Skip to main content
x

प्रभावळकर, दिलीप भालचंद्र

अभिनेता

४ ऑगस्ट १९४४

महाराष्ट्रातील सर्व रसिक दिलीप प्रभावळकर या सर्जनशील, गुणी कलावंताचे नाव आणि कर्तृत्व जाणून आहेत. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ नाट्य-चित्र कारकिर्दीत  स्वत:च्या अभिनयाचा खास ठसा उमटवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

दिलीप भालचंद्र प्रभावळकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव कमल होते. शारदा विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या प्रभावळकर यांनी रुईया महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी मिळवली. अष्टपैलू अभिनेता म्हणून मान्यता पावलेल्या प्रभावळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा, फार जणांना माहीत नसलेला एक पैलू म्हणजे ते जैव-भौतिकशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीचे एम.एस्सी. पदवीधर आहेत. त्यांनी भाभा अनुसंशोधन केंद्रातून पदविका प्राप्त केल्यावर औषधी कंपनीत अनेक वर्ष नोकरी केली. त्यानंतर व्हिडियो प्रॉडक्शन युनिटमध्ये भागीदार म्हणूनही काम पाहिले. याच काळात त्यांनी छबिलदासमधून बालरंगभूमीवर व प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. प्रभावळकर यांच्या अभिनयाचा प्रवास त्यानंतर व्यावसायिक रंगभूमी, दूरदर्शन मालिका व चित्रपट येथपर्यंत पोहोचला.

चिमणरावया मालिकेद्वारे प्रभावळकर यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतून त्यांना विलक्षण लोकप्रियता मिळाली व ते घरोघरी परिचित झाले. पण त्याचबरोबर त्यांनी इतरही अनेक विविधरंगी, एकाहून एक सरस व वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांद्वारे लोकांची मने जिंकली. रंगभूमीवर चेटकीपासून नातीगोती’, ‘एक झुंज वार्‍याशी’, ‘कलम ३०२’, ‘गुरूया गंभीर व्यक्तिरेखांपासून हसवा-फसवीमधील अफलातून भूमिकांपर्यंत त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या. हसवा-फसवीचे त्यांनी शेकडो प्रयोग केले.

नाट्य-चित्रपटक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक वेळा महाराष्ट्र राज्य’, ‘नाट्यदर्पणनाट्य परिषदपुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९९९ सालच्या महिंद्र नटराजहा प्रतिष्ठेच्या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. पुलोत्सव-बहुरूपीपुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. अभिनयाबरोबर लेखन क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. बालवाङ्मय, विनोदी लेखन, सदर लेखन, नाट्यलेखन असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. या लेखनासाठी त्यांना साहित्य पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अनुदिनीया सदर लेखनावरच श्रीयुत गंगाधर टिपरेही दूरदर्शन मालिका आधारित होती. श्रीयुत गंगाधर टिपरेही त्यांची भूमिका घराघरात आदराचे स्थान मिळवून गेली. तर त्यांच्या बोक्या सातबंडेया लेखनावर आधारित मालिका व चित्रपटही निघाले. कलावंताचा मुखवटा आणि व्यक्तिगत आयुष्यातील त्याचा खरा चेहरा यातील परस्परसंबंध जाणवून देणारा, ‘मुखवटे आणि चेहरेहा अनोखा विविध माध्यमी-एकपात्री प्रयोगही त्यांनी निर्माण केला आहे. त्यांनी देशा-परदेशात याचे शेकडो खेळ केले.

१९९१ साली त्यांनी अरविंद देशपांडे दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर लिखित लोभ असावा ही विनंतीया नाटकात महत्त्वाची भूमिका केली. याच वेळी त्यांनी हेतुपुरस्सर अभिनय क्षेत्राची निवड केली आणि रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यांतून चतुरस्र अभिनयाने आपला खास चाहतावर्ग बनवला.

