Skip to main content
x

पळशीकर, शंकर बळवंत

              कुशाग्र बुद्धिमत्ता, तत्त्वज्ञान व आध्यात्मिकतेची ओढ, त्या अनुभूतीतून आलेली संवेदन-शीलता व त्यातून झालेली निर्मिती, हे पळशीकरांच्या कलाविचारांचे वैशिष्ट्य होते. व्यक्तिचित्रण, भारतीयत्व जपणारे आलंकारिक रचना-चित्रण, तसेच अमूर्ततेकडे वाटचाल करणाऱ्या चित्रांची त्यांनी निर्मिती केली. शंकर बळवंत पळशीकरांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाला. दहा भावंडांत शंकर सर्वांत लहान म्हणून कोडकौतुकापेक्षा त्यांना हालअपेष्टा, आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागले. वयाच्या आठव्या वर्षीच वडिलांचे छत्र गेले. त्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आई राधाबाई यांच्यावर आली. अशा प्रतिकूल परिस्थितीत मावशीकडून मिळालेल्या आधारावर नवयुग हायस्कूल, सावनेर येथून पळशीकर मॅट्रिक झाले.
 ऐहिकदृष्ट्या त्यांचे वडील बळवंतरावांनी मुलांसाठी कोणताच वारसा ठेवला नव्हता. मृत्यूच्या आदल्या दिवशी छोट्या शंकरच्या खांद्यावर हात ठेवून ‘‘हा मुलगा माझं नाव काढणार,’’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. कालांतराने तो सार्थही झाला. वास्तविक पाहता साकोलीसारख्या खेडेगावात चित्रकार होण्यासाठी कोणतेच पोषक वातावरण नव्हते. मॅट्रिकनंतर बराच काळ नागपूरमधील प्रसिद्ध बॅरिस्टर कुकडे यांनी पळशीकरांना आधार दिला. तरीही जीवन विस्कळीत व अस्थिरच होते. परिस्थितीत आशादायक बदल घडत नव्हता. दिशाही सापडत नव्हती.
 पळशीकर १९३८-३९ च्या सुमारास आपले थोरले बंधू विनायक यांच्याकडे दादर येथील बापट बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यांनी उपजीविकेसाठी प्रसिद्ध चित्रकार बेंद्रे, दलाल, वाकणकर यांच्याकडे अनेक व्यावसायिक कामे केली.
  त्यांचे कलाशिक्षण खऱ्या अर्थाने १९३५ ते १९४२ या काळात व्यावसायिक काम करूनच सुरू झाले व आपल्यात दडलेल्या चित्रकाराची त्यांना ओळख झाली.
 शंकर पळशीकरांची कलाशिक्षणाची सुरुवात काहीशी उशिरा म्हणजे १९४२ मध्ये वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली. अनेक व्यावसायिक कामे करीत असताना बेंद्रे यांच्यासारख्या अनुभवी चित्रकाराकडून प्राथमिक कलाशिक्षणाचे धडे त्यांना आधीच मिळाले होते. पळशीकर १९४२ ते १९४७ या कालावधीत सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थी असताना प्राध्यापक अहिवासी, नगरकर, जेरार्ड, वाय.के. शुक्ल, हेब्बर, फर्नांडिस, धोपेश्‍वरकर अशा मातब्बर कलाशिक्षकांकडून त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक अहिवासी व नगरकर यांच्या खास भारतीय चित्रशैलीच्या वर्गात त्यांनी शिक्षण घेतले. स्वत:च्या कलाविषयक संकल्पना व गुरुजनांच्या कलाविषयक कल्पना यांच्या संयोगातून व संघर्षातून ते घडत गेले. भारतीय परंपरेत आधुनिक वाटा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न इथूनच सुरू झाला व तो शेवटपर्यंत चालूच राहिला.
