Skip to main content
x

पेडणेकर, मधुकर गंगाधर

पी. मधुकर

धुकर गंगाधर पेडणेकरांचा जन्म मुंबईत झाला. गोव्यातील पेडणे महालातील गाळी हे लहानसे गाव त्यांचे मूळ ठिकाण होते. १९ व्या शतकातले गोव्यातले सुप्रसिद्ध संगीतज्ञ मुरारबा पेडणेकर याच भागातले असल्याने त्यांची शिष्यशाखाही तिथे रुजली होती आणि त्याच परंपरेतील शंकरराव राजापूरकर ‘गुणिजन’ हे हार्मोनिअम वादक हे पेडणेकरांचे मामा होते. मामांकडूनच त्यांनी वादनाचे आरंभीचे धडे घेतले. तसेच बखलेबुवांच्या परंपरेतील मुंबईतील तेव्हाचे नामवंत हार्मोनिअम शिक्षक बहुलकर यांच्याकडेही ते शिकले. वयाच्या आठव्या वर्षीच ते वादनात निपुण झाले आणि इतक्या बालवयातच सवाई गंधर्वांसारख्या मातबर गवयाला त्यांनी साथ केली, त्याबद्दल त्यांना डॉ. कूर्तकोटींकडून सुवर्णपदकही मिळाले.
तत्कालीन ख्यातकीर्त हार्मोनिअम वादक, मराठी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक अण्णासाहेब माईणकर यांच्याकडे पेडणेकरांचे शिक्षण सुरू झाले. इथे पेडणेकरांची सर्वांगीण प्रगती झाली व सांगीत व्यक्तित्व घडले. माईणकरांच्या घरात अनेक उस्तादांचे येणे-जाणे असे. त्यामुळे पेडणेकरांना आग्रेवाले उ. फैयाजखाँ, बशीरखाँ, किराणावाले अब्दुल करीमखाँ, घम्मनखाँ, हाफीज अलीखाँ, इ. गायकांचा, बुंदूखाँ आणि कादरबक्ष अशा सारंगीवादकांचा, अहमदजान थिरकवा यांसारख्या तबलावादकांचा मनमुराद सहवास लाभला. अण्णासाहेबांच्याच शिफारशीनुसार पंजाबातील सक्कर येथील संगीत महोत्सवात पेडणेकरांनी पतियाळा घराण्याच्या आशिक अलीखाँसाहेबांना हार्मोनिअम संगत केली व त्यांच्याकडे सहा महिने राहून ते शिकलेही. किराणा घराण्याच्या बेहरेबुवांनाही त्यांनी गुरुस्थानी मानले होते व संगीतशास्त्रासाठी आचार्य बृहस्पतींचे मार्गदर्शन ते घेत.
एक उत्तम हार्मोनिअम वादक म्हणून १९३०च्या दशकात पेडणेकरांचा लौकिक होऊ लागला. वझेबुवा, गोविंदराव टेंबे, रातंजनकर इ. गुणिजनांनी त्यांना वाखाणले. १९३४ सालच्या सुमारास ते एच.एम.व्ही. कंपनीत वादक म्हणून नोकरीस होते, तसेच ओडियन, यंग इंडिया अशा ध्वनिमुद्रण कंपन्यांच्या अनेक ध्वनिमुद्रणांत वादक म्हणून पेडणेकर सहभागी झाले. ओंकारनाथ ठाकूर, रोशनआरा बेगम, शराफत हुसेनखाँ, बडे गुलाम अली, इंदूरवाले अमीरखाँ, सलामत - नजाकत अली, नियाज - फैयाज अहमद खाँ, कुमार गंधर्व अशा त्या काळच्या अत्यंत तयार गळ्याच्या अनेक गवयांना पेडणेकरांनी तोडीस तोड अशी साथसंगत केली. अत्यंत मुश्कील तानपलटा, लयकारी, बोलतानाही ते हुबेहूब वाजवत असत , जणू त्यांच्या साथसंगतीत ‘अशक्य’ असे काही नव्हतेच! कोणत्याही सांगीत आविष्काराचे अत्यंत जलदगतीने स्वरलेखन ते करू शकत.
