Skip to main content
x

परांजपे, कृष्णशास्त्री गौरीशंकर

प्रज्ञानंद सरस्वती

      मूळचे वाईचे असलेले प्रज्ञानंद सरस्वती म्हणजेच पूर्वाश्रमीचे कृष्णशास्त्री गौरीशंकर परांजपे हे विष्णुवृद्ध गोत्राचे, आश्वलायन शाखेचे, चित्पावन ब्राह्मण असल्यामुळे घराण्यात पूर्वापार वेद, श्रौत, याज्ञिक, शास्त्र आणि अग्निहोत्राची परंपरा होती. त्यांचे शिक्षण वेदशाखा, श्रौतयाज्ञिकी, ज्योतिष्टोमाचे सामगायन व संस्कृत व्युत्पत्ती इतके झाले होते.

भूमानंद व रामानंद या वाईच्या तत्कालीन प्रसिद्ध विद्वतरत्नांकडून प्रस्थानत्रयीचे भाष्य ऐकल्यावर त्यांनी स्वत: प्रवचने करण्यास सुरुवात केली. वाईतील द्वारका मंदिरात ते रोज प्रवचने करीत. त्यांंनी विवाह केला; पण त्यांची पत्नी लवकर वारली. त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी (१८९१) कृष्णशास्त्री यांनी संन्यास दीक्षा घेऊन ‘प्रज्ञानंद’ असे नाव धारण केले व ते प्रथम वाईतच मुरलीधर मठात व नंतर दातार मठात राहू लागले. वाईत त्यांची नित्यप्रवचने चालत. दूर-दूरच्या ठिकाणची मंडळी येऊन श्रवणाचा लाभ घेत असत. 

त्यांचे शिष्य, जे पुढे केवलानंद सरस्वती या नावाने प्रसिद्ध झालेले पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे यांनी आपल्या टिपणीत त्यांच्या प्रवचनाबद्दल लिहून ठेवले आहे, ‘स्वामीजींच्या शारीरिक भाष्य-प्रवचनाची ख्याती रामेश्वरापर्यंत झाली होती. वाईत आलेला बाहेरचा विद्वान एक-दोनदा तरी श्रवणाला व दर्शनाला येऊन जात असे. कधी-कधी रात्री निवांत वेळी ते साम (सामवेदातील ऋचा) गुणगुणत असत. ‘विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल’चे भजनही चालत असे.

पुढे ज्यांची वेदविद्येत ख्याती झाली.  विष्णुशास्त्री बापट, विनायकबुवा पेंडसे, नारायणबुवा द्रविड, पारकरशास्त्री, पावगी शास्त्री, भाऊशास्त्री लेले इत्यादी मंडळी प्रज्ञानंद सरस्वती स्वामींच्या शिष्यवर्गात होती. अपरिग्रह वृत्ती, तप, ध्यान व तत्त्वचिंतन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांचे शिष्य केवलानंद सरस्वती यांनी आपल्या गुरूंच्या स्मृत्यर्थ त्यांच्या पाठशाळेत प्रथम प्राज्ञमठ व पुढे प्राज्ञपाठशाळा आणि नंतर प्राज्ञपाठशाळा मंडळ अशी नावे देत प्रज्ञानंद सरस्वती यांची स्मृती कायम जपली. आजही वाईमध्ये प्राज्ञपाठशाळा मंडळ ही संस्था अस्तित्वात आहे.

 — मधू नेने

परांजपे, कृष्णशास्त्री गौरीशंकर