Skip to main content
x

पगडी, सेतुमाधवराव श्रीनिवासराव

     सेतुमाधवराव श्रीनिवासराव पगडी हे नाव थोडेसे कुतूहल जागविणारे. या वेगळ्या धाटणीच्या नावामुळे मनात औत्सुक्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मराठेशाहीच्या इतिहास लेखनाशी संबंधित अग्रक्रमाने येणाऱ्या नावांपैकी हे एक नाव. ज्ञानलालसा, प्रज्ञा, प्रतिभा यांचा सुरेख समन्वय सेतू माधवरावांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झाला आहे. रसाळ लिखाण, प्रभावी वक्तृत्व ही या इतिहासकाराची गुण-वैशिष्ट्ये होत. त्यांचे संपूर्ण आयुष्य सनदी नोकरीमध्ये गेले. मराठी, उर्दू, फारसी, गोंडी, कोलमी भाषांचे सेतू माधवरावांना आकर्षण होते. महाराष्ट्र संस्कृती, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्रातील धर्म, पंथ आदी विषयांचा त्यांचा व्यासंग होता. समर्थ संप्रदाय, सूफी संप्रदाय, शिवचरित्र, पेशवे-निजाम संबंध, मराठेशाहीच्या इतिहासाची फारसी साधने, मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध आदी त्यांच्या चिंतन, मनन, लेखन आणि संशोधनाचे विषय होते. उर्दू साहित्य, शेरो-शायरीविषयी त्यांना आकर्षण होते. त्यांच्यात उर्दू काव्यातील सौंदर्य आणि नजाकत टिपणारी संवेदनक्षमता होती.

     सेतुमाधवराव पगडी यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील निलंगा या तालुक्याच्या गावी झाला. निलंगा हा  निजाम राजवटीत बिदर जिल्ह्याचा भाग होता. त्यांचे शालेय शिक्षण गुलबर्गा आणि उस्मानाबाद येथे झाले. ते इ.स.१९२५ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण निजाम कॉलेज, हैदराबाद आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी इ.स.१९३० मध्ये बी.ए.ची पदवी पहिल्या वर्गात, पहिले येऊन प्राप्त केली. त्यांनी ‘रायचंडी प्रसाद’ सुवर्णपदक पटकाविले. इ.स. १९३२ मध्ये अलाहाबाद विश्वविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात, एम.ए.च्या वर्गात ते पहिल्या वर्गात पहिले आले. मार्च १९३३ मध्ये ते तहसीलदार पदावर नियुक्त झाले. त्यांनी मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, सचिव अशा विविध प्रशासकीय पदांची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव आणि ‘महाराष्ट्र जिल्हा गॅझेटिअर’चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यांनी मे १९५३ च्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या हैदराबाद येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी इतिहासाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथ आणि अनेक फारसी साधन ग्रंथांचे अनुवाद लिहून प्रसिद्ध केले. महाराष्ट्र आणि मराठे, इतिहासाचा मागोवा, शिवचरित्र: एक अभ्यास,  छत्रपती आणि त्यांची प्रभावळ, मराठे व निजाम, पानिपतचा संग्रम, मराठे व औरंगजेब, मोगल आणि मराठे, हिंदवी स्वराज्य आणि मोगल, छत्रपती शिवाजी (इंग्रजी ग्रंथ) अशी इतिहासाशी संबंधित त्यांची ग्रंथसंपदा आहे. याव्यतिरिक्त समर्थ संप्रदाय, भारतीय मुसलमान, वरंगलचा इतिहास, हैदराबाद स्वातंत्र्य चळवळ, काश्मीर व पाकिस्तानविषयक विचार, आदिवासी जीवन, उर्दू-ग़ज़ल इत्यादी विविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. एकूण सेतुमाधवराव पगडी बहुआयामी, बहुप्रसवी आणि रसीले लेखक होते. डिसेंबर १९६९मध्ये त्यांनी ‘जीवनसेतू’ नावाचे आत्मचरित्र लिहून प्रसिद्ध केले.

     ‘शिवचरित्र: एक अभ्यास’ या पुस्तकामध्ये इतिहास लेखकाविषयीची आपली संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. इतिहास लेखक कोण आहे, हा कोणत्या वातावरणात वाढला आहे, याच्यावर संस्कार कोणते झाले आहेत, कोणत्या गोेष्टींनी याला आनंद वाटतो आणि कोणत्या गोष्टीचे दु:ख होते, कोणत्या गोष्टी तो अनुल्लेखनाचेे टाळतो आणि कोणत्या आवर्जून लिहितो, या पद्धतीने कोणत्याही इतिहास ग्रंथाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी सेतुमाधवरावांची आहे.

