारखी विपुल प्रमाणात पुस्तके किंवा मासिके उपलब्ध होत नसत. पण त्यांच्याकडे येणाऱ्या ‘इलस्ट्रेटेड वीकली’ या साप्ताहिकातील छायाचित्रांच्या नकला ते मन लावून करत. शिवाय त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या आयाच्या घरात राजा रविवर्मा यांची देव-देवतांची अनेक चित्रे होती. ती त्यांना भुरळ घालत. ती जणू त्यांना खेळण्यासारखीच वाटत.

              पदमसी यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर्स या धोबी तलावजवळील शाळेत झाले. त्या शाळेत त्यांना शिरसाट नावाचे चित्रकला शिक्षक होते. ते मूळचे मालवणचे होते. ते मधल्या सुट्टीमध्ये पदमसींना जलरंगात निसर्गचित्र रंगवून दाखवत. त्यांना आपल्या या विद्यार्थ्याला कला शिकायची आहे हे कळल्यावर त्यांच्याकडून शिरसाट सरांनी वस्तुचित्र व इतर विषयांची तयारी करून घेतली व त्याला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या एकदम दुसऱ्या वर्गाच्या परीक्षेसाठी बसण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे पदमसी परीक्षेला बसून उत्तीर्णही झाले. त्यांनी १९४८ मध्ये तिसऱ्या वर्गात प्रवेश घेऊन १९५१ मध्ये शिक्षण पूर्ण केले.

              जे.जे.मध्ये शिकत असताना तेथील ग्रंथालयात चायनीज व इजिप्शियन कलेवरील पुस्तके त्यांच्या हाती पडली. त्यांना त्याचा कलाविषयक ज्ञान व्यापक होण्यासाठी उपयोग झाला.

              कलाशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच १९५२ मध्ये त्यांची पॅरिसमध्ये दोन समूह-प्रदर्शने झाली. त्यांत त्यांच्याबरोबर रझा व सूझा हे चित्रकार होते. त्याच वर्षी त्यांच्या ‘वुमन विथ द बर्ड’ या चित्राला ‘जर्नेल-डी. आर्ट’ हा फ्रान्समधील पुरस्कार मिळाला, तर १९५३ मध्ये इंटरनॅशनल बिनाले, पॅरिस या प्रदर्शनात चित्र मांडण्याचा मान मिळाला. पुढील कारकिर्दीत त्यांना असे अनेक पुरस्कार मिळाले. १९५४ मध्ये त्यांचा प्रथम विवाह सोलांगे यांच्याशी झाला.

              हे सुरू असतानाच १९५४ मधील जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात काही चित्रे अश्लील आहेत या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. अर्थात, त्यांची नंतर जामिनावर सुटकाही झाली. या प्रदर्शनातील ‘द कपल’ या चित्रावर आक्षेप घेऊन एका सी.आय.डी. इन्स्पेक्टरने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. परंतु पदमसी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि हायकोर्टात निर्णय त्यांच्या बाजूने लागला. परंतु काहींना त्या बैलावर बसलेल्या स्त्री-पुरुषाच्या प्रतिमेचे शिव-पार्वतीशी साम्य वाटले. कलाकाराने आपली मते प्रामाणिकपणे मांडली पाहिजेत व प्रामाणिकपणे व्यक्त होत राहणे ही त्याची जबाबदारी आहे आणि त्यासाठी किंमत मोजायची तयारी ठेवली पाहिजे, असे पदमसी यांना कायमच वाटत राहिले. पण यामुळे समाजातील संकुचित कल्पना अधिक विस्तृत झाल्या व चित्रकारांना अंशत: का होईना, पण स्वातंत्र्य मिळाले.

              पदमसी १९६० च्या दशकात काही काळ दिल्लीमधील निजामुद्दीन भागात राहायला गेले. तिथे त्यांच्याशिवाय रामकुमार, तय्यब मेहता, हुसेन हेही राहत होते. त्यामुळे कलाक्षेत्राला तिकडे बराच वेग आला होता.