 त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना १९५० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी व फाइन आर्ट सोसायटी ऑफ कोलकाताचे सुवर्णपदक मिळाले. १९५१ मध्ये पळशीकर सुमार्या यांच्याशी विवाहबद्ध झाले. महाराष्ट्र सरकारची ‘कल्चरल स्कॉलरशिप इन फाइन आर्ट’ भूषविणारे ते पहिले मानकरी ठरले. इंग्लंड येथे १९६५ मध्ये इंटरनॅशनल प्लॅस्टिक आर्ट कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याच काळात त्यांनी फ्रान्स व युरोपमधील देशांना भेटी दिल्या. पळशीकरांचे व्यक्तिमत्त्व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्येच पूर्णार्थाने घडत गेले. प्रथम विद्यार्थी, नंतर फेलो, सह व्याख्याता, व्याख्याता, प्राध्यापक अशा चढत्या आलेखाबरोबर १९६८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या ‘अधिष्ठाता’ पदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांना १९७३ मध्ये श्रीलंका सरकारने ‘चित्रकला शिक्षणतज्ज्ञ’ म्हणून आमंत्रित केले होेते.
 स्वातंत्र्यानंतर चित्रकलेतही विलक्षण बदल घडत गेला. पाश्‍चात्त्य चित्रकारांमधील आधुनिकीकरणाची लाट त्याच सुमारास भारतातही दिसू लागली. स्वतंत्र विचारांची बीजे कुठेतरी रुजत होती. तत्कालीन चित्रकार स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत होते. भारतीय दृष्टिकोनातून कलेचा स्वतंत्र आविष्कार करण्याच्या प्रेरणेतून ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ स्थापण्यात आला. या ग्रुपने
 भारतीय चित्रकलेतील परंपरेला भेदून आधुनिक अमूर्त चित्रकलेची बीजे रुजवायला सुरुवात केली. त्यातील अनेक चित्रकार १९५३ च्या सुमारास देश सोडून निघून गेले आणि त्यातील काही सभासदांनी नवीन सभासदांसह ‘बॉम्बे ग्रुप’ स्थापन केला. त्यांत के.के. हेब्बर, शंकर पळशीकर,  डी.जी. कुलकर्णी, मोहन सामंत, आरा, चावडा, बाबूराव सडवेलकर हे चित्रकार होते.
 पळशीकर १९७५ मध्ये अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले. बंगला सोडून ते ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत वास्तव्यास आले. त्यांना १९८२ मध्ये अकॅडमी ऑफ इटली या संस्थेने कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्यांच्या चित्रांची प्रशंसा झाली; तर ललित कला अकादमी, नवी दिल्लीने प्रमुख नऊ भारतीय चित्रकारांमध्ये त्यांचे नामांकन केले.

वास्तविक पाहता पळशीकर ज्या काळात शिकले, तो काळ मूर्त वास्तववादी चित्रकलेचा होता. पण कोणत्याही शैलीशी किंवा चळवळीशी त्यांनी स्वत:ला बांधून घेतले नव्हते. मूर्त ते अमूर्त शैलीपर्यंतच्या प्रवासात बदल, नवी संकल्पना, नवे तंत्र ते आत्मसात करीत गेले. मग ते व्यक्तिचित्रण असो, की मूर्त अथवा अमूर्त रचनाचित्र असो. प्रत्येक चित्रात वेगळे भाव प्रदर्शित होत. पण तरीही ती सर्व चित्रे सर्वार्थाने त्यांचाच ठसा निर्माण करीत. जलरंगांपासून ते तैलरंगांपर्यंत विविध माध्यमांवर त्यांची हुकूमत होती.
 भारतीय चित्रकलेत अमृता शेरगिलनंतर परिवर्तनाचा खोलवर ठसा उमटवणाऱ्या
 मोजक्या चित्रकारांमध्ये पळशीकरांचा सहभाग खूप मोठा आहे. रेषा, रंग, रूप, आकार, भावना, पोत आणि अवकाश या चित्रघटकांकडे सौंदर्यभावनेच्या दृष्टीने जाणीवपूर्वक पाहण्यास नवकलेतील चित्रकार अमूर्त शैलीपासूनच शिकला.