     इतिहासलेखनशास्त्राच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत सयुक्तिक आहे. कारण, इतिहास लेखकाचा दृष्टीकोन, त्याच्या भाव-भावना अभिनिवेशात रूपांतरित होतात. समकालीन इतिहास लेखकाच्या बाबतीत ही संभाव्यता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. शिवचरित्रातील अनेक घटना अशक्यप्राय वाटतात आणि म्हणून मग समकालीन इतिहासकारांना हे सर्व चमत्कार वाटतात. परमानंदासारखा शिवपूजक शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार मानतो. इतिहासात अनेक घटनांना दैवी रूप प्राप्त होते. इतिहास लेखनातील या धोक्यांच्या जागी छाननी आणि चिकित्सा आवश्यक असते. ही पगडी यांची इतिहासलेखन विषयक भूमिका इतिहासशास्त्राच्या तत्त्वांना अनुसरूनच आहे.

     शिवचरित्राविषयीचे पगडी यांचे विचार समजून घेण्यासारखे आहेत. शिवाजी महाराजांची अनेक चरित्रे इंग्रजी आणि मराठीमधून आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. या प्रत्येक लेखकाचा शिवचरित्र विषयक दृष्टिकोन वेगळा असल्याचे जाणवते. त्यातही आपल्याकडे इतिहासाविषयीचे आकर्षण कमालीचे असले, तरी इतिहास समजून घेण्यासाठी इतिहास ग्रंथांचे वाचन न करता, नाटक, कथा, कादंबऱ्यांच्या वाचनाकडे अधिक ओढा आहे. या माध्यमातूनच लोक इतिहास समजून घेतात. या संदर्भात पगडी यांची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. हे सर्व लिखाण म्हणजे इतिहास नव्हे व त्यांचे लेखक म्हणजे इतिहासकार नव्हेत असे निखळ सत्य त्यांनी नमूद केले आहे. या बाबतीत ते पुढे असे म्हणतात, की शिवाजी महाराजांच्या चरित्राचा शोध घेताना तत्कालीन लेखकांनी आपापला दृष्टीकोन स्वीकारून घटना व प्रसंग यांचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे शिवचरित्रावर भाविकतेने चमत्काराची अथवा श्रद्धेने जी पुटे चढवली गेली आहेत, ती दूर करून शिवाजी महाराजांचे तेजस्वी आणि स्वयंभू चरित्र पाहिले पाहिजे.

     शिवाजीराजे महाराष्ट्राच्या आदराचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहेतच. म्हणून जदूनाथ सरकारांच्या शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली. जगभर जे चरित्र गाजले, ज्या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, तो ग्रंथ मात्र महाराष्ट्रीय मनाला भावला नाही. सेतू माधवराव पगडी शिवचरित्र लेखनात शिवाजी महाराजांच्या तत्कालीन प्रेरणांचा बौद्धिक अन्वयार्थ लावला पाहिजे, अशी रास्त भूमिका घेतात. शिवचरित्रात असे अनेक प्रसंग आहेत, ज्यांविषयी इतिहासकार मुग्धता बाळगून आहेत हे आवर्जून लिहितात. पगडी यांच्या शिवचरित्र लेखनामुळे सर्वसामान्य इतिहास वाचकांच्या समजुतीवर चढलेली पुटे ऐतिहासिक सत्यान्वेषण करून ते दूर करतात. इतिहासातील कल्पितांना इथे थारा मिळत नाही. इतिहास लेखनाच्या बाबतीत ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ या भूमिकेवर ते ठाम राहतात. आधार असल्याशिवाय लेखणी उचलणार नाही अशी पगडी यांची तटस्थता होती. पगडी इतिहास अभ्यासकांना आवाहन करतात, की कोणतीही गोष्ट प्रमाण मानू नका. मुळाकडे जा! विचारांचा पगडा आपल्या मनावर बसू देऊ नका आणि अभ्यास करून rational thinking ज्याला म्हणू, ती तर्कशुद्ध विचारसरणी आत्मसात करा. अत्यंत तटस्थ दृष्टिकोन स्वीकारून इतिहास घटिताच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा निरपवाद ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचण्याचा सेतुमाधवरावांचा हा प्रयत्न होता.

     सेतुमाधवराव शिवाजी राजांच्या स्वराज्याचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य सोप्या भाषेत समजावून सांगतात. राजांच्या कृतीच्या आधारे स्वराज्याच्या उभारणीमागचे तत्त्वज्ञान उलगडतात. मोगलाईचे स्वरूप आणि स्वराज्याची रूपरेषा यांत महद् अंतर अपरिहार्य आहे. स्वराज्यामध्ये लोक सुरक्षित असले पाहिजेत यासाठी महाराजांचा सततचा प्रयत्न होता. दुसरी गोष्ट धार्मिक सहिष्णुता, कोणाच्याही धर्मामध्ये ढवळाढवळ नाही, तसेच कोणत्याही धर्माचे आक्रमण मान्य नाही. तिसरी गोेष्ट स्त्रियांच्या बाबतीत अन्याय सहन न करण्याची. शिवसत्तेची ही वैशिष्ट्ये आहेत. स्वराज्याचा हेतू पगडी यांनी अत्यंत सुलभ भाषेत स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे, राजांची महत्ता वर्णन करताना उदात्तीकरण मात्र सेतुमाधवरावांनी टाळले आहे.