              आर्टिस्ट इन रेसिडेन्सी या कार्यक्रमांतर्गत १९६५-६७ या काळात पदमसी यांचे वास्तव्य अमेरिकेतील स्टाउथ स्टेट युनियन येथे होते. त्या काळाविषयी पदमसी फार उत्साहाने बोलतात. तेथील त्यांच्या विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक व्यावसायिक संस्थांच्या इमारतींसाठी ‘भित्तिचित्रे’ केली. त्यामुळे पदमसी यांची ‘कला ही समाजाचा भाग असते’ ही कल्पना प्रत्यक्षात उतरली.

              त्यांना १९६९ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली. त्याची रक्कम होती तीन लाख रुपये. त्यात तितकीच रक्कम स्वत: पदमसींनी टाकून एक कार्यशाळा आयोजित केली. ती म्हणजे ‘व्हिजन एक्स्चेंज वर्कशॉप’. त्यामुळे त्यांची प्रयोग करण्याची आकांक्षा सफल झाली. त्याचबरोबर अनेक चित्रपटनिर्माते व चित्रकारांना त्याचा फायदा झाला. या कार्यशाळेत पदमसींनी स्वत: ‘सिझीगी’ आणि ‘इव्हेंट इन अ क्लाउड चेंबर’ इराणी रेस्टॉरंटवर, ‘चेअर्स’ या लघुचित्रपटांची निर्मिती केली. मणी कौल यांनी ‘दुविधा’ व ‘पहेली’ (यांपैकी ‘दुविधा’मध्ये पदमसींची कन्या रामसा हिने अभिनय केला होता) तर कुमार सहानी यांनी मनोविश्‍लेषक डॉ. उदयन पटेल यांच्या संहितेवर केलेला ‘ऑब्सेशन’ अशी चित्रपटनिर्मिती केली. त्या कार्यशाळेमध्ये के.के. महाजन, छायाचित्रकार जहांगीर गझदर, निकी पदमसी (अकबर पदमसींचे बंधू) नवरोज कॉन्ट्रॅक्टर, तसेच आदील जसावाला, पिलू पोचखानवाला, नलिनी मालानी व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थीही सहभागी झाले होते.पदमसी अगदी सलगपणे नाही तरी पंधरा वर्षे देशाबाहेर राहिल्यानंतर मायदेशी परतले. तेव्हा त्यांना असे वाटत होते, की भारतात राहिल्यामुळे काम अधिक सकस होते. त्यांनी केवळ चित्रांची निर्मिती केली नाही, तर इतर अनेक माध्यमांतही काम केले, ते म्हणजे शिल्प, चित्रपटनिर्मिती, छायाचित्रण, एन्ग्रेव्हिंग, लिथोग्रफी, तसेच संगणक चित्रे. त्यांची विचारवंत, प्रयोगशील कलाकार अशी ओळख आहे.

              सुरुवातीला १९५०-५७ या काळात मानवाकृती, दैनंदिन जीवनातील साध्या वस्तू व निसर्ग अशा गोष्टींवर त्यांची चित्रे आधारित होती. त्यात त्यांचा पारंपरिक अर्थाने प्रतिमांचा वापर करणे एवढाच उद्देश नव्हता, तर व्यक्तिगत आशय त्यात आला पाहिजे असा हेतू होता. त्यांच्या चित्रांत मानवाकृती फिरून-फिरून येताना दिसतात. पण आधीच्या काळातील मानवाकृतींमध्ये रेषात्मक संरचना अधिक ठसठशीत दिसते, तर नंतरच्या काळातील मानवाकृतींमध्ये बाह्य रेषा असली तरी काही ठिकाणी ती पार्श्‍वभूमीत मिसळून गेलेली दिसते. पदमसींची १९५८-६० दरम्यानची चित्रे केवळ करड्या (कृष्ण-धवल) रंगात आहेत. त्याला ‘ग्रे-पीरिअड’ म्हणता येईल.

