Skip to main content
x

पेंढारकर , यशवंत दिनकर

यशवंत

     कवी यशवंत पेंढरकर यांचा जन्म तारळे, ता. पाटण, जि. सातारा येथे झाला. लहानपण जवळच्याच चाफळ या समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गावात गेले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि साहित्यप्रेमीही होते. तत्कालीन प्रसिद्ध साहित्यिक आणि कादंबरीकार ह.ना.आपटे आणि सामाजिक कार्यकर्ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यांचे मित्र होते.

     गोपाळरावांनी त्यांची काही पुस्तके भेटीदाखल दिली होती. घरात ‘लोकमित्र’ आणि ‘मासिक मनोरंजन’ दरमहा येत असे. वडिलांचेही वाचनप्रेम, त्यामुळे यशवंतांनाही लहानपणापासून वाचनाची आवड आणि गोडी लागली. मात्र काही कारणांमुळे त्यांना मॅट्रिकपर्यंतही पोहोचता आले नाही. वडील लवकर मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतांनी स्कूल फायनलची परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना शिक्षण खात्यात नोकरी मिळाली. प्रारंभीचे एक वर्ष त्यांनी अलिबागला नोकरी केली व पुढे त्यांची पुणे येथे बदली झाली. परंतु, प्रकृतीने असहकार पुकारल्यामुळे त्यांनी १९४० साली नोकरी सोडून मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीच्या वेळी त्यांना दरमहा रु.८०/- पगार होता आणि सत्तावीस रुपये निवृत्तिवेतन मिळू लागले.

     यशवंत यांना शिक्षणानिमित्त काही काळ सांगली येथे राहावे लागले; त्या काळात सांगलीतील तत्कालीन ज्येष्ठ कवी साधुदास यांचा त्यांना सहवास, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली. इथेच त्यांच्यातला कवी जन्माला आला. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी ‘मित्रप्रेमरहस्य’ हे आपले पहिले काव्य प्रसिद्ध केले. या काळात त्यांनी यशवंत, दासानुदास, तारकानाथ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता पुण्याच्या ‘लोकसंग्रह’ या दैनिकात प्रसिद्ध होत. पुण्यात आल्यावर त्यांना व्यापक प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कविता वाचून ‘अनंततनय’ नावाचे प्रख्यात कवी पत्ता शोधीत यशवंतांना भेटायला आले. त्या वेळी पुण्यात ‘महाराष्ट्र शारदा मंडळ’ या नावाने काही तरुण कवी एकत्र येत आणि कवितांचे आदानप्रदान करून चर्चा करीत. अनंततनय यांनी यशवंतांना या गटात येण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान या मंडळातूनच काही नव्या तरुण कवींचा गट ‘रविकिरण मंडळ’ या नावाने निघून त्यांनी काव्यगायनास सुरुवात केली. त्या वेळचा तो अभिनव प्रकार साहित्य व काव्यरसिकांना फारच आवडला. त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम होऊ लागले.

     या मंडळात माधव जूलियन, गिरीश, श्री.बा.व सौ. मनोरमाबाई रानडे हे पति-पत्नी, दिवाकर (नाट्यछटाकार शं.का.गर्गे), द.ल.गोखले, ग.त्र्यं.माडखोलकर, वि.द.घाटे इत्यादींचा समावेश होता. यशवंत त्यात सामील झाले. ते त्या वेळी येरवड्याच्या रेफर्मेटरी स्कूलमध्ये नोकरीस होते. तिथल्या त्यांच्या घरीच सुरुवातीच्या काळात रविकिरण मंडळाच्या बैठका होत. दरम्यान त्यांचे ‘यशवंत’ हे नाव कवी म्हणून चांगलेच प्रसिद्धीस आल्यामुळे त्यांनी ते कायम ठेवले.

