Skip to main content
x

पळणिटकर, श्रीपतराव

      हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीपतराव पळणिटकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील वझार या गावी झाला. नांदेड जिल्हा तेव्हा हैदराबाद संस्थानात होता. श्रीपतरावांचे शालेय शिक्षण हैदराबादला, महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला आणि कायद्याचे शिक्षण मुंबईला झाले. बी.ए.(ऑनर्स) आणि एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर ते हैदराबादला वकिली करू लागले. सुरुवातीला त्यांनी तेव्हाचे हैदराबादचे प्रसिद्ध वकील काशिनाथराव वैद्य यांच्या हाताखाली काम  केले. तेव्हा ते सिकंदराबादच्या कॅन्टॉन्मेंट न्यायालयासह सर्व न्यायालयांत काम करीत असत. थोड्याच काळात त्यांचा वकिलीत जम बसला आणि हैदराबाद उच्च न्यायालयातील एक वकील प्रमुख म्हणून ते ओळखले जाऊ लागले. उच्च न्यायालयातील अनेक महत्त्वाच्या आणि गाजलेल्या खटल्यांत त्यांचा सहभाग होता.

       १९४३मध्ये हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पळणिटकरांची नियुक्ती झाली. न्यायाधीशपदावर असतानाच हैदराबादच्या पहिल्या विधानसभेचे सभापती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद पोलीस कारवाई होईपर्यंत ते विधानसभेचे सभापती होते. हैदराबाद संस्थानावर भारतीय फौजांनी केलेल्या तथाकथित आक्रमणाविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी हैदराबादची बाजू मांडण्यासाठी जे शिष्टमंडळ गेलेे, त्यात न्या.पळणिटकरांचा समावेश करण्यात आला होता; परंंतु आपण आजारी असल्याचे सांगून ते शिष्टमंडळाबरोबर गेले नाहीत.

       हैदराबादमुक्तीनंतर ते उच्च न्यायालयात परत आले. काही काळ त्यांची नियुक्ती कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. पण नंतर त्यांना कायम सरन्यायाधीश करण्याऐवजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश मिश्रा यांची नेमणूक हैदराबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. न्या. मिश्रा निवृत्त झाल्यानंतर मग न्या. पळणिटकर हैदराबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. नोव्हेंबर १९५६मध्ये राज्य पुनर्रचनेच्या वेळी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली, परंतु त्यांना सरन्यायाधीश न नेमता फक्त न्यायाधीश म्हणून नेमले गेले. १९५७मध्ये ते न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले आणि त्यानंतर मुंबईलाच राहिले. एकूण चौदा वर्षांच्या आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत न्या. पळणिटकरांनी एक अभ्यासू आणि मृदुभाषी न्यायाधीश म्हणून लौकिक मिळवला.

      मराठी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर न्या.पळणिटकरांचे प्रभुत्व होते. मराठी साहित्याची त्यांना आवड होती. १९४२-४३मध्ये हैदराबादला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

      मराठवाडा विभागासाठी वेगळे विद्यापीठ असावे, अशी त्या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने, एप्रिल १९५७मध्ये न्या.पळणिटकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. समितीने १ डिसेंबर १९५७ रोजी आपला अहवाल सादर केला आणि मराठवाड्यासाठी वेगळे विद्यापीठ असावे, अशी शिफारस केली. दुर्दैवाने त्यानंतर लवकरच, ३१जानेवारी१९५८ रोजी न्या.पळणिटकरांचे अल्प आजाराने निधन झाले. मात्र समितीच्या शिफारशींनुसार विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक तो कायदा सरकारने केल्यानंतर २३ ऑगस्ट १९५८ रोजी मराठवाडा विद्यापीठ (आजचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) स्थापन झाले.

-  न्या.नरेंद्र चपळगावकर

पळणिटकर, श्रीपतराव