Skip to main content
x

पराडकर, मोरेश्वर दिनकर

     मोरेश्वर दिनकर पराडकर यांचा जन्म मराठीतील ख्यातनाम पंतकवी कविवर्य मोरोपंत यांच्या सातव्या पिढीमध्ये झाला. भाषा आणि पांडित्य यांचा वारसा त्यांच्याकडे अशा प्रकारे वशंपरंपरागतरीत्या आला.

     प्रकांड पंडित हे विशेषण ज्यांच्या नावामागे चपखलपणे बसू शकेल अशा मोरेश्वर दिनकर पराडकर यांचे भाषाभिवृद्धीतील योगदान मोठे तर आहेच पण मूलभूत स्वरूपाचेही आहे. संस्कृत भाषा आणि साहित्य यांचे गाढे अभ्यासक, हिंदी भाषेचे प्रचारक इंग्लिश आणि मराठी भाषांवर प्रभुत्व ही मोरेश्वर दिनकर पराडकर यांची विशेष ओळख आहे. भाषा विकासाच्या क्षेत्रात आवाक्याने मोठे आणि मूलभूत स्वरूपाचे संशोधन, लेखन करणारे अभ्यासक आज हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच असतील. डॉ. मो.दि. पराडकर दुर्मिळ आणि विद्वान अभ्यासकांपैकी एक होत.

     डॉ. मो.दि.पराडकर यांचा जन्म मराठवाड्यातील परभणीत आजोळी म्हणजे गोविंदराव नानल यांच्या घरी झाला. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा प्रदेश हैद्राबादच्या निजामाच्या अख्यत्यारीत होता. गोविंदराव नानल हे त्या काळामधले प्रसिद्ध वकील होते. वकिलीबरोबरच त्यांचे संस्कृत, उर्दू, मराठी, पर्शिअन या भाषा व या भाषांतील साहित्य यावर विशेष प्रेम होते. या प्रेमातूनच त्यांच्या घरी या भाषांमधील साहित्याचे समृद्ध ग्रंथालय निर्माण झाले होते.

     आजोबांच्या प्रेरणेतूनच केवळ पाच वर्षांचे असताना त्यांनी शारदोत्सवातील स्पर्धेत भाग घेऊन गीतेचा पंधरावा अध्याय म्हटला. या स्पर्धेत त्यांना कांस्य पदक मिळाले. गोविंदरावांच्या प्रोत्साहनातून व प्रेरणेतून पराडकर यांच्या मनात या अभ्यासाची ओढ निर्माण होत गेली. कुटुंबात सर्वांत लहान असल्याने ते सर्वच कुटुंबियांचे अतिशय लाडके होते. निजामशाहीच्या त्या दिवसातील शालेय जीवनात शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. पराडकर यांच्या उच्चारशैलीवर उर्दूचा परिणाम आजही जाणवतो. उर्दूच्या या प्रभावातूनच जीवनात पुढील वाटचालीतील हिंदी भाषा प्रचारक म्हणून काम करण्याची बीजे रोवली गेली.

     काही वर्षे परभणीला राहिल्यानंतर आपल्या वडिलांबरोबर पराडकर मुंबईला आले. त्यांचे वडील हे मध्यवर्ती पोस्ट कार्यालयात कामाला होते. बालवयातच साहित्य आणि संस्कृती यांबद्दलच्या आस्थेचे रंग मनात निर्माण झाले होते. परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये वडिलांनी त्यांना दाखल केले. त्या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक मो.वा.दोंदे यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा आणि शाळेतील संस्कृत शिकवणाऱ्या वाय.बी. जोशी यांच्या व्यासंगी अध्यापनाचा पराडकरांवर खोलवर संस्कार झाला. मो.वा.दोंदे हे पुढे नगराध्यक्ष झाले. पराडकर हे त्यांचे अतिशय आवडीचे विद्यार्थी होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पराडकर ६७% गुण मिळवून शालान्त परीक्षेत पहिले आले. त्याबद्दल त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली.

     शिष्यवृत्ती आणि उत्तम गुण मिळालेले असल्याने डॉ. पराडकर यांना माटुंग्याच्या राम नारायण रुइया महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. काही कौटुंबिक अडचणींमुळे पराडकर यांना नोकरी करून शिकणे भाग पडले. पण या महाविद्यालयीन कालखंडातही त्यांचे संस्कृत साहित्यातील व भाषेतील स्वास्थ्य टिकून होते. पदवीसाठी मुख्य विषय कोणता निवडायचा, असा प्रश्न समोर आला तेव्हा स्वाभाविकच संस्कृत विषय निवडण्याचे त्यांनी निश्चित केले. त्या काळी संस्कृत निवडणार्‍या विद्यार्थ्याला विशेष मान होता आणि बालवयापासून त्यांच्यावर संस्कृतचे संस्कारही झाले होते. रुईया महाविद्यालयात पराडकर यांना न.र. फाटक, द.के. केळकर, गोवर्धन पारीख अशा अत्यंत नावाजलेल्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि सहवास मिळाला. संस्कृत हा प्रमुख विषय घेऊन डॉ. पराडकर यांनी बी.ए.ची परीक्षा दिली. ते भाऊ दाजी पारितोषिकाचे आणि एस.जी. आचार्य शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले. याचा एक लाभ असा झाला की, संस्कृत विषय घेऊनच एम.ए. करण्याची त्यांना संधी मिळाली. एम.ए.च्या प्रथम वर्गाबरोबरच त्यांना त्यांच्याच महाविद्यालयात म्हणजे रुईयामध्ये शिकवायची संधी मिळाली.