 जलरंगातून चित्राला पोत प्राप्त करून देण्याची प्रथा पळशीकरांनी सुरू केली. पळशीकरांनी आपल्या चित्रातून वसईकडील भैयाची पगडी, मोजडी वगैरे गोष्टी तसेच स्वस्तिक, हस्त, पद्म इत्यादी भारतीय प्रतीके व रंगांचा वापर आपल्या चित्रांतून जाणीवपूर्वक केला. त्या काळात वेगळी म्हणून आणि कालांतराने ऐतिहासिक महत्त्वाची म्हणून या चित्रांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळाले.
 व्यक्तिचित्रणातही पळशीकरांचे मोठे योगदान आहे. व्यक्तिचित्र करताना त्यांनी बाह्य दर्शनी भागाचे चित्रण केले नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाचा ठाव त्यांत दिसतो. त्या व्यक्तीची भावनिक मुद्रा त्यात प्रकट होते. प्रत्येक व्यक्तीचे भावविश्‍व, तिचे अंतर्मन, बाह्य व अंतरंग यामुळे प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते. याच गोष्टींचा ठाव घेत त्यांनी व्यक्तिचित्रे केली. अगदी व्यावसायिक प्रकारची केलेली पूर्णाकृती व्यक्तिचित्रे - बाळ गंगाधर टिळक, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, या सर्व चित्रांत प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा, अनुभवाचा प्रत्यय येतो. व्यक्तिचित्रे करताना प्रत्येकाची त्वचा, ड्रॉइंग, प्रकाशाची विविधता, वातावरणाचा परिणाम, रंगांची स्पंदने इत्यादी सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रकाश पाहणे हे फार महत्त्वाचे आहे असे ते तळमळून सांगत. त्यांनी केलेली काही व्यक्तिचित्रे, पोट्रेट
 ऑफ मिस के’, ‘नाना पळशीकर’ (सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते, पळशीकरांचे थोरले बंधू), ‘विष्णुपंत भागवत’, ‘शर्मा’, ‘विष्णुदास भावे’, ‘मिस आनंदकर’ या चित्रांमध्ये प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे उमटते. प्रत्येक चित्र करताना वेगळ्या प्रकारे रंग लेपून ती केलेली दिसतात. विष्णुदास भाव्यांचे चित्र पाहताना त्यांचा करारीपणा दिसतो, तर विष्णुपंत भागवतांचे चित्र पाहताना ते विचारवंत, ज्ञानी, तपस्वी भासतात. शुभा आनंदकरांचे चित्र पाहताना त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत, प्रेमळ असल्याचे जाणवते.
सुरुवातीच्या काळातील त्यांच्या रचनाचित्रांमध्ये विविध विषय वेगवेगळ्या प्रकारे हाताळलेले आढळतात. साधारणपणे १९४३ ते १९४८ पर्यंतच्या त्यांच्या रचनाचित्रांमध्ये निसर्गचित्रातले अथवा ग्रमीण किंवा लोकजीवनातले घटक प्राधान्याने येतात. त्यांतले परिप्रेक्ष्य आणि अवकाशाची विभागणी आधुनिक वास्तववादी आणि लघुचित्रशैली अशा संमिश्र पद्धतीने झालेली दिसते. असाच प्रत्यय त्यांच्या ‘गोवन लाइफ’ या १९८३ मधल्या चित्रात येतो. ‘ग्रीन लोटस’ (१९४६), ‘सिनर्स डिव्हाइन’(१९५०), ‘वन विदाउट सेकंड’ (१९५७) या रचनाचित्रांमध्ये भारतीय चित्रशैली आणि त्यातील प्रतिमा, प्रतीकांचा प्रभाव दिसतो. स्त्री-पुरुष तत्त्वाचे आदिम आणि समाजसापेक्ष नाते, मानवी मूल्ये यांचे संदर्भ या चित्रांना आहेत. ‘स्वातंत्र्य यज्ञ’ (१९४२) आणि ‘क्रुसेड फॉर फ्रीडम’(१९४९) या रचनाचित्रांमधली अलंकरणात्मक भासणारी आणि त्यांतल्या मानवाकृतींमुळे वारलीसारख्या आदिवासी कलेची आठवण करून देणारी शैली पुन्हा वेगळी आहे.
