Skip to main content
x

पंडे, बळीराम कृष्ण

ळीराम कृष्ण पंडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील मोहपा या गावी झाला. श्रीमंती थाट असणाऱ्या कृष्ण यांचा मालगुजारीचा व्यवसाय होता. त्यांना तबला-मृदंगाची मनापासून आवड होती. मुलाने तालज्ञ होऊन घराण्याचे नाव राखावे यासाठी मुलाला योग्य गुरू शोधून शिक्षण देण्याच्या उद्देशाने कृष्णराव गाव सोडून नागपूरला आले.

बळीराम पंडे यांनी नागपूरला अलकुटकर बुवांजवळ बरीच वर्षे मेहनत करून पानसे घराण्याचा शुद्ध बाज आत्मसात केलाच, शिवाय सखारामबुवा आगले आणि शंभुप्रसाद पखवाजी या गुणिजनांकडून मार्गदर्शन घेऊन लय-ताल व गणितशास्त्रात नैपुण्य मिळविले. श्रीमंत राजे रघुजीराव भोसले हेे रसिक व कलाकारांचे चहाते असल्याने त्यांनी पंड्यांना दरबारी संगीतज्ञ म्हणून नेमले. त्यामुळे लाहोरला तबलानवाज फकीरबक्ष यांच्याशी पंड्यांचा परिचय झाला. कलकत्त्याला स्वामी विवेकानंदांच्या गायनाला त्यांनी  तबला संगत करून खूप प्रशंसा मिळविली.

ऐश्वर्यसंपन्न व जमीनदार असलेले बळीराम पंडे  साधे, शांत, निरभिमानी, मनमिळाऊ होते आणि अत्यंत आतिथ्यशील, तसेच लोकसंग्रही होते. त्यामुळे त्यांचे घर म्हणजे कलाकारांचे माहेरघरच होते.  बऱ्हाणपूरकर बुवा, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खाँ, नत्थन खाँ, अलकुटकर बुवा, हरिभाऊ घांग्रेकर, वल्यावस्ताद इ. अनेकांचा मुक्काम त्यांच्याकडेच असे. नेहमी चालणार्‍या बैठकींमुळे त्यांचे घर सदैव स्वर-तालाने निनादत असे. गृहस्थ जीवनात मात्र पंडे दुर्दैवी ठरले. त्यांची पत्नी व एकुलता एक मुलगा  परलोकवासी झाले. पुनर्विवाह न करता त्यांनी सारे आयुष्य संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी वेचले. 

बळीराम पंडे यांनी १५ मार्च १९२६ रोजी  ‘बलवंत वादन कलाभुवन’ या नावाने संगीत विद्यालय सुरू केले. नऊ वर्षे त्यांनी स्वत: विद्यालयाचे संचालन करून बराच शिष्यपरिवार तयार केला. बाळासाहेब आठवले, शांताराम यावलकर, नीळकंठराव मूर्ते, कृष्णराव दलाल, गंगाराम पखावजी हे त्यांपैकी काही जण होत.

पंडे यांची शिक्षणपद्धती कडक होती. तालाचे विशिष्ट बंधन, हातावर टाळी देऊन बोल मुखोद्गत करणे, लयकारी अंगी बाणवणे व गणित पक्के करणे हे त्यांच्या शिकवण्याचे आणि पानसे घराण्याचे वैशिष्ट्य होते. पाठ पूर्णत: पक्का झाल्यावरच ते विद्यार्थ्याला तबल्याला हात लावू देत. हातावरचा ठेका अनेक दिवस चाले.

नि:स्पृहपणा, निष्पक्षता व निस्संकोचपणा हे त्यांचे शिक्षणाविषयीचे तत्त्व होते. वादनाचार्य पं. बळीराम पंडे यांनी पानसे घराण्याचा शुद्ध बाज अंगी बाणवला. तबला-मृदंग वादनशैलीचा  नागपूर व इतरत्र प्रसार करण्याचे श्रेय त्यांचेच आहे.

वि. ग. जोशी

पंडे, बळीराम कृष्ण