Skip to main content
x

पंडित, भर्तृहरी त्रिंबक

    र्तृहरी त्रिंबक पंडित यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या गावी झाला. त्यांचे वडील पारवा येथील पारवेकर देशमुख संस्थानिकांकडे मालमत्ता व्यवस्थापक म्हणून काम पाहत असत. भर्तृहरी पंडित यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी व पारवा येथे पार पडले. नागपुरातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी एम.एस्सी., एम.ए., ए.एम.आय.र्उ. अशा पदव्या प्राप्त केल्या. हैद्राबादमधील निजामाचे सैन्य ‘रझाकार’ म्हणून ओळखले जाई. हे रझाकार प्रजेला विनाकारण हल्ले करून त्रास देत असत. पंडितांची मित्रमंडळी व ते स्वत: या काळात या रझाकारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवीत. त्यांच्यामुळे यवतमाळचा टापू रझाकारांपासून सुरक्षित राहिला होता.

     जून १९५५मध्ये मद्रास सॅपर्समध्ये इंजिनिअरिंग शाखेत सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांनी सेवेस सुरुवात केली. १९५९ मध्ये पुणे येथील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली व १९६४ मध्ये त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमधून प्रशिक्षण घेतले. नागालँड आणि मणिपूर येथील बंडखोरीविरोधी आघाडीच्या सैनिकांच्या नेमणुका करण्यामध्ये आणि सैनिकी मुख्यालयाच्या सैनिकी कारवायांची धोरणे ठरविण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९७१ च्या भारत-पाक युद्धात इंजिनिअर रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले. या वेळी पश्चिमेकडील आक्रमणाविरुद्ध मोहिमा पार पाडताना दाखविलेल्या शौर्याबद्दल व श्रेष्ठ दर्जाच्या नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीरचक्र’ देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, कॉम्बॅट महाविद्यालय व इराकमधील भारतीय सैनिकांच्या प्रशिक्षण पथकासाठी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले.

     नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षण १९८४ मध्ये पूर्ण केल्यानंतर पंडित यांच्यावर जनरल कॅडरचे कार्य सोपविले गेले. राजस्थानमधील ब्रास टास्क व जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील अशा पूंछ विभागातील ‘ट्रायडंट’ या मोहिमेमध्ये त्यांनी सैनिकी आघाडीचे नेतृत्व केले. १९८९-९० या काळात पंजाबमधील अतिरेकी कारवायांमध्ये खूपच वाढ झाली होती. या वेळी ‘ऑपरेशन रक्षक’ ही मोहीम हाती घेऊन खलिस्तानवादी दहशतवादाचा त्यांनी पराभव केला.

     जुलै १९९० मध्ये मुख्यालयात ‘अ‍ॅडज्युटंट जनरल’ या पदावर त्यांची नेमणूक झाली. या काळात चीफ ऑफ स्टाफ या नात्याने त्यांनी सर्व सैनिकांच्या कल्याणकारी योजनांवर जातीने लक्ष पुरविले. सेवानिवृत्त सैनिकांच्या कल्याणासही त्यांनी या वेळी विशेष महत्त्व दिले. सैन्याचा विधि विभाग आणि वैद्यकीय सेवा विभाग (१०९ इस्पितळे व सुमारे ५००० वैद्यकीय अधिकारी) यांचे नियंत्रणही त्यांनी या नेमणुकीदरम्यान केले. याशिवाय सैनिकी गृहनिर्माण प्रकल्प, विमा निधी प्रकल्प व शैक्षणिक प्रकल्प यांचे ते पदाधिकारी होते. या काळात सैनिकांसाठी देशभरात सुमारे १२,००० घरे बांधली गेली; विमा निधी प्रकल्पामध्ये १५०० कोटी रुपये गुंतविले गेले व सैनिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देशात ६० सैनिकी शाळा सुरू झाल्या.

     सैनिकांसाठी त्यांनी केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे १९९१मध्ये प्रजासत्ताक दिनी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविले गेले. महाराष्ट्र शासनानेही त्यांना १९९०मध्ये ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. दि.२९ फेब्रुवारी १९९२ या दिवशी ते सेवानिवृत्त झाले.

     सैन्यात केलेल्या कामगिरीची योग्य दखल घेत भारत सरकारने यवतमाळ येथे त्यांना ४००० चौरस फुटांचा भूखंड देऊ केला. पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपला हा भूखंड त्यांनी विनामोबदला स्थानिक प्रशासनास परत केला. त्या जागेवर आज ‘वीरमाता रमाबाई पंडित वसतिगृह’ ही इमारत उभी आहे.

     निवृत्तीनंतरचे आयुष्यही त्यांनी समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. अपंग जवानांसाठीची क्वीन मेरी तंत्रशिक्षण संस्था, पुण्यातील सैनिकी तंत्रसंस्था, पुण्यातील मध्यवर्ती धोरण संशोधन संस्था, रत्नागिरीतील फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी दिल्लीतील केंद्रीय सैनिकी शाळेची मध्यवर्ती समिती व महाराष्ट्र राज्य सैनिकी समिती या संस्थांमध्ये ते स्वयंसेवी कार्य करत आहेत.

     - ज्योती आफळे

पंडित, भर्तृहरी त्रिंबक