एक डाव भुताचा’ (१९८२) या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साध्या, भोळ्याभाबड्या, कोणत्याही राजकारणाचा प्रभाव नसणार्‍या, अलिप्त पण संवेदनशील मनाच्या शिक्षकाची भूमिका साकारली, तर त्यानंतर त्यांनी चौकट राजा’ (१९९१) या चित्रपटात वयाच्या ४१ व्या वर्षी सर्वसामान्य मुलांपेक्षा सर्वार्थाने भिन्न, पण विशेष मुलाची, म्हणजेच नंदूची भूमिका साकारून आपल्या अभिनयातले वैशिष्ट्य दाखवून दिले. अभिनेत्याचे वास्तव वय व चित्रपटातील विशेष मुलाची भूमिका यांच्या वयाचा बारकाईने विचार केल्यास प्रभावळकरांनी साकारलेल्या या भूमिकेतील वैशिष्ट्य चटकन जाणवते. या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्वोत्कृष्ट अभिनेताचे पारितोषिक मिळाले. एक होता विदूषक’ (१९९२), ‘झपाटलेला’ (१९९२), ‘आपली माणसं’ (१९९३), ‘कथा दोन गणपतरावांची’ (१९९६), ‘सरकारनामा’ (१९९७), ‘रात्र आरंभ’ (१९९९), ‘सुंदर माझं घर’ (२००१), ‘आधारस्तंभ’ (२००२), ‘अगं बाई अरेच्चा’ (२००४), ‘गोड गुपित’ (२००४), ‘वळू’ (२००८), ‘झिंक चिका झिंक’ (२०१०), ‘शाळा’ (२०१२) अशी त्यांची अभिनय कारकिर्द त्यानंतर बहरत राहिली. त्यांच्या भूमिकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साकारलेल्या भूमिका पाहताना त्यात तोचतोपणाचा प्रत्यय येत नाही. प्रत्येक भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा निराळी असते व त्या भूमिकेला अभिप्रेत असणारा अभिनयही निराळा असतो. या दृष्टीने आपल्याला त्यांच्या चौकट राजा’, ‘सरकारनामा’, ‘रात्र आरंभ’, ‘देऊळआणि आता आताचा नारबाची वाडीअशा विविध चित्रपटातील भूमिकांकडे पाहता येते. अगं बाई अरेच्चाया चित्रपटात त्यांनी संजय नार्वेकर यांच्या वडिलांची भूमिका केली. या भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला फारसे संवाद आले नसले तरी आंगिक अभिनयाच्या जोरावर त्यांनी ही छोटीशी भूमिकाही संस्मरणीय केली, तर रात्र-आरंभया चित्रपटातील दुभंग व्यक्तिमत्त्वही त्यांनी आपल्या अभिनयातून नेटकेपणाने मांडले. पछाडलेलाया चित्रपटातील चौकटीत अडकलेला व आपल्या मुलाचे भले करण्यासाठी वाईट वागणारा बाप असो, ‘सरकारनामामधील राजकारणी असो, किंवा मोरयासारख्या चित्रपटातील संस्कृतिसंरक्षक सामान्य माणूस असो, त्यांच्या प्रत्येक भूमिकेला सहजपणाचे एक अंग असते, ते अंग प्रत्येक भूमिकेतून सहजपणे अभिव्यक्त होते. त्यांनी या अनेक मराठी चित्रपटांबरोबरच एनकाउंटर - द किलिंग’, ‘महात्मा गांधी’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘पहेली’, ‘सरकारराज’, ‘सी कंपनी’, ‘सावरीया डॉट कॉमअशा अनेक हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. लगे रहो मुन्नाभाईतील त्यांनी साकारलेल्या गांधींजींच्या कौतुक झालेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.

अभिनयातील सहजता, नेमकेपणा, भूमिका निवडीतील चोखंदळपणा व नावीन्यपूर्ण भूमिकांचा स्वीकार व स्वीकारलेल्या भूमिकांना न्याय देण्याची वृत्ती प्रभावळकर यांच्याकडे असलेली दिसते. अभिनय व लेखन या दोन्ही कलांनी मराठी नाट्य-चित्रपटक्षेत्रात आणि साहित्यक्षेत्रातही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनिशी दिलीप प्रभावळकर यांनी आपले बळकट स्थान निर्माण केले आहे.

- सतीश जकातदार

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].