Skip to main content
x

पिंपुटकर, मोरेश्वर गजानन

     म.जी.पिंपुटकर म्हणजे पोलादी, कठोर, शिस्तप्रिय प्रशासक!’ पंतप्रधान मोरारजी देसाईंचे हे गौरवोद्गार सार्थ ठरवणारे मोरेश्वर गजानन पिंपुटकर हे तत्कालीन मुंबई प्रांतातील उंबरगावचे (आता गुजरातेत असलेल्या) मूळ रहिवासी होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते.

      मोरेश्वर सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. लहानपणीच पितृछत्र हरवलेल्या मोरेश्वरचे पुढील संगोपन व शिक्षण त्यांचे चुलते व मामा यांच्याकडे झाले.

       त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. त्यानंतर ते आय.सी.एस. परीक्षेसाठी इंग्लंडला गेले. मोरेश्वर पिंपुटकर हे त्यांच्या समाजातील पहिले व ब्रिटिश राजवटीतील शेवटचे आय.सी.एस. अधिकारी बनून १९४०मध्ये मुंबई येथे परतले. पिंपुटकर आय.सी.एस. परीक्षादेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९४६ ते १९४९ या कालावधीत पिंपुटकर गुजरातमधील गोधरा येथे जिल्हाधिकारी होते. हा कालखंड म्हणजे भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींचा काळ आहे. या कालखंडातच भारताला स्वातंत्र्य (१९४७) मिळाले. गोध्र्याला या सर्व पार्श्वभूमीचा संदर्भ आहे. 

       गोधरा हे अतिशय संवेदनशील ठिकाण समजले जाते. येथे हिंदू-मुस्लीम दंग्यांचा मोठा इतिहास आहे. गोधऱ्यात  पिंपुटकर जिल्हाधिकारी असताना मोठी दंगल झाली. पिंपुटकरांनी मोठ्या धाडसाने व कौशल्याने दंगेखोरांना रोखले व जेरबंद केले. तेव्हापासून गोधऱ्यामध्ये पिंपुटकरांचा जबरदस्त दरारा निर्माण झाला.

       गोधऱ्यातील काही समाजकंटक गणेशोत्सव मिरवणुकीला विरोध करत व मिरवणूक काढू देत नसत. पिंपुटकरांनी गणेश उत्सव पुन्हा सुरू केला. काही लोकांना हे आवडले नाही, पण पिंपुटकरांनी निषेध व्यक्त करणाऱ्यांना प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला आणि तेव्हापासून गणेशोत्सवाची मिरवणूक वाजतगाजत, मोठ्या आनंदाने काढण्यास सुरुवात झाली. पिंपुटकरांच्या या अजोड कार्यामुळे दरवर्षी पिंपुटकरांच्या प्रतिमेस हार घालून मिरवणुकीची सुरुवात होते. पिंपुटकरांची गोधरामधील कारकिर्द खूपच जोखमीची व धाडसाची होती. गोधरातील सट्टेबाज, गुन्हेगार, दंगेखोर समाजकंटक पिंपुटकरांना जबरदस्त घाबरत असत. या त्यांच्या कामाची लोकप्रियता एवढी होती, की गोधऱ्यातून त्यांची बदली झाल्यानंतर तेथील मुख्य चौकाचे नामकरण ‘एम.जी. पिंपुटकर चौक’ असे करण्यात आले.

       गोधऱ्याहून त्यांची नियुक्ती अहमदाबाद येथे अन्नधान्य वाटप आयुक्त (फूड कमिशनर) म्हणून करण्यात आली. या ठिकाणीदेखील त्यांनी तडफदार वृत्ती दाखवून साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून अन्नधान्य वाटपाची उत्तम व्यवस्था लावली.

        १९६० साली पिंपुटकर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. मुंबईतील त्यांची कारकीर्द वादळी ठरली. ते मुंबईचे आयुक्त असताना मुंबई प्रदेश काँग्रेस हाउसचा कर न भरल्यामुळे त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या इमारतीवर जप्ती आणली. त्यामुळे त्यांची तेथून बदली करण्यात आली.  ४ सप्टेंबर १९६५ रोजी पिंपुटकर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये मुख्य संचालक या पदावर रुजू झाले. या ठिकाणी त्यांनी २८एप्रिल १९६८पर्यंत यशस्वीपणे पदभार सांभाळला. पुढे १९७४ साली मा.इंदिरा गांधी यांनी पिंपुटकरांची केंद्रीय नियोजन आयोगाच्या सचिवपदी नेमणूक केली. १९७७ पर्यंत ते या पदावर होते.

        १९७७ साली आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार आले व मा.मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मोरारजींनी पिंपुटकरांना प.बंगाल राज्याच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून पाठवले. त्या वेळी बंगालमध्ये अशांततेची परिस्थिती पिंपुटकरांनी कौशल्याने हाताळली. लवकरच १७ सप्टेंबर १९७७ रोजी मोरारजींनी पिंपुटकरांची नियुक्ती केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष म्हणून केली. या पदावरून पिंपुटकर ३० एप्रिल १९८० रोजी सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर पिंपुटकर सहा महिने दिल्लीचे हंगामी राज्यपाल होते.

        राज्यपाल पदाची कारकीर्द संपल्यानंतर ते दिल्ली (गाझियाबाद) येथे स्थायिक झाले. या नि:स्पृह, प्रामाणिक, कठोर शिस्तीच्या प्रशासकाचा मृत्यू दिल्ली येथे झाला.

- संपादित

पिंपुटकर, मोरेश्वर गजानन