Skip to main content
x

पिंपळघरे, कोलबाजी द्रोणाजी

कोलबाजी द्रोणाजी पिंपळघरे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात वाकोडी गावी, विणकर कुटुंबात झाला. त्यांचे चुलते लक्ष्मण तबला व पखवाज वादक होते. पिंपळघरे यांच्या आईचे नाव पूर्णाबाई होते. लक्ष्मणकाकांबरोबर कोलबाजीही तबला, पखवाज वाजवू लागले. वादनकलेत उत्तम शिक्षण मिळावे म्हणून पिंपळघरे कुटुंबीय नागपूरला स्थायिक झाले आणि बळीराम पंडे यांच्याकडे पिंपळघरेंनी १९३७ ते १९४५ पर्यंत रीतसर अध्ययन केले. विख्यात पखवाजी शंकर अलकुटकरांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. पुढे बळीराम पंड्यांनी त्यांना लखनौला नेऊन  सखारामजींच्या स्वाधीन केले. तेथे पिंपळघर्‍यांना तबला-पखवाजाची खरी जाण आली. विशारदपर्यंतचा अभ्यास पूर्ण करून आपल्या वादनाने त्यांनी बर्‍याच बैठकी गाजवून लोकप्रियता संपादन केली.

संगीत परिषदा, उत्सवांमध्ये कार्यक्रम, साथसंगत केल्याने पिंपळघरे यांचे अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले. डॉ. सुमती मुटाटकर, राजाभैया पूछवाले यांच्यासारख्या गवय्यांना त्यांनी साथ केली. इंदूरचे प्रसिद्ध पखवाजवादक अंबादासपंत आगळे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वादनाची खुबी आत्मसात केली.

डॉ. सुमती मुटाटकरांच्या साहाय्याने गोविंद बर्‍हाणपूरकरांकडून त्यांनी नवनवीन बोल, संगत तंत्र ज्ञात करून घेतले. धारचे शिल्पकार, संगीतज्ञ र.कृ. फडके, तसेच मैहरचे उ. अल्लाउद्दिन  खाँ यांच्याशीही त्यांचा संगीत-संवाद होता. श्रम व श्रद्धा, गुणग्रही स्वभावाने त्यांनी स्वत:ची उत्तम प्रगती केली. गुरूंच्या पश्चात ‘बळवंत वादन कलाभुवन’ सांभाळले.

पिंपळघरे १९३९ साली ‘चतुर संगीत महाविद्यालया’त तबलाध्यापक म्हणून नियुक्त झाले. तेथेच त्यांनी ३५ वर्षे आदर्श तबला शिक्षक म्हणून सेवा केली. त्यांनी १९६१ ते १९६४ पर्यंत अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी १९६५ मध्ये बिंझाणी महिला महाविद्यालयात तबला वादकाची नोकरी लागली. नागपूर आकाशवाणीवर १९४८ पासून त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. पिंपळघर्‍यांनी अनेक विख्यात  कलाकारांची साथसंगत कुशलतेने केली. त्यांनी १९५८ मध्ये पंचमढीला राष्ट्रपतींसमोर एका कार्यक्रमात भाग घेतला होता. संगीताची विद-ऑनर्स पदवी परीक्षा खैरागड विश्वविद्यालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये ते एक आहेत.

पिंपळघरे यांचा स्वभाव शांत, सौम्य, सोज्ज्वळ, विनम्र असून त्यांचा शिष्यपरिवार मोठा आहे. तबला-पखवाजाचे एकल वादन व सुसंबद्ध साथसंगतीत ते तरबेज आहेत. त्यांच्या शिष्यपरिवारात गजानन ताडे (खैरागड), बाळ तुळाणकर (अमरावती), भैयाजी पिंपळखरे, मुरलीधर दीक्षित यांचा समावेश आहे.

वि.ग. जोशी

संदर्भ :

मंगरूळकर, नारायण गोविंद; ‘वैदर्भीय संगीतोपासक’, भाग १; प्रथमावृत्ती, मार्च १९७४.

पिंपळघरे, कोलबाजी द्रोणाजी