              पंडोल आर्ट गॅलरीत १९७२ मध्ये त्यांचे प्रदर्शन झाले. त्यातील चित्रे निसर्गदृश्यांवर आधारित होती. तिथे त्यांच्या ‘मेटास्केप’ या संकल्पनेचा जन्म झाला. त्यात वरकरणी भूभागाचे चित्र असले तरी संरचनात्मकदृष्ट्या ते निसर्गदृश्यापलीकडे घेऊन जाणारे आहे. त्यात एकांत-नीरव शांतता जाणवते.  १९८५ मध्ये पदमसींचा भानुमती यांच्याशी द्वितीय विवाह झाला.

              त्यांनी १९९४ मधल्या एकल प्रदर्शनात प्रथम ‘मिरर इमेजेस’ (आरशातील प्रतिबिंबासारख्या प्रतिमा) या संकल्पनेवर आधारित चित्रे काढली. त्यावर स्वत: पदमसी यांचे प्रतिपादन असे होते की, अशा चित्रात दोन भाग असले, सलग स्वतंत्र घटक असले तरी त्यातून एक सलग असा दृश्य अनुभव तयार होतो. ते स्थिर चित्र असले तरी त्यातील रंग विस्तारत आहेत व आकुंचन पावत आहेत, असा आभासात्मक दृश्य अनुभव येतो.

              त्यांनी २००० मधील काढलेल्या कॉम्प्युटर ग्रफिक्समध्ये नेहमीच्या कला निर्मितीतील ब्रश किंवा पेंटिंग नाइफ यांचे अस्तित्व दिसत नाही. ती चित्रे जणू आधुनिक तांत्रिक युगाचे प्रतिनिधित्व करतात.

              त्यांच्या २००२-२००३ काळातील ‘द टर्शरीज’ या प्रदर्शनात सैद्धान्तिक भूमिका होती ती अशी की, तृतीय (टर्शरी) स्तरावरील रंग कुठल्याही प्रकारचा प्रतिसादात्मक दृश्य परिणाम निर्माण करत नाहीत. (जसे पिवळा व जांभळा अथवा निळा व नारिंगी निर्माण करतात.) यातून पदमसी यांचा निष्कर्ष असा होता, की अंतिमत: रंगांच्या मिश्रणातून ‘उदासीन करडा रंग’ तयार होतो, जो निसर्ग- नियम दर्शवितो. हा नियम म्हणजे सर्व गोष्टी मूळ स्थितीकडे परत येतात. अर्थात जे जन्माला येते ते मृत पावते.

              पदमसी यांना संस्कृत भाषेत रस आहे. त्यामुळे ते श्री. गोडबोले यांच्याकडे संस्कृत शिकले व भारतीय साहित्य व तत्त्वज्ञान यांचा त्यांनी अभ्यासही केला. पदमसींनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘कालिदासाने ‘अभिजात शाकुंतल’मध्ये असे म्हटले आहे, की सूर्य व चंद्र हे कालाचे नियंत्रक आहेत, तर पाणी हे सर्व बीजांचे मूळ आहे. हे मला माहीत झाले नसते तर मी ते तीनही घटक एकाच चित्रात काढू शकलो नसतो.’

              अकबर पदमसी हे अनेक कलासंघटनांच्या समित्यांवर आहेत. त्यांपैकी भारतीय कला भवन, भोपाळ यासाठी कलाकृती संग्रहित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना ‘कालिदास सन्मान’, मध्यप्रदेश, (१९९७-९८), ‘ललित कला रत्न’ (२००४), ‘दयावती मोदी’ अवॉर्ड (२००७), ‘रूपधर’ बॉम्बे आर्ट सोसायटी, (२००८), ‘पद्मभूषण’ (२०१०) असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत,  

- दिलीप रानडे

पदमसी, अकबर