Skip to main content
x

पेंडसे, गोविंद मोरेश्‍वर

आप्पा पेंडसे

     गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे यांचा जन्म बडोद्याजवळील व्यास गावी झाला. त्यामुळे गुजराती भाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही, म्हणून नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. ‘विविधवृत्त’, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याचबरोबर निर्माते दादासाहेब तोरणे, बाबूराव पै, पांडुरंग नाईक, मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर यांसारख्या नामवंत कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या व त्या प्रसिद्ध केल्या. नर्मविनोदी आणि तिरकस शैलीने त्यांनी विविधवृत्त साप्ताहिकातून चित्रपटांची परीक्षणे लिहिली. त्यांच्या लेखणीने चित्रपटांच्या परीक्षणात एक स्वतंत्र ठसा उमटला होता. त्यांची परीक्षणे त्या काळात खूपच गाजली होती. पुढे त्यांनी लोकसत्तामधून ‘एक्स्प्रेस टॉवर’वरून आणि महाराष्ट्र टाईम्समधून ‘हजरत सलाम घ्यावा’ अशा लोकप्रिय लेखमाला लिहिल्या.

आप्पा पेंडसे १९५८ सालात मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता. बाबूराव पै यांच्या ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात ते नायक म्हणून चमकले. तसेच ‘झंझावात’ आणि ‘जन्माची गाठ’ या चित्रपटांतही ते प्रमुख भूमिकेत होते.

आप्पा पेंडसे यांनी मुंबई दूरदर्शनवरून दादा साळवी, वनमाला, स्नेहप्रभा प्रधान इत्यादी चित्रपट कलावंताच्या मुलाखती घेतल्या. त्या प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे मुंबईत निधन झाले.

- द.भा. सामंत

पेंडसे, गोविंद मोरेश्‍वर