Skip to main content
x

परांजपे, गोपाळ रामचंद्र

     प्रा.गोपाळ रामचंद्र परांजपे हे भौतिकशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि मराठी भाषेतून शास्त्रीय विषयांवर लेखन व प्रसार करणारे वैज्ञानिक होत. ते ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचे संस्थापक व अनेक वर्षे संपादक होते. मराठीमध्ये विज्ञान परिभाषानिर्मितीसाठी अखंड झटणारे कृतिशील व्यक्तिमत्त्व ही त्यांची विशेष ओळख होय.

     प्रा. परांजपे यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. १९०७ साली त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी संपादन करण्यासाठी प्रवेश घेतला. १९०८ साली प्रा. के.रा. कानिटकरांनी ‘शास्त्रीय उपकरण निर्मिती’ वर्ग सुरू केला. त्यामध्ये गो.रा. परांजपे व ना.म. आठवले या दोन विद्यार्थ्यांना ‘व्हिमशर्ट स्थिर विद्युत उपकरण’ बनविण्याचे काम देण्यात आले. या यंत्राचा प्रत्येक भाग त्यांनी आपल्या हातांनी बनवायचा होता. त्यासाठी धातुकाम, काचेला भोके पाडणे व यंत्राची जुळणी करणे ही सर्व कामे त्यांनी पार पाडली.

     हे दोघेही पुढे विज्ञान विषयांचे प्राध्यापक झाले. पण प्रयोग स्वत: हाताने करावयाचा, त्याची उपकरणे स्वत: बनवायची, ती मोडली तर दुरुस्त करावयाची हे महाविद्यालयात पहिल्याच वर्गात मिळालेले शिक्षण त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले व असे करण्याचे उत्तेजन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही दिले. अत्यंत साध्या उपकरणातून वैज्ञानिक तत्त्व कसे उपयोगात आणता येते याचे पुढील उदाहरण उद्बोधक आहे.

     पुढे प्रा. परांजपे मुंबईच्या विज्ञान संस्थेत प्राध्यापक झाले. त्या काळी कोणतीही विज्ञान-तंत्रविषयक समस्या उत्पन्न झाली तर शासन विज्ञान संस्थेची मदत घेत असे. विजापूरच्या गोलघुमटाला हादरे बसत असत; ते कशामुळे बसतात हे शोधण्याचे काम प्रा. परांजप्यांकडे  आले. गोलघुमटाजवळून रेल्वे जात असे. त्यामुळे हादरे बसत असतील, असा कयास होता. त्याची खात्री करण्यासाठी प्रा. परांजपे आपल्या विद्यार्थ्यांसह गोलघुमटाच्या बाल्कनीत रात्रीच्या वेळी बसले. कारण ती आगगाडी रात्री जात असे. पाण्याने काठोकाठ भरलेली बादली बाल्कनीत ठेवून ते गाडीची वाट पाहत बसले. गाडी जवळून जाऊ लागताच बादलीतील पाण्यावर कंदिलाचा उजेड पाडून ते निरीक्षण करू लागले. बादलीतील संथ पाण्यात तरंग उठू लागले. गाडी निघून गेल्यावर १५ मिनिटांनी तरंग थांबून पाणी संथ झाले. ह्या प्रयोगावरून गोलघुमटाला हादरे कशामुळे बसतात, हे निश्चित करता आले. (याच वेळी भूकंपमापनाच्या उपकरणाचा शोध लागला असला, तरी ते सर्वत्र उपलब्ध नव्हते.)

     १९१२ साली बी.एस्सी. झाल्यानंतर गो.रा. परांजपे पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. तेव्हा भारतातील विद्यार्थ्यांना तेथे अटक झाली; पण इंग्रजांविरुद्ध बंड करण्याच्या अटीवर त्यांना सोडून देण्यात आले. परत आल्यावर गो.रा. परांजपे बंगळुरू येथे टाटा संशोधन संस्थेत (सध्याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या संस्थेत डॉ. वॉटसन यांच्या हाताखाली रसायनशास्त्रात संशोधन करू लागले. नारळाच्या करवंटीपासून केलेल्या कोळशाचा विषारी धूर शोषून घेण्यासाठी कितपत उपयोग होईल, याविषयी ते प्रयोग करत होते. याच वेळी प्रा. परांजपे यांना इंडियन एज्युकेशन सर्व्हिसमध्ये कमिशन मिळाले.