     रविकिरण मंडळाच्यावतीने या कवींची काही एकत्रित पुस्तके प्रसिद्ध झाली. काही कवींचे स्वतंत्र संग्रहही प्रसिद्ध झाले. या मंडळाच्या स्थापनेच्या दिवशीच म्हणजे ९ सप्टेंबर १९२३ रोजी मंडळाचे ‘किरण’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यात सात पुरुष आणि एक कवयित्री (सौ.मनोरमाबाई रानडे) होत्या. त्यामुळे सप्तर्षी आणि अरुंधती त्यांचे प्रतीक बनले. दिवाकर त्यातून लवकरच बाहेर पडले.

     रविकिरण मंडळाचे महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहासात स्वतंत्र स्थान आहे, यातील सर्व कवींनी मराठी कवितेला नवा चेहरा दिला. या मंडळाची अनेक पुस्तके गाजली. माधव जूलियन यांचे निधन (१९३९) झाल्यावर मंडळाची ताकद थोडी कमी झाली. दरम्यान अत्रे यांनी मंडळातील कवींच्या कवितांची विडंबने केली, ती ‘झेंडूची फुले’ या नावाने प्रसिद्ध झाली, मात्र मंडळाचा उत्साह कमी झाला नाही. मंडळाने १९६५मध्ये कवी गिरीश यांनी लिहिलेले माधवराव पटवर्धन यांचे ‘स्वप्नभूमी’ हे पन्नासावे आणि बहुधा शेवटचे पुस्तक प्रसिद्ध केले. मंडळात सर्वच मान्यवर कवी असले तरी पटवर्धनांनंतर कवी यशवंतांचा ठसा त्यावर ठसठशीतपणे उमटला. ‘बंदिशाळा, जयमंगल’ हे त्यांचे खंडकाव्यसंग्रह रसिकमान्य झाले. प्रसिद्ध टीकाकार श्री.के.क्षीरसागर यांनी, ‘गझल आणि खंडकाव्य ही रविकिरण मंडळाने मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे’, अशा शब्दांत मंडळाच्या कार्याचा गौरव केला होता. मंडळातील कवींच्या काव्याचा प्रभाव मर्ढेकरांवरही पडला होता.

     यशवंत यांचे ‘यशवंत’ (१९२१), ‘वीणाझंकार’ (१९२२), ‘भावमंथन’ (१९३०), ‘काव्यकिरीट’ (१९४१), ‘यशोगंध’ व ‘यशोनिधी’ (१९४१), ‘यशोगिरी’ (१९४६), ‘ओजस्विनी’ (१९४६), ‘पाणपोई’ (१९५१), ‘वाकळ’ (१९५६) हे काही उल्लेखनीय संग्रह होत. त्यांचे एकूण एकवीस काव्यसंग्रह असून ते सर्वच बहुधा रसिकमान्य झालेले आहेत. त्यांच्या काव्यगायनाने त्यांची कविता अधिकाधिक लोकप्रिय बनली.

     पूर्णतः केवलायवी आणि क्षणाक्षणाला नवता उत्पन्न करणारी शुद्ध सौंदर्यात्मक अनुभूती आजच्याप्रमाणे त्यांच्या काव्यात फारशी जाणवणार नाही हे खरे असले, तरी मराठी कवितेपुरता अभिजातवाद, वास्तववाद आणि सौंदर्यवाद यांचा संगम साधून मानवी जीवनातील सर्वस्पर्शी भावनांचा अन् कारुण्याचा त्यांनी मनःपूर्वक आविष्कार केला. ऐहिक निष्ठांचा स्वीकार करूनही त्यांची कविता दिव्यत्वाचा आणि पूर्णत्वाचा ध्यास घेणारी आहे, असेच म्हणता येईल. म्हणूनच एक आत्मनिष्ठ कवी संस्कृतीच्या संचिताचा प्रतिभाशाली भाष्यकार होऊ शकतो. यावर आपला विश्वास बसतो.” (म.सा.पत्रिका जाने-मार्च १९८६, पृ.१४)

