Skip to main content
x

पेजे, शामराव लक्ष्मण

शामराव लक्ष्मण पेजे यांचा जन्म रत्नागिरी येथे एका गरीब कुणबी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती शिक्षणाला प्रतिकूल असूनही त्यांच्या आईने त्यांना आग्रहाने शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथेच झाले व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील तिल्लोरी कुणबी समाजातील पहिला पदवीधर म्हणून शामराव पेजे ओळखले जातात. पदवी मिळवताच शामराव पेजे यांना कलेक्टर दर्जाची नोकरी चालून आली. गरिबीचे चटके सहन केलेल्या व हलाखीच्या परिस्थितीला समोर गेलेल्या पेजे यांनी व्यक्तिगत सुखाचा मार्ग बाजूला ठेवून आपल्या समाजात सुधारणा घडवून आणण्याला प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांनी चालून आलेल्या नोकरीला नकार दिला व समाजसेवेचे व्रत स्वीकारले.

पेजे यांची सामाजिक बांधिलकी व त्यागवृत्ती पाहून काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी 1946 मध्ये त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर भरीव कार्य केले. नंतर ते 1952 साली मंडणगड-दापोली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्यानेही गरीब शेतकरी व कुणबी यांच्या वाट्याला दैन्य व दारिद्र्यच येते यांची खंत पेजे यांच्या मनात होती. या काळात त्यांनी कोकणात ‘खोत’ वर्गाच्या जमीनदारी वृत्तीचा मुळापासून, बीमोड करण्याचा प्रयत्न केला.

पेजे इंदिरा काँग्रेसच्या वतीने 1962 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. शामराव पेजे यांच्याबद्दल यशवंतराव यांनी आपल्या ‘कृष्णाकाठ’ या चरित्रात म्हटले आहे, ‘माझ्या जीवनात शामराव पेजे ही व्यक्ती अशी भेटली की, तिने वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्यापुढे कधीही हात पसरले नाही, तर सार्वजनिक हित साधतानासुद्धा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी मतलबाचा मनात चुकूनसुद्धा विचार केला नाही.’

- संपादित

पेजे, शामराव लक्ष्मण