Skip to main content
x

पित्रे, शशिकांत गिरिधर

     शिकांत गिरिधर पित्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील आयकर खात्यात अधिकारी होते. तर आई सुशीला गृहिणी होती. डॉ.दादासाहेब भडकमकर हे त्यांचे मामा तर करवीरपीठाचे तत्कालीन पू.शंकराचार्य हे त्यांचे आजोबा होतं. शशिकांत हे सहा भावंडांतील धाकटे  होते. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये आणि नंतर साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी सांख्यिकी या विषयातील पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. महाविद्यालयात असताना ते राष्ट्रीय छात्रसेनेच्या अधिकारी प्रशिक्षण विभागात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य प्रबोधिनीमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

     १९६२ मध्ये त्यांनी भूसेनेच्या अभियांत्रिकी विभागात (कोअर ऑफ इंजिनिअर्स) प्रवेश केला. पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून  म्हणजेच सी.एम.इ.मधून  त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.

     १९६५च्या भारत-पाक युद्धात ते सहभागी होते. १९७१च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ते नवव्या इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. या युद्धातील पहिला ‘क्रुपमान’ पूल त्यांनीच बांगलादेश सीमेवरच्या बायरा नदीवर जस्सौर विभागात बांधला. बांगलादेशातील विजयासाठी हाच पूल पुढे ‘विजय सेतू’ (ब्रिज टू व्हिक्टरी) म्हणून ओळखला गेला.

     या युद्धानंतर त्यांची नियुक्ती नागपूरस्थित ‘गॅरीसन इंजिनिअर्स’मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मधून एक महत्त्वाचा प्रशिक्षणक्रम पूर्ण केला. १९७५मध्ये त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘ब्रिगेड मेजर’पदी झाली. १९७७मध्ये चिलखती विभागाच्या (आर्मर्ड डिव्हिजन) एकशे चौदाव्या आर्मर्ड रेजिमेंटच्या कमांडरपदी शशिकांत पित्रेंची नियुक्ती झाली. पाच वर्षे ते या पदावर कार्यरत होते.

     त्यानंतर त्यांनी महू येथून उच्चाधिकारी पाठ्यक्रम (हायर कमांड कोर्स) पूर्ण केला. त्यानंतर त्यांची नियुक्ती ‘कर्नल - जनरल स्टाफ’ या पदावर पुणेस्थित भूसेनेच्या दक्षिण विभागात (सदर्न कमांड) झाली. तेथूनच त्यांची नियुक्ती ‘कर्नल - जनरल स्टाफ, ऑपरेशन्स’ या पदावर श्रीलंकेतील भारतीय शांतीसेनेमध्ये  झाली. तीन वर्षे या पदावर ते तेथे कार्यरत होते. भारतीय शांतीसेनेच्या एकूण कार्यवाहीचे व हालचालींचे नियोजन यात त्यांच्या महत्त्वाचा सहभाग होता.

     १९९० मध्ये त्यांची नियुक्ती पहिल्या कोअरच्या मुख्य अभियंतापदी झाली. तेथून त्यांची ‘जनरल कॅडर’मध्ये पदोन्नती झाली. त्यांची नियुक्ती पहिल्या इन्फन्ट्री ब्रिगेडवर सिक्कीम सीमेवर झाली. त्यानंतर त्यांच्या त्याच ब्रिगेडकडे मणिपूरच्या फुटिरतावाद्यांनी त्रस्त अशांत भागाची जबाबदारी देण्यात आली.

     १९९४ मध्ये त्यांच्याकडे पश्चिम सीमेवर तैनात असलेल्या नवव्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे ‘डिव्हिजन कमांडर’ म्हणून नेतृत्त्व देण्यात आले. १९९६मध्ये त्यांची नियुक्ती शिमलास्थित भूसेनेच्या प्रशिक्षण विभागाचे (आर्मी ट्रेनिंग कमांड) उप प्रमुख (व्हाईस चीफ ऑफ स्टाफ) म्हणून झाली. सैनिकांंचे प्रशिक्षण आणि सैद्धान्तिक भूमिका तयार करण्याचे कार्य हा विभाग करतो.