पेडणेकरांचे हार्मोनिअम वादन हे हररंगी होते. विलंबित ख्यालाने सुरुवात करून अती द्रुतलयीतील गतकारी, मग ठुमरी, नाट्यगीते असा त्यांच्या एकल वादनाचा ढाचा होता. सतारीच्या बाजाचे ‘झालावादन’ व ‘दिर-दिर’ असे बोल असणार्‍या हार्मोनिअमसाठी बनवलेल्या ढंगदार गती हे पेडणेकरांचे हार्मोनिअम वादनात एक वैशिष्टय ठरले. ख्यालवादनात अत्यंत बिकट लयीचे विभ्रम ते निर्माण करत, तसेच नजाकतीने ठुमरीही वाजवत. गोविंदराव टेंबे यांनीही त्यांच्या वादनाबद्दल ‘अजब आणि तयारीचे वादन’ असे कौतुकोद्गार काढले होते. त्यांच्या एकल हार्मोनिअम वादनाच्या एच.एम.व्ही. कंपनीने काढलेल्या ध्वनिमुद्रिका त्या काळी लोकप्रिय होत्या. हार्मोनिअम या वाद्यात पेडणेकरांनी काही रचनात्मक बदल केले, स्वर जुळणीचेही विविध प्रयोग केले. वाजवले जाणारे स्वर दिसतील असा विद्युत्चलित दृश्यपटल हार्मोनिअमला जोडून त्यांनी एक अभिनव प्रयोग केला होता. मुळात पाश्चात्त्य असणारे क्ले-व्हायोलिन हे पट्टीफलक (की-बोर्ड) वाद्य भारतात त्यांनीच प्रथम मागवले व त्याचे वादन केले. पुढे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांच्या संगीतासाठी हे वाद्य वाजवले गेले. हार्मोनिअमला सतारीप्रमाणे तरफांच्या तारा लावून त्याद्वारे हार्मोनिअमच्या काहीशा एकेरी ध्वनिला गुंजन देण्याचा आणि मींड निर्माण करण्याचा प्रयत्नही ते अखेरच्या काळात करत होते.
अण्णासाहेबांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर पेडणेकरांनी अनेक चित्रगीतांच्या ध्वनिमुद्रणांसाठी ऑॅर्गन वाजवला. नंतर ते अण्णासाहेबांचे संगीत-साहाय्यकही झाले व वाद्यवृंदाचे संयोजन करू लागले. माईणकरांनी संगीत दिलेल्या ‘धर्मवीर’, ‘लपंडाव’, ‘प्रेमवीर’, ‘छाया’, ‘भक्त प्रल्हाद’ या मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पेडणेकरांनी संगीत साहायक म्हणून काम केले. तसेच ‘वकीलसाहेब’, ‘धर्मपत्नी’ या चित्रपटांना माईणकरांसमवेत संगीत दिले.
आपले गुरू माईणकर यांच्या १९४५ साली झालेल्या निधनामुळे पेडणेकर काहीसे सैरभैर झाले. तेव्हा ते गोव्यात गेले आणि पेडणे ते काणकोण भागात त्यांनी अनेक मैफिली केल्या, काही श्रीमंताकडे शिकवण्याही केल्या. पण त्या काळात गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता होती व त्या संकुचित वातावरणात त्यांचे मन न रमल्याने ते पुन्हा मुंबईला आले. या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीत एक स्वतंत्र संगीतकार म्हणून ‘चोखामेळा’ (१९४१), ‘चाळीतील शेजारी’ (१९५०) या मराठी बोलपटांना आणि ‘सावित्री’ या तेलगू चित्रपटांस संगीत दिले.
कल्पक, असामान्य बुद्धीमत्तेच्या मधुकर पेडणेकर यांचा स्वभाव कलंदर, मिश्कील, स्वाभिमानी, करारी होता. मुंबईतील ‘सूरसिंगार संसद‘सारख्या अनेक संगीत संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि अनेक सरकारी कार्यक्रम ते मध्यस्थीने यशस्वीपणे ठरवत असत. मुंबईतील मुगभाटात त्यांचे ‘तानसेन संगीत विद्यालय’ होते, तेथे त्यांनी अनेकांना संगीत शिकवले. त्यांची मोठी शिष्यशाखा असून अनंत केमकर, तुलसीदास बोरकर, विश्वनाथ पेंढारकर, चंद्रचूड वासुदेव, अनंत राणे हे त्यांचे नामवंत शिष्य होत. मुंबईत कुमार गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकांसाठी त्यांनी एच.एम.व्ही. कंपनीत साथ केली आणि या ध्वनिमुद्रणानंतर काही तासांनीच हृदयक्रिया बंद पडून पेडणेकरांचे अकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृतिनिमित्त त्यांचे शिष्य दरसाल एक संगीत सभा आयोजित करतात.

- चैतन्य कुंटे

पेडणेकर, मधुकर गंगाधर