 वर्सोव्याला राहत असताना कोळी समाजाचे जे दर्शन पळशीकरांना झाले, त्या पार्श्‍वभूमीवरचे ‘थ्री ग्रेसेस’ हे कोळी स्त्रियांच्या समूहाचे चित्र आहे. ‘माया’ या चित्रातील आदिमातेचे रूप क्यूबिस्ट शैलीची आठवण करून देते. वृक्ष, सर्प, मासे, पावले, यज्ञवेदी अशा प्रतिमा या चित्रांमधून येतात. या प्रतिमांना सांकेतिक अर्थांपेक्षा वेगळे अर्थ या चित्रांमध्ये लाभतात. जीवननिष्ठांविषयी साशंक झालेल्या संभ्रमित वर्तमानावर केलेले हे भाष्य आहे.
 पळशीकरांच्या रचनाचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भारतीय कलापरंपरेचा धागा आजच्या जगाशी बेमालूमपणे जोडलेला दिसतो. भारतीय परंपरा-प्रतीकांपेक्षा भारतीय जीवनदृष्टी या रचनाचित्रांमध्ये जाणवते. या प्रतिमा-प्रतीकांना पाश्‍चात्त्य नीतिमूल्यांचे, आधुनिक मानसशास्त्राचे संदर्भही आहेत. ‘सिनर्स डिव्हाइन’ या चित्रातील नवविवाहित जोडप्याच्या चित्रणात पवित्र पापी या शब्दांमधून स्त्री-पुरुष नात्यातील सृष्टिधारणेचा मंगल भाव आणि लैंगिक आकर्षणाची अपराध भावना यांतला जो विरोध आहे, त्यातून हे सारे संदर्भ सूचित होतात.
 ते १९७० च्या दशकात अमूर्त चित्रांकडे वळले. पळशीकरांच्या बाबतीत कला हे साध्य नसून आत्मशोधाचे ते एक साधन होते. त्यामुळे मूर्त जगातील साऱ्या
 परिचित प्रतिमा-प्रतीकांपासून रंग आणि ध्वनीसारख्या मूलभूत अमूर्त घटकांपर्यंत त्यांचा प्रवास झाला. एकीकडे तत्त्वज्ञान, तंत्रयोगातील बीजाक्षर मंत्र यांचा अभ्यास आणि दुसरीकडे हा अनुभव चिन्हात्मक पद्धतीने दृश्य अवकाशात पकडण्याची धडपड त्यांच्या अमूर्त चित्रांमध्ये दिसते. पळशीकरांनी ‘चित्रानुभूती’ या त्यांच्या लेखात सांगितल्याप्रमाणे कुठलीही शक्ती पूर्णतया संपत नाही. निर्माणशक्तीची मर्यादा संपली तरी थोडीतरी शक्ती शिल्लक राहतेच. अमृताचा घट आणि एखादा बिंदू यांचे सामर्थ्य सारखेच असते. योगसाधनेतून या शेषशक्तीचे दर्शन घडेल असे पळशीकरांना वाटले आणि ते नाद आणि बिंदू यांच्या नात्यातील रहस्य शोधण्याच्या मागे लागले. मंत्रोच्चार आणि रंग यांच्या बाबतीत विचार करताना मंत्रयुक्त प्रतीके, बीजाक्षरे आणि रंगसंगती यांचा ते विचार करू लागले. शब्दाचे, शब्द-प्रतिमेचे रूपांतर नादात, नादाचे बिंदूत आणि बिंदूचे कलेपलीकडच्या अतीताच्या अनुभवात, अशी पळशीकरांची धारणा होती. पळशीकरांच्या म्हणण्यानुसार, आत्मसमर्पण हाच त्याचा अंतिम टप्पा असू शकतो.
