पेंढारकर, भालचंद्र बापूराव
भालचंद्र बापूराव पेंढारकर यांचा जन्म दक्षिण हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील बापूराव हे सुप्रसिद्ध गायक-नट होते. भालचंद्र ऊर्फ अण्णांनी खूप शिकावे अशी बापूरावांची इच्छा होती. म्हणून त्यांनी अण्णांना नाटकापासून दूर ठेवले होते. परंतु, अण्णांचा नाटकाकडेच अधिक ओढा होता.
बापूरावांचे १५ मार्च १९३७ रोजी अकाली निधन झाले. गुरुवर्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचे ते गंडाबंध शिष्य होते. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १ जानेवारी १९०८ रोजी स्थापन केलेली ललितकलादर्श ही नाट्यसंस्था, आपल्या पश्चात सांभाळण्यासाठी त्यांनी मोठ्या विश्वासाने ती बापूरावांच्या हवाली केली आणि बापूरावांनीही ती नेटाने चालविली.
बापूरावांच्या मृत्यूमुळे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ललितकलादर्शची जबाबदारी भालचंद्र अण्णांच्या खांद्यावर आली. अण्णा १९३८ पासून वझेबुवांचे गंडाबंध शिष्य झाले.
वझेबुवांच्या कसदार गायकीची तालीम अण्णांना मिळाली आणि अण्णांनी अविश्रांत मेहनतीने ती आत्मसात केली. आपल्या वडिलोपार्जित नाट्यसंस्थेचा ठेवा जतन करण्याची आणि तो वाढविण्याची जिद्द मनात होतीच. म्हणूनच वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पाच वर्षांनी, १९४२ मध्ये ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाचा खेळ प्रेक्षकांसमोर सादर करून, त्यांनी ललितकलादर्शचे पुनरुज्जीवन केले. तसेच ललितकलादर्शने पूर्वी सादर केलेली इतरही जुनी नाटके त्यांनी रसिकांसमोर पुन्हा आणली आणि अल्पावधीतच ते एक यशस्वी गायक-नट म्हणून मान्यता पावले.
थोडा जम बसल्यावर, त्या वेळच्या इतर यशस्वी नाट्यसंस्थांमध्ये ललितकलादर्शला अग्रभागी आणण्याची प्रबळ इच्छा पेंढारकरांच्या मनात घोळू लागली. त्यासाठी ललितकलेच्या पुढच्या प्रवासात त्यांनी बदलत्या प्रवाहानुसार नवीन नाटककार, नवे संगीत, नवे नेपथ्य या सर्वांचा डोळसपणे अभ्यास केला.
त्यानंतर त्यांनी पु.भा.भावे, बाळ कोल्हटकर, विद्याधर गोखले अशा नाटककारांची ‘स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘मंदारमाला’, ‘बावनखणी’, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’, ‘रंगात रंगला श्रीरंग’,‘शाबास बीरबल शाबास’, ‘आनंदी गोपाळ’ इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली. नीळकंठ अभ्यंकर, यशवंत देव, वसंत देसाई अशा संगीतकारांनी या नाटकांना संगीत दिले. या सर्व नाटकांनी अमाप लोकप्रियता मिळवली.
अण्णांनी स्वत: ५२ नाटकांतून, ५५ भूमिका करण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर, मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोणत्या नाट्यसंस्थेने केला नसेल असा पराक्रम अण्णांनी करून दाखविला, तो म्हणजे आपली नाटक मंडळी साथीला घेऊन, वर्षभर संपूर्ण भारतात त्यांनी केलेला नाटकांचा दौरा. यांत मुंबई, वर्धा, जबलपूर, हैदराबाद, बंगलोर(बंगळुरू), मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकाता), इंदूर, भोपाळ, दिल्ली, अहमदाबाद, बडोदा अशा शहरांचा समावेश होता.
अण्णांनी साठ ते बासष्ट नव्या-जुन्या मराठी नाटकांचे संपूर्ण आणि निर्दोष असे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे.
त्याचबरोबर अनेक दुर्मिळ छायाचित्रे, ध्वनिफिती, वृत्तपत्रांतील कात्रणे, असा रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचा असा संग्रह करून ठेवला आहे.
अण्णांना ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार सुवर्णपदक (१९७३), नाट्यपरिषदेतर्फे ‘बालगंधर्व’ सुवर्णपदक पुरस्कार (१९८३), महाराष्ट्र शासनाचा ‘केशवराव भोसले’ पुरस्कार (१९९०), जागतिक मराठी परिषदेतर्फे इस्रायल येथे सत्कार (१९९६), संगीत नाटक अकादमी, दिल्ली, राष्ट्रीय पारितोषिक (२००४), चतुरंग, मुंबईतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार (२००६) असे विविध मानसन्मानही प्राप्त झाले आहेत. यवतमाळ येथे १९७५ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
पेंढारकर घराण्याच्या सलग तीन पिढ्या, मराठी संगीत रंगभूमीची सेवा करीत आहेत. त्यांचा संगीत नाटकाचा वारसा मुलगा ज्ञानेश व सून नीलाक्षी हे चालवत आहेत.