    मराठ्यांच्या इतिहासातील इ.स. १६८० ते १७०७ हा स्वातंत्र्य संग्रमाचा कालखंड मानला जातो. ‘हिंदवी स्वराज्य’ आणि ‘मोगल’ या पुस्तकांमधून हा इतिहास त्यांनी मांडला आहे. मराठी सत्ता या काळात तावून-सुलाखून निघाली. स्वातंत्र्य संग्रमाच्या कालखंडावर अत्यंत बारीकसारीक तपशीलासह फारसी साधनांच्या आधारे त्यांनी लेखन केले. या संघर्षासाठी त्यांनी ‘महाराष्ट्राचे महाभारत’ या शब्दाचा प्रयोग केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेतृत्व नसताना महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू मोगलांच्या कैदेत होते, तरीसुद्धा मराठे प्राण पणाला लावून लढले. औरंगजेब बादशहा एक-दोन नव्हे, पूर्ण सत्तावीस वर्षे मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी निकराचा प्रयत्न करीत होता. मराठे बादशहाला अक्षरश: पुरून उरले. या स्वातंत्र्य संग्रमामागे प्रेरणा काय होती? स्वातंत्र्याविषयीचे विलक्षण प्रेम कोठून आले होते? या प्रश्न्नांची उत्तरे पगडी यांनी दिलेली आहेत. स्वातंत्र्याचा मंत्र आणि स्वाभिमानाची भावना मराठ्यांमध्ये छत्रपतींनी निर्माण केली होती. मराठ्यांचा लढा जनतेचा लढा होता. औरंगजेब बादशहा एखाद्या राजसत्तेशी किंवा राजघराण्याशी लढत नव्हता, तर मराठी जनतेशी त्याला लढावे लागत होते. औरंगजेबाची आक्रमक वृत्ती, विस्तारवादी धोरण, धार्मिक असहिष्णुता एकीकडे, तर दुसरीकडे मराठी जनता, असा हा संघर्ष होता. मोगल प्रजेसाठी हे युद्ध बादशहाचे होते. मराठ्यांचे यश आणि औरंगजेब बादशहाचे अपयश याचा अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने सेतुमाधवरावांनी घेतलेला हा वेध होता.

     सेतुमाधवराव पगडी यांचे फारसी ग्रंथांच्या अनुवादाचे कार्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. ‘मराठ्यांच्या इतिहासातील बारीक-सारीक धागेदोरे, मराठा घराण्यांच्या नात्या-गोत्यांचे अनेक तपशील, महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेमधील अनेक बारकावे यांचा तपशील सेतुमाधवराव पगडी यांना परिचित असल्यामुळे त्यांच्या अनुवादाला अधिकच भरीवपणा आला आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यांची आणि विविध स्थानांची पगडी यांना सखोल माहिती असल्यामुळेही त्यांच्या अनुवादांत स्थान-निश्चिती अधिक स्पष्ट झालेली आहे.’ श्री. स.मा. गर्गे यांचा फारसी साधन ग्रंथांच्या अनुवादांविषयीचा उपरोक्त अभिप्राय अनुवाद ग्रंथांचे मोल स्पष्ट करणारा आहे. सुमारे पाच हजार पृष्ठांचा फारसी भाषेतील मजकूर त्यांनी मराठी भाषेत अनुवादित करून इतिहास लेखकांना कायमचे ऋणी करून ठेवले आहे. त्यांनी एकूण विविध विषयांवर ६४ पुस्तके लिहिली. पगडी यांच्या समग्र लेखनाचे डबल क्राउन आकाराचे ८ खंड (मराठी ६ व इंग्रजी २, पृष्ठसंख्या अदमासे अकरा हजार) सेतू माधवराव पगडी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश, हैदराबादद्वारा ऑगस्ट २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

    भारत सरकारने इ.स. १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला. बहुभाषा प्रभुत्व, बहुआयामी, बहुपेडी आणि बहुप्रसवी व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे सेतुमाधवराव पगडी जीवनविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना ‘जीवनसेतू’ या त्यांच्या आत्मचरित्रात असे नमूद करतात की,

    अय गर्दिशे अय्याम तेरा शुक्रिया ।

    हमने दुनिया का हर पहलू देख लिया॥

    जीवनाच्या प्रत्येक पहलूचा (पैलूचा) त्यांना अनुभव मिळाला. या अनुभव संपन्नतेतून ते सकल जनांना शहाणे करण्यासाठी अथक लिहीत राहिले. परिणामी, इतिहास लेखन क्षेत्र संपन्न झाले.

डॉ. ओमप्रकाश समदाणी

पगडी, सेतुमाधवराव श्रीनिवासराव