Skip to main content
x

परमेश्वरन, रामस्वामी

     रामस्वामी परमेश्वरन यांचा जन्म मुंबई येथे झाला.  एस.आय.ई.एस. शाळेत व महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पंधराव्या महार रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर जानेवारी १९७२ मध्ये ते पाचव्या महार रेजिमेंटमध्ये रुजू झाले. या वेळी ते मिझोराम व त्रिपुराच्या डोंगरी भागात घुसखोरांशी लढत होते. पुढे त्यांची आठव्या महार रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली. ही रेजिमेंट श्रीलंकेला जाणार होती. एक्क्याण्णवव्या इन्फन्ट्री ब्रिगेड व चौपन्नाव्या इन्फन्ट्री डिव्हिजन यांचा एक भाग म्हणून या रेजिमेंटने ‘ऑपरेशन पवन’मध्ये भाग घेतला होता. श्रीलंकेत आलेली भारतीय शांतिसेनेची ही पहिली बटालियन होती.  श्रीलंकेत या सैन्याने एल.टी.टी.ई.विरुद्ध झालेल्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. कान्तारोदाईमध्ये मेजर रामस्वामी परमेश्वरन शूरपणे लढले.

     २४ नोव्हेंबर १९८७ रोजी या खेड्यातील एका घरामध्ये, शस्त्रे व दारूगोळा यांचा मोठा साठा उतरवला असल्याची माहिती सैन्याला समजली. बातमीचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी कॅप्टन डी.आर. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वीस जणांच्या तुकडीस पाठवण्यात आले. 

     गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यांवर सदर घराच्या जवळच्या देवळामधून गोळ्या झाडण्यात आल्या. गस्त घालणाऱ्यांनीही गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यांनी उद्विल येथील बटालियनला माहिती कळवली की ती जागा एल.टी.टी.ई.च्या ताब्यात आहे व आधीच्या अनुमानापेक्षा त्यांची ताकद अधिक वाटत आहे.

     त्या वेळी मेजर रामस्वामी परमेश्वरन यांनी या जागेवर हल्ला करण्याचे ठरविले. रात्री साडेआठ वाजता त्यांनी आपल्या कंपनीमधून एक तुकडी निवडून सोबत घेतली आणि  ते कॅप्टन शर्मांच्या तुकडीला जाऊन मिळाले. या दोन्ही तुकड्या त्यानंतर  संशयास्पद घराकडे निघाल्या. परमेश्वरन यांची कंपनी त्या घराजवळ दि.२४/२५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दीड वाजता पोहोचली. तिथे त्यांना कसलीही  हालचाल आढळली नाही. त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि पहाटे शोध घ्यावयाचे ठरवले.

     २५ नोव्हेंबर १९८७ रोजी पहाटे साडेपाच वाजता शोधमोहिमेस सुरुवात झाली. पण तेथे काहीही न आढळल्यामुळे त्यांनी माघारी परतण्याचेे ठरविले. त्याच वेळी देवळाजवळच्या वनराईतून बंदुकीच्या गोळ्यांचा मारा झाला. कंपनीनेही लगेचच प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी त्यांनी कॅप्टन शर्मा यांना सूचना दिली, की शत्रूवर गोळीबार करीत त्याला गुंतवून ठेवा. नंतर परमेश्वरन आणि त्यांच्या तुकडीने एल.टी.टी.ई.च्या गटाच्या पाठीमागून जाऊन त्याना घेरण्यासाठी पश्चिमेच्या बाजूने कूच केले.

     अतिरेकी बेसावध असतानाच सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. समोरासमोर झालेल्या लढाईत एका अतिरेक्याने झाडलेली गोळी त्यांच्या छातीत घुसली. तरीही न डगमगता परमेश्वरन यांनी त्या अतिरेक्याची रायफल हिसकावून घेतली व उलट हल्ला करून त्यालाच यमसदनास पाठवले.

     या तुकडीने पाच अतिरेकी मारले आणि तीन रायफल्स व दोन रॉकेट लाँचर्स हस्तगत केले. मेजर परमेश्वरन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या तुकडीला मार्गदर्शन करत राहिले. परमेश्वरन यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ बहाल करण्यात आले.

- वर्षा जोशी-आठवले

परमेश्वरन, रामस्वामी