Skip to main content
x

पप्पू, रघुनाथ सुबराव

     रघुनाथ सुबराव पप्पू यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून भू-विज्ञान या विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर डेक्कन महाविद्यालयामधील पुरातत्त्व विभागात ते विद्यार्थी म्हणून आले. तेथे त्यांनी प्रा.ह.धी.सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली १९६६ मध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘प्लिस्टोसिन स्टडीज इन दी अपर कृष्णा बेसिन’ असा होता. ह्या प्रबंधासाठी त्यांनी कृष्णा नदीच्या खोर्‍याच्या उगमाकडील भागात म्हणजे सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले. याखेरीज कर्नाटकातील काही भागांतही या संशोधनाची व्याप्ती होती.

     डेक्कन महाविद्यालयात पुरातत्त्व विभागात व्याख्याता या पदावर नेमणूक झाल्यानंतरच्या काळात पप्पू यांनी प्रामुख्याने महाराष्ट्राबाहेर पुढील संशोधन केले. त्यांचे कर्नाटकातील बदामी येथील व घटप्रभा नदीच्या खोऱ्यातील अश्मयुगीन संस्कृतीचे पुरातत्त्वीय भू-विज्ञानाच्या आधारे केलेले विश्वेषण अतिशय महत्त्वाचे आहे. रघुनाथ पप्पू यांनी पुरातत्त्वीय निष्कर्षांना मदत होईल अशा प्रकारची नवीन पद्धत महाराष्ट्रातील इनामगाव या ठिकाणी वापरली. या पद्धतीला ‘साइट कॅचमेन्ट अ‍ॅनॅलिसिस’ असे म्हणतात.

     एखाद्या पुरातत्त्वीय स्थळाच्या आजूबाजूला सखोल व बारकाईने निरीक्षणे करून त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी कोणती संसाधने (रिसोर्सेस) कोणत्या प्रकारे उपयोगात आणली असावीत याबद्दल अनुमाने काढली जातात. इनामगाव येथे पप्पू यांनी या पद्धतीचा वापर यशस्वीपणे केला. अशाच प्रकारचे संशोधन त्यांनी गुजरातमधील कुंतासी या सिंधू संस्कृतीच्या पुरातत्त्वीय स्थळावरदेखील केले.

     दीर्घकाळ अध्यापन करून रघुनाथ पप्पू १९९३ मध्ये प्रपाठक या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. पुरातत्त्वीय भूविज्ञान (जिओआर्किओलॉजी) व भूरूपविज्ञान (जिओमॉर्फोलॉजी) या त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात पप्पू यांचे ५० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

     याशिवाय त्यांनी दोन पुस्तके लिहिली असून संपूर्ण भारतीय उपखंडातील ‘अश्युलियन’ या अतिप्राचीन अश्मयुगीन संस्कृतीचा सर्वंकष आढावा घेणारे ‘अश्युलियन कल्चर इन पेनिनस्युलर इंडिया’ हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे, पप्पू यांनी पुरातत्त्वीय भू-विज्ञानाचे महत्त्व विशद करणारी मराठीतील लेखांची एक मालिका ‘संशोधक’ या नियतकालिकात लिहिली.

डॉ. प्रमोद जोगळेकर

पप्पू, रघुनाथ सुबराव