Skip to main content
x

पिंपळगावकर, विठ्ठल अनंत

कावडीबाबा

     कावडीबाबा म्हणजेच पूर्वाश्रमीचे विठ्ठल अनंत पिंपळगावकर  यांचा जन्म शके १७१९ चैत्र शु. १५ रोजी झाला. त्यांचे घराणे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिसा पिंपळगाव येथील होय. हे संतश्रेष्ठ विठ्ठलभक्त निंबराज महाराज यांचे नातू होत. निंबराजांचे ज्येष्ठ पुत्र नारायण हे कावडीबाबांचे आजोबा होत. विठ्ठल यांचे बालपण आईवडिलांच्या सान्निध्यात फार सुखात गेले. त्यांचे वयाच्या १२ व्या वर्षी संपूर्ण संहिता, पदक्रम, जटा, घन आदी पाठ पूर्ण होऊन त्यांची वैदिकांत गणना होऊ लागली. कावडीबाबा यांनी पाणिनीचे सिद्धान्त, कौमुदी, पंचकाव्य, साहित्यमंजिरी यांचा अभ्यास केला. पुराणग्रंथाचा अभ्यास करून ते पुराणही सांगू लागले. पंधराव्या वर्षांपर्यंत व्याकरण, न्याय, मीमांसा, साहित्य, काव्यालंकार, नाट्य, चंपू इत्यादी शास्त्राध्ययनही पूर्ण केले. खेड येथील थोर सत्पुरुष चंडिराम महाराज यांच्या कृपेने विठ्ठलाच्या ज्ञानात भर पडली, त्यांचा समाधीयोगाचा अभ्यास वाढला.

     कावडीबाबा यांचे सदाशिव वामन देशपांडे यांच्या लक्ष्मी नावाच्या कन्येशी १८१८ साली लग्न झाले. मात्र त्यांची भजन-कीर्तनाची गोडी दिवसेंदिवस वाढतच गेली. आपल्या वृद्ध माता-पित्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी कुलकर्णीपणाच्या कामातून पूर्ण निवृत्ती घेतली. अशातच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. विठ्ठलपंतांची विरक्ती अधिकच वाढली.

     कावडीबाबा यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांना दिसेनासे झाले. तेव्हा त्यांना घेऊन काशीयात्रेस जाण्याचा विठ्ठलपंतांनी बेत ठरविला. आईवडिलांसाठी डोलीप्रमाणे कावड बनवून त्यांनी ती खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा सुरू केली. पंढरपूर, गाणगापूर, कुंभकोण, रामेश्‍वर, कन्याकुमारी, मथुरा, वृंदावन, प्रयाग, गया इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांची त्यांनी यात्रा केली. त्यांना सर्व लोक कावडीबाबा या नावानेच ओळखू लागले. गयेस फल्गु नदीच्या काठी त्यांच्या मातोश्रीने प्राण सोडला. काशीला आल्यावर त्यांच्या वडिलांनी संन्यासाश्रम घेतला व अनंतानंद सरस्वती नाव धारण केले, वर्षभरात त्यांनीही समाधी घेतली. यानंतर कावडीबाबांनी रिकाम्या कावडीत विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती ठेवल्या व त्यांची यात्रा सुरूच राहिली. गालब क्षेत्रात आल्यावर दत्तजयंतीच्या दिवशी दत्तात्रेयांवर ग्रंथ लिहिण्याची त्यांना प्रेरणा झाली. नारद पुराणाचा आधार घेऊन कावडीबाबा यांनी ‘श्रीदत्तप्रबोध’ या ग्रंथाच्या रचनेस प्रारंभ केला. अवंती येथे असताना ‘श्रीदत्तप्रबोध’ या ग्रंथाचे चाळीस अध्याय पूर्ण झाले.

     याच सुमारास त्यांच्याकडून करुणाशतक, अभंग, पदे, भजने यांची रचना झाली. नंतर यात्रा करीत द्वारकेवरून ते डाकोरला आले. डाकोरनाथांच्या आज्ञेवरून ते बडोद्याला येऊन स्थिरावले. त्यांच्या शिष्याने बडोद्याला त्यांना एक राम मंदिर बांधून दिले. त्याच देवळात कावडीबाबांच्या कावडीतील विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तीही विराजमान झाल्या. ‘दत्तप्रबोध’ या ग्रंथाचे उरलेले २१ अध्यायही येथे पूर्ण झाले. एकसष्ट अध्यायांच्या या ग्रंथाची ओवीसंख्या चौदा हजार दोनशे छत्तीस आहे. सुलभ भाषेत कर्म, ज्ञान, उपासना, योग, वेदान्त आदी विषयांचे अत्यंत मार्मिक विवेचन यात केलेले आहे. दत्त संप्रदायावरील मोजक्या ग्रंथात याचा समावेश होतो. यानंतर तीन-चार वर्षांतच एका नामसप्ताहात कावडीबाबा यांचे निर्वाण झाले.

     - संपादक मंडळ

पिंपळगावकर, विठ्ठल अनंत