     आपली संस्कृती आणि संस्कृत भाषा यांच्याबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत, असे त्यांच्या लक्षात आले. ऐहिक अभ्युदयासाठी झटण्याऐवजी जीवनाकडे वैराग्याने आणि तुच्छतेने आम्ही पाहतो, परलोकांबद्दल विचार करतो याचा परिणाम ज्ञानशाखा आणि विज्ञान यांच्याकडे दुर्लक्ष होण्यामध्ये झालेला दिसून येतो. हे दूर करणे आणि भारतीयांच्या जीवनसृष्टी संबंधाने योग्य त्या अभिमानास प्रोत्साहन देण्याची गरज आहे, याची खात्री पटल्यामुळे डॉ. पराडकर यांनी गेली सुमारे सहा दशके अनेक लेख लिहिले. प्रा. एच. डी. वेलणकर या संस्कृतमधील ख्यातनाम अभ्यासकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी १९५४ मध्ये प्राप्त केली.

     आपल्या अध्यापकीय कारकिर्दीत संस्कृत व अर्धमागधी या भाषांचे त्यांनी अनेक महाविद्यालयांतून अध्यापन केले. संस्कृत भाषेचे ख्यातनाम शिक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागास त्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यावाचस्पतीच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. वेदान्त व अलंकार या विषयांतील त्यांचे संशोधन महत्त्वाचे मानण्यात येते.

     संस्कृतमधील सर्व प्रकारच्या साहित्याचा परिचय करून देणारी ५२ भागांची आकाशवाणीवरील त्यांची मालिका अतिशय गाजली होती.

     पालघर येथे सोनोपंत दांडेकर यांच्या नावे नव्यानेच महाविद्यालय सुरू झाले होते. या महाविद्यालयात डॉ. पराडकर यांनी प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही वर्षे डोंबिवली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८५ साली ते निवृत्त झाले.

    १९४२ साली राष्ट्रभाषा कोविद या परीक्षेत सर्वप्रथम आल्यापासून त्यांनी हिंदी राष्ट्रभाषा प्रचारक म्हणून आपले काम एकीकडे चालू ठेवले होते. अर्थातच याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदी भाषेत व  साहित्यात त्यांना विलक्षण रस होता.

    १९५१ साली ते हिंदी साहित्यरत्न ही अत्यंत मानाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे मुंबई हिंदी विद्यापीठाचे अधिकारी आणि अखिल भारतीय हिंदी संस्थेचे कार्यवाह म्हणून त्यांच्या कर्तृत्वास वाव मिळाला. हिंदी  साहित्यातील अनेक नामवंत विद्वान संशोधक, कवी यांचा पराडकरांशी संबंध आला.

     १९८४ साली त्यांच्याकडे असणार्‍या कविवर्य मोरोपंत यांच्या हस्तलिखितांचा निर्णय घेण्याची वेळ आली, त्या वेळी त्यांच्या काकांनी ही हस्तलिखिते देणगीदाखल चांगल्या ग्रंथालयाला द्यावीत, असे सुचवले. याच दरम्यान डॉ. उषा देशमुख आणि मा.न.आचार्य या मराठीतील विद्वान मंडळींशी त्यांचा संबंध आला. या हस्तलिखितांचे महत्त्व, या विषयावर त्यांनी विवेचक लेख लिहिला. संस्कृतमधील डॉ.टी.एन.धर्माधिकारी, डॉ. जी.व्ही.पळसुले, डॉ.व्ही.एम.कुलकर्णी अशा अनेक संस्कृत पंडितांशी डॉ.पराडकर यांचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. डॉ.पराडकर यांचे प्रकाशित झालेले साहित्य हा स्वतंत्र निबंधाचा विषय ठरेल. लेख, शोधनिबंध यांची बरीच मोठी यादी त्यांच्या नावावर जमा आहे.डॉ. मो.दि. पराडकर यांची प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा अशी आहे

Similies in Manusmriti;

Malavikagnimitram- A Critical Study;

Ed. Studies in the Gita.

     मराठी  शाकुन्तल (कथा), मालविकाग्निमित्रम (कथा) (१९७८), भारतातील प्राचीन विद्यापीठे- दुसरी आवृत्ती (१९९०). संपादित- आर्याभारत ६ खंड, हरिवंश (१९६४), चतुराख्यान (१९८०), वाडेश्‍वर माहात्म्य (१९८१). हिंदी अनुवादित ग्रंथ - वैदिक संस्कृतिका विकास (१९५७), रवीन्द्रनाथ जीवनगाथा (१९६५), ऋक्सूक्तवैजयंती (१९६७), विवेकानन्दांची पत्रे (१९७०). संपादित - रजत जयंती ग्रंथ (१९६३), हिन्दी भाषा साहित्य और संस्कृती (१९८८).

डॉ. मोहन पाठक  / आर्या जोशी

पराडकर, मोरेश्वर दिनकर