Skip to main content
x

पंडित, शंकर पांडुरंग

     शंकर पांडुरंग पंडित यांचा जन्म सावंतवाडी संस्थानातील बांबुली या गावी एका सारस्वत कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाकडे कुलकर्ण्याचे काम होते. प्रारंभी पंडितांनी तोच व्यवसाय केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याच गावी झाले तथापि इंग्लिश शिकण्याच्या तीव्र इच्छेने ते मुंबईला गेले आणि त्यांनी १८६५ मध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयामधून एम.ए.ची पदवी संपादन केली. ते त्या महाविद्यालयाचे फेलो झाले. नंतर पुण्यास येऊन त्यांनी दक्षिणा प्राइझ कमिटीचे कार्यवाह म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. त्याच काळात ते संस्कृत आणि जर्मन भाषा शिकले. १८६८ साली त्यांची महाविद्यालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. लवकरच प्राच्य भाषांचे प्राध्यापक म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आली. १८७४ मध्ये युरोपमध्ये भरलेल्या जागतिक परिषदेसाठी त्यांना ब्रिटिश सरकारने पाठवले.

     परिषदेहून परतल्यावर मुंबईत आयकर आयुक्त (Income Tax Collector) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भारतीय भाषांचे अनुवादक (Oriental Translator) म्हणूनही त्यांनी सरकारसाठी काम केले. नंतर पोरबंदर संस्थानचे प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब बहाल करण्यात आला. अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचा ‘सन्माननीय सदस्य’ हा बहुमानही त्यांना प्राप्त झाला.

     डेक्कन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करीत असताना मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांच्या चिकित्सीत आवृत्त्या त्यांनी तयार केल्या. यामध्ये रघुवंश, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, गउडवहो, कुमारपालचरित, द्वया श्रयकाव्य यांचा समावेश आहे. तुकाराम महाराजांची गाथाही त्यांनी प्रकाशित केली. ऋग्वेदातील काही सूक्तांचे मराठी आणि इंग्लिश भाषांतर ‘वेदार्थयत्न’ या नावाने प्रसिद्ध झाले. ते बहुधा त्यांनी केले असावे, तथापि आपला उल्लेख त्यांनी टाळला असावा. प्रा. लुई रनू यांच्या Bibliographie Vedique या संदर्भग्रंथामधील उल्लेखावरून हा तर्क करणे शक्य आहे. या अनुवादाची प्रशंसा करणारी परीक्षणे आढळतात.

     पंडित यांचे अथर्ववेद विषयक कार्य हे प्राच्यविद्येच्या अभ्यासात त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आहे. अथर्ववेदाच्या शौनक संहितेची पहिली चिकित्सित आवृत्ती रुडॉल्फ रोथ (R. Roth) आणि व्हिटनी (W.D.) यांनी १८५६ साली बर्लिन येथून प्रसिद्ध केली. त्यांना उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांवर ही आवृत्ती आधारित होती. पंडित यांनी शौनक संहितेची अनेक हस्तलिखिते गोळा केली. महाराष्ट्र, गुजरात, वाराणसी, ग्वाल्हेर इत्यादी ठिकाणी असलेल्या नामवंत अथर्ववेदी पंडितांना पाचारण करून त्यांच्या पठणाची नोंद घेतली. सायणाचार्य यांच्या अथर्ववेद भाष्याचीही हस्तलिखिते जमा करून अथर्ववेदाच्या शौनक संहितेची सायणभाष्यासह पहिली चिकित्सक आवृत्ती मुंबई येथून या काळात प्रकाशित केली. देशो-देशीच्या विद्वानांनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली.

     — डॉ. श्रीकांत बहुलकर

पंडित, शंकर पांडुरंग