     यशवंतांची कविता कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकतेची आहे. या वर्गाच्या आकांक्षा, त्यांचे देशप्रेम, त्यांच्या मर्यादा या सर्वांची जाणीव त्यांना होती. टीका म्हणून त्यांच्यावर केला जाणारा हा आरोप त्यांना मान्य होता. त्यांनी तसे म्हटल्याचे डॉ.भोसले यांनी उपरोल्लिखित लेखात स्पष्ट केले आहे. यशवंत हे भोसले यांना म्हणाले होते, ‘बदलत्या कवितेप्रमाणे पिंड व प्रवृत्ती नसताना नवी कविता करीत राहिलो असतो तर मी स्वतःशी व कवितेशी प्रतारणा तर केली असतीच; कातडे पांघरून वाघांच्या कळपात वावरल्याने वाघ होता येत नाही अन् स्वजातीलाही मुकावे लागते.’ (पूर्वोक्त : पृ.१२)

     यशवंत यांच्या नसानसांत देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम भरलेले होते. समर्थांच्या आणि शिवरायांच्या कर्मभूमीत त्यांचे बालपण गेले असल्याने या दोघांच्याही असामान्य कर्तृत्वाबद्दल त्यांच्या मनात प्रीती आणि भक्ती होती. ‘छत्रपती शिवराय’ या महाकाव्यात यशवंतांनी छत्रपतींची जी गौरवगाथा गायिली, ती असामान्यच होती. महाराजांच्या जीवनातील अनेक नाट्यमय प्रसंग त्यांनी त्यात अशा रीतीने गुंफले आहेत, की त्याला महाकाव्याबरोबर महानाट्याचाही दर्जा प्राप्त व्हावा. त्यांच्या एकूणच कवितेत राष्ट्रनिष्ठा, समाजाबद्दल प्रेम, कुटुंबवत्सलता, नात्यांची जपणूक, प्रेमाची उत्कटता आदी अनेक बाबी स्पष्ट होतात.

     बडोदा संस्थानाकडून त्यांना ‘राजकवी’ हा किताब १९४० साली मिळाला. १९५०सालच्या मुंबईस झालेल्या तेहेतिसाव्या साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र, नभोवाणी, नवकाव्य, अश्लीलता अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला होता. या भाषणात साहजिकच कवितेला प्राधान्य होते. ते म्हणाले, “विद्वत्तेशिवाय जीवित्वाला कणखरपणा नसला तर कवित्वाशिवाय त्याला शोभा नाही. किंबहुना, विद्वान जिथे हार खाईल, तिथे कवित्व बहार करील.” याच व्याख्यानात त्यांनी छंदोबद्ध कवितेचा जोरदार पुरस्कार करून मुक्तछंदावर टीका केली होती. १९६० साली ‘महाराष्ट्र’ हा स्वतंत्र मराठी भाषक प्रांत झाल्यावर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून त्यांचा गौरव करून त्यांना तहहयात मासिक रु. ५००/- पुरस्कार दिला. १९६१ साली त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. त्यांना इतरही मानसन्मान मिळाले.

     कवी म्हणून ख्यातनाम असलेल्या यशवंतांनी तेरा गद्य पुस्तके लिहिली असून त्यांतील ‘प्रापंचिक पत्रे’ व ‘समर्थ रामदास’ हे दोन ग्रंथ अभ्यास-व्यासंगपूर्ण आहेत. ‘कातिणीचे घर’ हा त्यांचा लघुनिबंधसंग्रहही वाचनीय आहे. बालकुमारांसाठीही त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चे संपादक म्हणून त्यांनी १९४७ ते १९५० या काळात काम केले. त्यांनी साहित्यशास्त्र, ग्रंथपरीक्षणे इ. लेखांना पत्रिकेत महत्त्वाचे स्थान देऊन पत्रिका सर्वसमावेशक केली. त्या काळात पत्रिकेचे स्वरूप ललित, वैचारिक, संशोधनपर असे बहुआयामी करण्यासाठी त्यांनी आपल्या संपादन कौशल्याचा वापर केला.

     यशवंतांच्या काव्यामागे नाट्यदृष्टी होती असा निष्कर्ष सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.आशा सावदेकर यांनी त्यांच्या ‘कवी यशवंत : एक आकलन’मध्ये काढलेला आहे. मराठी कवितेत ‘यशवंतपर्व’ होते हे मात्र खरे !

     - मधू नेने

पेंढारकर , यशवंत दिनकर