     १९२० साली मुंबईत ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ नंतरची ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ऊर्फ विज्ञान संस्था) ही विज्ञानाचे उच्चशिक्षण देणारी संस्था सरकारने सुरू केली. गो. रा. परांजपे यांना या संस्थेत भौतिकशास्त्राचे प्राध्यापकपद मिळाले व ते तेथे अध्यापन करू लागले. पुढे ते तेथे विभागप्रमुख झाले. पूर्वी या संस्थेच्या प्राचार्यपदावर नेहमी गोरा इसम नेमला जात असे. त्या ठिकाणी प्रा. परांजपे हे पहिले भारतीय प्राचार्य झाले. मुलांना ते उत्तम शिकवीतच; पण मुलांनी स्वत: प्रयोग करावेत म्हणून त्यांनी प्रयोगशाळा, उपकरणे दुरुस्त करण्यासाठी कार्यशाळा सुरू केली. त्याखेरीज मुलांनी स्वत: निबंध लिहावेत व चर्चा करावी यांकरिता चर्चामंडळे काढली. जेव्हा नामवंत वैज्ञानिक मुंबईत येत तेव्हा त्यांची व्याख्याने ते आपल्या संस्थेत आयोजित करीत. अशा रीतीने विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी ते सतत प्रयत्न करीत असत. त्यांच्या हाताखाली शिकलेले होमी भाभा, एम.जी.के. मेनन, रँग्लर वि.वा. नारळीकर, प्रा. भा.मा. उदगावकर इ. विद्यार्थी पुढे भारताला ललामभूत ठरले.     

     विज्ञान शिक्षण मराठीतून व्हावे, त्यासाठी पारिभाषिक शब्द मराठीत निर्माण व्हावेत, सर्वसामान्य लोकांसाठी मराठीतून विज्ञान विषयावर विपुल लेखन व्हावे, ही त्यांची कळकळीची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पुण्यातील नामवंत प्राध्यापक व इतर तज्ज्ञ लोकांची सभा घेतली. या सभेत मराठीत विज्ञानविषयक मासिक सुरू करावे असे ठरले. त्याप्रमाणे, १९२८ साली ‘सृष्टिज्ञान’ हे मराठी शास्त्रीय मासिक सुरू झाले. त्याची सर्व संपादकीय जबाबदारी गो.रा. परांजपे यांनी स्वीकारली.

     मासिकासाठी स्वत: परांजपे यांनी व प्रा. दि.धों. कर्वे, प्रा. आजरेकर, प्रा. आवटी, डॉ. भाजेकर इत्यादींनी लेखन करावयास सुरुवात केली. सृष्टिज्ञान मासिकाचे कार्य प्रा. परांजप्यांनी सतत ५३ वर्षे केले व या काळात डॉ. मो.वा. चिपळोणकर, डॉ. गो.रा. केळकर, डॉ. श्री.द. लिमये, प्रा. क.वा. केळकर, डॉ. वा.द. वर्तक इत्यादी अनेक तज्ज्ञांना मराठीत लेखन करण्यास उत्तेजन दिले. ‘सृष्टिज्ञान’मध्ये येणारे लेख शास्त्रीयदृष्ट्या अचूक असावेत, तसेच त्यांची भाषा सर्वांना सहज समजेल अशी सोपी असावी, यांवर त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी स्वत:ही अशा प्रकारे शेकडो लेख लिहिले. त्यात भौतिकशास्त्रावर २६० लेख आहेत, तसेच ६१ शास्त्रज्ञांची चरित्रे आहेत.

     मराठीतून शास्त्रीय लेखन करण्यासाठी विविध शास्त्रांची मराठी परिभाषाही निर्माण करणे जरुरीचे होते. हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी सृष्टिज्ञानमध्ये त्यांनी पारिभाषिक शब्दसंग्रह प्रसिद्ध करावयास सुरुवात केली. १९६६ साली ‘मराठी विज्ञान परिषद’ स्थापन झाली. त्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला.

     पुणे मराठी विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९६८ साली मराठी विज्ञान परिषदेच्या ‘मासिक पत्रिके’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तेव्हाचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाले. तेव्हा केलेल्या भाषणात प्रा. परांजपे यांनी पारिभाषिक शब्दसंग्रह शासनाने प्रसिद्ध करावेत अशी सूचना केली. तिला अनुसरून शासनातर्फे भाषा संचालनालय स्थापन करण्यात आले. पुढे यथावकाश प्रत्येक शास्त्रीय विषयांवर शासनातर्फे शब्दकोश प्रसिद्ध करण्यात आले.

वयाच्या ८८ वर्षांपर्यंत प्रा.परांजप्यांची प्रकृती उत्तम होती. पुढील तीन वर्षांत ती हळूहळू ढासळत गेली व वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

 र. म. भागवत

परांजपे, गोपाळ रामचंद्र