Skip to main content
x

पोतदार, अनुराधा बाळकृष्ण

  नुराधा बाळकृष्ण पोतदार यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण अधिकारी वि. द. घाटे यांच्या त्या कन्या, तर विख्यात दत्तकवी हे अनुराधाबाईंचे आजोबा होय.

त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. एम. ए., पीएच. डी. पदवी संपादन केली. संशोधनात्मक कामासाठी त्यांनी ‘मराठीचा अर्थविचार’ हा फारसा न हाताळता गेलेला विषय निवडला. डॉ.शं.गो. तुळपुळे यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रबंध-लेखन केलेे. वर्गमित्र असलेल्या बाळकृष्ण विष्णू पोतदार यांच्याशी परिचयोत्तर प्रीतिबंध निर्माण झाले. जातिभिन्नतेमुळे होणारा प्रचंड विरोध पत्करूनच उभयता विवाहबद्ध झाले. पोतदार हे राजाराम महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक तर कोल्हापूरच्याच शाहू महाविद्यालयात अनुराधाबाई मराठीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. पुढे पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून २५ वर्षे काम पाहिले. काही काळ मराठी विभागप्रमुख म्हणूनही काम केले.

अनुराधाबाईंचा मूळचा पिंड काव्यलेखनाचा होय. मनाला भावलेले आणि त्या-त्या वेळेच्या सामाजिक स्थितीनुसार काव्यलेखनासाठी विविध विषय हाताळले गेले. प्रीती, वेदना, दुःख ह्या भावना त्यांनी तरलपणे काव्यातून मांडल्या आहेत. त्यांनी चळवळीच्या, क्रांतिकारी लढ्यांच्या काळात देशप्रेमाचे विषय काव्यातून हाताळले.

‘कॅक्टस फ्लॉवर’, ‘मंजधार’, ‘आवर्त’ अशा काव्यसंग्रहांतून अनुराधाबाईंची संयत, ऋजू, पण वास्तवता दाखविणारी काव्यप्रतिभा विलक्षण आनंद देते. स्त्री-जीवनातील दुःख, वेदना दर्शविणारी त्यांची कविता आहे. लहानशा घटनेला काव्यात गुंफून वास्तवात काय घडते आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित करण्याचे सामर्थ्य अनुराधाबाईंच्या कवितेत निश्चितपणे आहे.

अनुराधाबाईंनी संपादित केलेले मान्यवर कवींच्या कवितांवर आधारित असलेले काव्यग्रंथ अजूनही विद्यापीठात अभ्यासले जातात. ‘पद्मपत्र’ (कवयित्री संजीवनी मराठे), ‘मृगधार’ (वि. म. कुलकर्णी), कुसुमावतींच्या काव्य व इतर लेखनावर आधारित ग्रंथांचे साहित्य अकादमीसाठी अनुराधाबाईंनी संपादन केलेले आहे.

अनुभवातून तरलस्पर्शी आकलन, आस्वादन आणि मग प्रकटन अशा पद्धतीचा काव्य-लेखनाचा ढाचा असलेल्या कवयित्री म्हणजे डॉ. अनुराधा बाळकृष्ण पोतदार. संवेदनशील, कविमनाच्या, ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या शिक्षिका म्हणूनही अनुराधाबाईंनी समाजमनात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. 

- विनया देसाई

पोतदार, अनुराधा बाळकृष्ण