Skip to main content
x

पंडित, नारायण पैकाजी

पंडित, बाबाजी महाराज

  र्यधर्माचे श्रेष्ठत्व तर्कशुद्धरीत्या पटवून देण्याचे गुरूने स्वीकारलेले अधिसार व्रत तेवढ्याच समर्थपणे चालविणारे आधुनिक संतश्रेष्ठ बाबाजी महाराज म्हणजेच नारायण पैकाजी पंडित यांचा जन्म पौष शुद्ध सप्तमी शके १८०७ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. पंडित घराणे हे मूळचे झाशी या गावचे होते. यांचे पूर्वज झाशी येथे सरदार होते.

१८५७ च्या बंडानंतर हे घराणे विखुरले व बाबाजी महाराज विदर्भातील चंद्रपूर येथे स्थिरावले. बाबाजी महाराजांचे प्राथमिक व शालेय शिक्षण चंद्रपूर येथे झाले, तसेच महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला हिस्लॉप महाविद्यालय येथे झाले. महाराजांचे मोठे बंधू दत्तात्रेय पंडित हे नागपूरला होते. आपल्या अल्पशा वेतनातून त्यांनी भावाचे शिक्षण केले. घरच्या आध्यात्मिक वातावरणामुळे ते दत्तात्रेयाची उपासना करीत व गुरुचरित्राची पोथी नित्यनेमाने वाचीत.

एकदा प्रज्ञाचक्षू श्री. गुलाबराव महाराज नागपूर येथे आले असता बाबाजी महाराज त्यांचे मित्र दत्तात्रेय खापरे यांच्या सोबत त्यांच्या दर्शनाला गेले. प्रथम भेटीतच गुलाबराव महाराजांनी या आपल्या शिष्याला ओळखले. सात-आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर महाराजांची भेट घडली. ज्या गुरूंच्या शोधात आपण फिरतो आहोत, ते हेच गुरू याचा साक्षात्कार बाबाजी महाराज यांना झाला. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या उक्तीनुसार गुरु-शिष्याचे नाते जुळून आले. गुलाबराव महाराजांची ही भेट बाबाजी यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

एकदा कात्यायनी व्रताच्या ठिकाणी बाबाजी गेले व व्रतोपासना संपल्यावर गुलाबराव महाराजांचा निरोप घेण्यास गेले. त्या वेळी गुलाबराव महाराज त्यांच्यावर रागावले व म्हणाले, ‘‘मी तुला बोलावलेच कधी होते रे? जातोस तर जा.’’ कोवळ्या वयाच्या बाबाजी महाराजांना ते शब्द लागले. ही अवस्था त्यांनी आपल्या अभंगगाथेत वर्णिली आहे:

‘‘पाहोनी मातेचे सरोष वदन । आला तै दाटून कंठ दु:खे॥

वाचा पांगुळली करवेना गोठ । कापू लागे ओठ थरथरा॥

धरवेना धीर कोसळले रडे । लज्जेचे बिरडे सुटोनिया॥

ज्ञानेश्वर कन्या स्तनी फुटे पान्हा । पाहोनिया तान्हा ओसंगा घे॥’’

अशा प्रकारे गुरूने शिष्याला पोटाशी धरले व हे बंधन दृढ झाले.

बाबाजी महाराजांचे लग्न रामचंद्र पुसदकर यांची कन्या मीरा हिच्याशी झाले. लग्नानंतर तिचे ‘गिरिजा’ असे नाव ठेवण्यात आले. बाबाजी महाराजांचे मन मात्र गुलाबराव महाराजांकडे लागले होते. नोकरीतून मिळणारा संपूर्ण पगार महाराजांसाठी खर्च होत असे. एकदा कात्यायनी व्रतासाठी एक महिन्याची रजा नोकरीतून मिळेना म्हणून बाबाजींनी राजीनामा दिला आणि सत्संगाला वाहून घेतले.

वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी गुरूंच्या सेवेला, भक्तीला प्रारंभ केला. त्यांचे कपडे धुणे, पूजेची तयारी करणे, स्नानास पाणी देणे, स्वयंपाक करणे इत्यादी कामे ते करीत असत. नुसती गुरूचीच नाही, तर गुरुबंधूची सेवाही करीत.

गुलाबराव महाराजांना बाबाजी  अनेक ग्रंथ वाचून दाखवीत. त्यांच्या प्रवचनांची टिपणे काढीत व ती सुवाच्य अक्षरात लिहून ठेवत. गुलाबराव महाराजांनी एकदा या शिष्याची परीक्षा घ्यायचे ठरवले व पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांपैकी तुला काय पाहिजे असे विचारले. यावर बाबाजी महाराजांनी, ‘‘सद्गुरुचरणाशिवाय काहीही नको,’’ असे उत्तर दिले.

वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी गुलाबराव महाराजांचे निधन झाले. बाबाजी महाराज त्यांच्या अस्थी घेऊन प्रयागला गेले. त्या वेळी रात्री महाराजांनी स्वप्नात दर्शन दिले व अंगार्‍याची पुडी प्रसाद म्हणून दिली. सकाळी उठल्यावर अंथरुणात खरोखरच एक पुडी मिळाली. खरे तर, गुलाबराव महाराजांनी मधुराद्वैत संप्रदायाचे अधिकारी म्हणून बाबाजी महाराजांनाच नियुक्त केले होते. आपल्या पंचशिष्यांमधील मुख्य स्थान बाबाजी महाराजांना दिले. ‘र्‍हीं नारायण नम: र्‍हीं’ या बीजाक्षर मंत्राने गुलाबराव महाराजांनी बाबाजी महाराजांना वंदन केले आहे.

श्री गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून बाबाजी महाराजांची नियुक्ती झाली. त्यांनी विद्वज्जड अशा अनेक ग्रंथांवर निरूपणे सांगितली, ही एक प्रकारे त्यांची परीक्षाच होती.त्यांच्या अभ्यासासाठी, लेखनासाठी बाबाजींना शंकराचार्यांकडून  ‘वेदान्त केसरी’ या उपाधीने गौरविण्यात आले. धर्मग्रंथांचा, तत्कालीन विद्वानांच्या मतांचा अभ्यास, पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा सखोल अभ्यास असे त्यांचे अभ्यासू जीवन होते. अमरावतीच्या ज्ञानेश्वर ग्रंथालयाच्या तळघरात बाबाजी महाराज तासन्तास अभ्यास करीत. बाबाजी महाराज यांंनी काढलेली टिपणे, आजही उपलब्ध आहेत. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या उक्तीनुसार ते साधार शास्त्रचर्चा करीत.

उत्सव व व्रतांमध्ये भजन, भूपाळ्या हे ताला-सुरात व्हावे यासाठी अमरावतीच्या नामदेवबुवा या गायकाकडे ते गायन शिकले. स्वत: रचलेला एक अभंग ते रोज गात असत. त्यांनी काही काळ आयुर्वेदाच्या ग्रंथांचा अभ्यास केला व समाजोपयोगी आयुर्वेदिक औषधांचा विनामूल्य सदुपयोग करून अनेकांना रोगमुक्त केले. त्यांनी अभ्यासासोबतच भामती, अद्वैतसिद्धी, बृहदारण्यवार्तिक अशा विद्वज्जड विषयांचे अध्यापन केले.