 या काळातली त्यांची चित्रे म्हणजे ‘कलर अॅण्ड साउण्ड’ची मालिका आहे. ‘क्लीं’ (१९६८, १९८३), ‘र्‍हीं’ (१९७०), ‘श्रीं’ (१९७२), ‘कलर अॅण्ड साउण्ड’ (१९७१, १९७३, १९७४) अशा त्यांच्या चित्रांमधून ध्वनीच्या रूपाने बीजाक्षरे येतात. त्यामुळे त्यांची गणना काही जाणकारांनी तंत्र आर्ट शैलीच्या चित्रांमध्ये केली. परंतु पळशीकरांना तंत्र आर्ट हा प्रकारच मुळी कलाप्रकारात मोडतो असे कधी वाटले नाही. विशेषत: तंत्र आर्ट शैलीतील ‘सेक्स’ अथवा कामभावनेचा समावेश त्यांना मानवण्यासारखा नव्हता.
 मालिकेतून पळशीकरांनी ध्वनी आणि रंग एकमेकांशी कसे निगडित आहेत हे दाखवले. ध्वनी आणि प्रकाश ही ऊर्जेची रूपे आपल्याला लहरीच्या रूपाने जाणवतात. ऊर्जेला आकारमान आणि वस्तुमान नसते. त्याला आकारमान येत असावे ते ‘हिग्ज बोसॉन’ असे नामकरण केलेल्या अज्ञात कणामुळे असे संशोधन नुकतेच पुढे आले आहे. कलेच्या बाबतीत पळशीकरांनी प्रकाशाच्या ऊर्जेला रंग व पोताने दृष्टिगोचर केले आणि आकारमान दिले ते तंत्र आर्टमधील बीजाक्षर चिन्हांनी. पण या ऊर्जेच्या वैश्‍विक घटिताला ते विज्ञानाच्या भूमिकेतूनही पाहत होते हे ‘फ्रीडम’ (१९७४) आणि ‘E
 = mc2 या चित्रांमधून दिसून येते.
 एक कलाशिक्षक म्हणून पळशीकरांचा अनेक विद्यार्थ्यांवर आणि चित्रकारांवर प्रभाव पडला. त्यांचा व्यासंग, शोधकवृत्ती आणि जीवनमूल्ये अनेकांना मार्गदर्शक ठरली. भारतीय तत्त्वज्ञान व धर्म, कांटची ‘सौंदर्यमीमांसा’, आंद्रे मालरोचे ‘द व्हॉइसेस ऑफ सायलेन्स’, फ्रिज्ताव क्राप्राचे ‘ताओ ऑफ फिजिक्स’ अशा पुस्तकांच्या वाचनातून त्यांनी स्वत:चे विचारविश्‍व समृद्ध केले आणि विद्यार्थ्यांनाही हा वैचारिक वारसा दिला. शिक्षकी पेशात अनन्यसाधारण असे त्यांचे  योगदान अनेक विद्यार्थ्यांना मिळाले. त्यांची प्रात्यक्षिके तर अनेकांना एक पर्वणीच असायची. समकालीन रझा, तय्यब मेहता, डी.जी. कुलकर्णी, अकबर पदमसी, मोहन सामंत, गायतोंडे असे अनेक चित्रकार पळशीकरांचा आदर करायचे.
 खेड्यात बालपण गेलेल्या या कलासाधकाने कलेतील शारदेचे जीवनव्यापी तत्त्व ओळखले आणि अत्यंत कठोर परिश्रम करून तिला प्रसन्न करून घेतले. चित्रकार प्रभाकर कोलते, काशीनाथ साळवे, प्रभाकर बरवे, दिलीप रानडे यांसारखे अनेक स्वत:ला पळशीकरांचे विद्यार्थी संबोधण्यात धन्यता मानतात. पळशीकरांचे मुंबईत निधन झाले.

- अरविंद हाटे, दीपक घारे

 

संदर्भ
संदर्भ : ‘अॅन स्ट्रे्च्ड  कॅनव्हास’ २००७, बोधना आर्टस् फाऊंडेशन प्रा.लि. मुंबई.
पळशीकर, शंकर बळवंत