Skip to main content
x

पेंढारकर, बाबूराव गोपाळ

     राठी चित्रपटसृष्टीतील अतिशय हरहुन्नरी कलाकार म्हणून बाबूराव गोपाळ पेंढारकर यांचा उल्लेख करावा लागेल. कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करता करताच त्यांनी अभिनयात मोठी मजल मारली आणि चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाळराव, आईचे नाव होते राधाबाई. त्यांचे वडील कोल्हापूरमध्ये नावाजलेले डॉक्टर होते. मात्र बाबूरावांचे शिक्षण यथातथाच होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी पन्हाळ्याच्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून नोकरी केली. तेथे नोकरीत करत असतानाच त्यांचे लग्न झाले आणि ते कोल्हापूरला आले. काही काळ एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात त्यांनी कंपाऊंडर म्हणून नोकरी केली. नंतर बाबूराव पेंटर यांनी पेंढारकरांना महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करण्यासाठी बोलावून घेतले आणि तिथेच ‘सैरंध्री’ चित्रपटाद्वारे बाबूरावांनी अभिनयाचा श्रीगणेशा सुरू केला. ‘सैरंध्री’ चित्रपट त्या काळात खूप गाजला.

     महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव सुरुवातीला सेवक आणि नंतर व्यवस्थापक म्हणून काम करीत होते, त्या वेळी त्यांना १५ रुपये पगार मिळत होता. १९२३ साली पेंढारकरांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडली. काही काळ कॉर्पोरेशन कंपनीत काम केले. ‘प्रभावती’ नावाच्या एकाच चित्रपटात त्यांनी काम केले आणि डेक्कन कॉर्पोरेशन कंपनीही सोडली. पुढे भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि पार्श्‍वनाथ आळतेकर यांनी ‘वंदे मातरम’ कंपनीची स्थापना केली आणि ‘वंदे मातरम’ या मूकपटाची निर्मिती केली. हा चित्रपट चालला नाही आणि ‘वंदे मातरम’ कंपनी त्यामुळे बंद पडली.

     पुढे प्रभात कंपनीत बाबूराव नोकरीला लागले. ते व्यवस्थापक म्हणून काम करत असले तरी कंपनीतील सर्व प्रकारची कामे शिकून घेण्याचा निश्‍चय केला.  कंपनीतील पत्रव्यवहार, करारमदार करणे, चित्रपटासाठी लहानमोठे कलावंत निवडणे, अन्य कामगारांची व्यवस्था, चित्रीकरणाची तयारी अशा प्रकारची कामे बाबूराव करत होते. ‘बजरबट्टू’ या प्रभातच्या मूकपटात पेंढारकरांनी खलनायकाची भूमिका केली. ही भूमिका गाजली आणि उत्तम खलनायक म्हणून बाबूरावांचा लौकिक झाला. पुढे प्रभात फिल्म कंपनीत बाबूरावांनी कथानक, दिग्दर्शन, छायालेखन या क्षेत्रांचाही सूक्ष्मतेने अभ्यास केला. ‘जुलूम’, ‘अयोध्येचा राजा’, ‘जलती निशानी’, ‘अग्निकंकण’ अशा चित्रपटांत त्यांनी सुरुवातीच्या काळात खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यांची ‘सिंहगड’ चित्रपटातील ‘उदयभानू’ ही भूमिका जाणकार प्रेक्षकांकडून आणि टीकाकारांकडूनही गौरवली गेली. मात्र प्रभातच्या ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील ‘गंगानात’च्या भूमिकेनेच बाबूरावांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळून दिली. त्यांचे अस्थिर संघर्षमय जीवन संपून आर्थिकदृष्ट्याही स्थैर्य मिळाले.

     प्रभात कंपनीचे पुण्याला स्थलांतर झाल्यानंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये ते सामील झाले. या वेळी बाबूराव, भालजी, मा. विनायक आणि वासुदेव असे चारही बंधू एकत्र आले. ‘आकाशवाणी’, ‘विलासी ईश्‍वर’ असे चित्रपट कोल्हापूर सिनेटोनतर्फे निर्माण केले. त्यानंतर १९३६ साली ‘हंस पिक्चर्स’तर्फे ‘छाया’ चित्रपट प्रदर्शित झाला. बाबूरावांनी चित्रपटातील डॉ. अतुल ही खलनायकाची भूमिका साकारली. ‘छाया’ चित्रपटही गाजला. १९३९ साली हंस पिक्चर्सचा ‘देवता’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाबूराव पेंढारकरांनी प्रथमच नायकाची भूमिका केली आणि आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर ‘सुखाचा शोध’, ‘देवता’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘पहिला पाळणा’ अशा अनेक चित्रपटांत नायकाची व्यक्तिरेखा साकारली.

     वाढत्या वयाला लक्षात घेत त्यांनी चरित्र भूमिकाही प्रभावीपणे अभिनित केल्या. ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘ये रे माझ्या मागल्या’, ‘पुनवेची रात’, ‘कलगीतुरा’, ‘गाठ पडली ठका ठका’, ‘जगावेगळी गोष्ट’, ‘महात्मा फुले’, ‘देवघर’, ‘आम्रपाली‘, ‘बायको माहेरी जाते’, ‘थोरातांची कमळा’, ‘देव जागा आहे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘इथे मराठीचिये नगरी’ यासारख्या चित्रपटांतल्या चरित्र भूमिकाही त्यांनी मेहनतीने रंगवल्या आणि बाबूरावांना अभिनयाबरोबरच साहित्य, संगीताचीही जाण होती. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.भा. भावे, ग.दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते रमत असत. साहित्याचे वाचन अफाट होते. इंग्रजी शिक्षणही झाले होते.

      १९५१ साली रंगमंदिर नाट्यसंस्था स्थापन करून बाबूराव यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाचा प्रयोग केला. ‘सीमेवरून परत जा’ आणि ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या नाटकाचे बाबूराव पेंढारकर आणि बाळ कोल्हटकर हे सूत्रधार होते. त्यांनी भागीदारीत ‘दूर्वांची जुडी’ ही संस्था स्थापन केली आणि ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या नाटकाचे ५०० प्रयोग केले. कर्करोगाने कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र श्रीकांत पेंढारकर यांनी ‘बाबूराव नावाचे झुंबर’ हे त्यांच्या आठवणीचे पुस्तक प्रकाशित केले. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांचा अर्धपुतळाही उभारला गेला.

- स्नेहा अवसरीकर

संदर्भ
१) पेंढारकर बाबूराव, ‘चित्र आणि चरित्र’ व्हिनस प्रकाशन, पुणे; १९६१.
पेंढारकर, बाबूराव गोपाळ