     एप्रिल १९९८ मध्ये भूसेनेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी  युद्धांशी संबंधित दोन कार्ये सुरू केली. पहिले कार्य म्हणजे विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून राष्ट्राच्या संरक्षण क्षेत्राविषयी प्रबोधन करणारे आणि युद्धविषयक विश्‍लेषण करणारे चतुरस्त्र लेखन त्यांनी सुरू केले. १९९९ च्या कारगील युद्धकाळात त्यांची दै. सकाळमधून प्रकाशित झालेली ‘व्यूह आणि वेध’ ही दैनिक लेखमाला गाजली. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी दै. लोकसत्तातून प्रकाशित झालेली ‘व्यूहवेध’ ही लेखमाला लोकप्रिय झाली तसेच शतकमहोत्सवी ठरली. अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्याच्या वेळी दै. लोकसत्तेतून पुन्हा ‘व्यूहवेध’ ही  त्यांची  लेखमालिका प्रकाशित झाली. याशिवाय इतर अनेक नियतकालिकांमधूनही त्यांनी संरक्षणविषयक जनजागृती करणारे लेखन केले . कारगिल युद्धावरच्या त्यांच्या ‘डोमेल ते कारगिल’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्तम ग्रंथ पुरस्कार २००१ मध्ये मिळाला. अन्यही काही पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झाले आहेत. नौसेनाध्यक्ष भास्कर सोमण यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र ‘अ‍ॅडमिरल सोमण - भारताचे सरखेल’ गाजले आहे. ‘श्रीलंकेची संघर्षगाथा’ हे श्रीलंकेतील तमीळ अतिरेक्यांविरुद्ध भारतीय शांतीसेनेच्या तेथील कामगिरीवर लिहिलेले पुस्तकही वाचकप्रिय ठरले आहे. ही सर्व पुस्तके राजहंस प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. भारतीय नौसेनेच्या विनंतीवरून त्यांनी सोमणांच्या चरित्राचे इंग्रजी भाषांतरही केले आहे.

     त्यांचे दुसरे महत्वाचे  कार्य जागतिक पातळीवरील 'भू-सुरुंग विरोधी' हे आहे. जगभरात युद्धकाळात हजारो भूसुरुंग पेरले जातात. भारतीय सेना आपल्या उज्ज्वल परंपरेप्रमाणे युद्धोत्तर काळात संपूर्ण भूसुरुंग क्षेत्र साफ (डि-माईन) करते. मात्र जगभरातील इतर सेना आणि सशस्त्र अतिरेकी गट असे करीत नाहीत. युद्धोत्तर काळात त्या भूसुरुंगांमुळे दरवर्षी तेरा कोटी निष्पाप नागरिक अपंग होतात आणि चोवीस हजार नागरिक मारले जातात. त्यातील तीस टक्के लहान मुले असतात. जगभरात असे विविध ठिकाणी पेरलेले भूसुरुंग नष्ट करणे व सुरुंगक्षेत्र साफ करून तो भूभाग सुरक्षित करणे हे एक उच्च प्रशिक्षिणाची आवश्यकता असलेले तंत्रकुशल कार्य आहे. याच कार्यासाठी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी ‘हॉरिझॉन’ नावाची एक स्वयंसेवी संस्था २००१ मध्ये अन्य सहकार्यांसमवेत स्थापन केली आहे. ही अशा प्रकारचे कार्य करणारी एकमेव आशियायी संस्था आहे. ही संस्था राष्ट्रसंघाच्या (युनो) मार्गदर्शनाखाली कार्य करते. जगात अशा केवळ अकरा संस्था आहेत. पित्रे स्वतः अभियंता असल्याने हे कार्य व त्यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करणे त्यांना अवघड गेले नाही. या संस्थेचे सर्व कर्मचारी व स्वयंसेवक हे भूतपूर्व सैनिक व सेनाधिकारी असतात.

     २००३मध्ये या संस्थेने श्रीलंकेत सुरुंग नष्ट करण्याचे कार्य सुरू केले. त्यानंतर आजवर जगभरातील विविध ठिकाणचे भूसुरुंग नष्ट करण्याचा दरवर्षी एक प्रकल्प नॉर्वेचे सरकार या संस्थेला देत आले आहे. २००९ पासून भारत सरकारही या संस्थेला अशाच स्वरूपाच्या कार्यासाठी निमंत्रित करू लागले आहे. जॉर्डनमध्येही या संस्थेने अशा स्वरूपाचे कार्य केले आहे.

     आजवर शशिकांत पित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने जगभरात विविध ठिकाणचे दीड लाख भूसुरुंग नष्ट केले आहेत तर न फुटलेले धोकादायक असे सहा हजार बॉम्ब निकामी केले आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत ही संस्था लढाईमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे कार्य करते आहे. अशा प्रकारच्या कार्यासाठी राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेली आणि ‘आय.एस.ओ.९०००: मानांकन मिळालेली ही पहिली संस्था आहे.

     शशिकांत पित्रे हे अन्य अनेक सामाजिक कार्यांशी व संस्थांशी संबंधित आहेत. अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे .

- राजेश प्रभु साळगांवकर

पित्रे, शशिकांत गिरिधर