‘भगवद्भक्ती सौरभ’, ‘नारदभक्तिसूत्र’, ‘प्रीतिनर्तन’, ‘चांगदेव पासष्टी’ अशा अनेक ग्रंथांवर सोपी निरूपणे शिष्यांना ऐकवली. वेदान्तातील जटिल प्रमेये, अभंग, ओव्या यांवर त्यांचे प्रभुत्व होते. अलंकारिक भाषा न वापरता ते पारदर्शक शास्त्रीय मांडणी करीत. त्यांच्या ग्रंथलेखनामध्ये ‘आर्यधर्मोपपत्ती’ (१९२६), ‘हरिपाठरहस्य’ (१९५४), ‘अमृतानुभव कौमुदी’ (१९५६), ‘श्री ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका’ : खंड १ ते ५ (१९६२), विविध लेखसंग्रह, प्रथम व द्वितीय खंड (१९६५), ‘अभंगगाथा’ (१९७०), ‘भागवतावरील प्रवचने’ (१९८८), ‘पंचदशीवरील प्रवचने’ (१९८८) अशी अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांनी श्री गुलाबराव महाराजांचे व ज्ञानदेवांचे वाङ्मय नव्या आंग्लविद्याविभूषित पिढीला समजावे अशा रितीने सोप्या, सुलभ भाषेत मांडले.

गूढार्थदीपिका हे ज्ञानेश्वरीवरील भाष्य आहे. अभ्यासक, वाचकांना ज्ञानेश्वरीच्या अर्थासोबतच ज्ञानेश्वरीतून व्यक्त होणारा गूढार्थ कळावा हा या ग्रंथापाठीमागचा उद्देश आहे. बाबाजी महाराज प्रत्येक श्लोकामध्ये दडलेला गूढ अर्थ विशद करतात. सोपी, रसाळ व प्रासादिक भाषा या भाषिक वैशिष्ट्यांसह भक्तिमार्गावरील शास्त्रीय अधिष्ठानासह तो ग्रंथ प्रसिद्ध आहे. सुबोध शैलीतील चेतोहर विवेचन म्हणजेच बाबाजी महाराजांचा ‘हरिपाठ रहस्य’ हा ग्रंथ होय. हरिपाठाच्या अठ्ठावीस अभंगांत वेदान्ताची अनेक प्रमेये ठासून भरली आहेत. या प्रमेयांवरील विवरण बाबाजी महाराजांनी हरिपाठ रहस्यात केले आहे.

‘अमृतानुभव’ या ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथावरील अजोड समीक्षा म्हणजेच ‘अमृतानुभव कौमुदी’ हा ग्रंथ होय. श्री शंकराचार्यांचा वेदान्त विचार, ज्ञानेश्वरीतील वेदान्त विचार हे एकरूप आहेत हे अभ्यासकांच्या निदर्शनास आणून देणे हे कौमुदी लेखनापाठीमागचे उद्दिष्ट होते. वारकरी संप्रदायाची बहरलेली शाखा म्हणजेच मधुरा संप्रदाय होय. गुलाबराव महाराजांनी याची स्थापना केली व त्याची धुरा बाबाजी महाराजांनी वाहिली. जन्माष्टमी, कात्यायनी व शिवरात्र असे तीन मोठे उत्सव आजही साजरे केले जातात. अनुग्रहींना आणि भक्तांना याचा लाभ होतो. श्रीकृष्णमूर्ती व श्रीज्ञानेश्वर पादुका एवढेच भांडवल ठेवून गुरूची आज्ञा पालन करीत, बाबाजींनी तन-मन व वाणीद्वारे संप्रदायाची पताका फडकवीत ठेवली.

बाबाजी महाराजांचे पुत्र वामन नारायण पंडित हे सुद्धा वेदशास्त्रसंपन्न व भाषाशास्त्रज्ञ आणि कोशकार होते; परंतु बाबाजी महाराजांना घराण्यातील वारस मान्य नव्हता.

आज बाबाजी महाराजांचे पुतणे पुरुषोत्तम दत्तात्रेय पंडित यांनी ‘भागवत धर्माची तत्त्वमीमांसा’ या विषयावर प्रबंधलेखन केले आहे व हा अभ्यास वारसा पुढे चालवला आहे. महाशिवरात्रीच्या, नवरात्राच्या पहिल्या दिवशी पार्थिव पूजा करून ‘महादेवाय नम: विसर्जनम्’ असे म्हणून महाराजांनी इहलोकीची यात्रा संपवली.

 — सुपर्णा कुलकर्णी

पंडित, नारायण पैकाजी