Skip to main content
x

परुळेकर, दत्तात्रेय रामचंद्र

कलाशिक्षणतज्ज्ञ

त्तात्रेय रामचंद्र तथा दत्ता परुळेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सीताबाई व पत्नीचे नाव इंदूमती आहे. त्यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे शालेय शिक्षण ओरिएंट हायस्कूलमध्ये झाले. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतलेले कलाशिक्षक राजाभाऊ पाटकर यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. राजाभाऊंनी भूमिगत होण्यापूर्वी आपल्या जागी परुळेकरांनी काम पाहावे या हेतूने प्रशिक्षण देऊन त्यांना कलाशिक्षक म्हणून तयार केले.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर परुळेकर दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. तिथे त्यांच्यावर एम.एस. जोशी व ठोसर यांच्याकडून कलासंस्कार झाले, तरीदेखील त्या दोघांहून भिन्न अशी स्वत:ची स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. अपारदर्शक रंगांत मोठ्या ब्रशच्या फटकार्‍यांनी जोरकसपणे त्यांनी केलेल्या चित्रणात उत्स्फूर्तता व रचना यांचा उत्तम समन्वय साधल्याचे जाणवते. त्यांनी गोणपाटाचा कॅनव्हाससारखा उपयोग करून केलेली चित्रे वेगळीच अनुभूती देतात.

वांद्य्राच्या नॅशनल लायब्ररीत त्यांनी १९५३ मध्ये तीन विद्यार्थ्यांसह ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना केली. संस्थेकडे पूर्ण वेळ लक्ष देता यावे यासाठी त्यांनी नियमित पगाराची नोकरी सोडली. इथे पगार केव्हा व किती मिळेल याची शाश्‍वती नव्हती. पण ध्येयासाठी त्यांनी आर्थिक तडजोड स्वीकारली. त्या संस्थेच्या विकासात परुळेकरांचा फार मोठा वाटा आहे. आता ही संस्था ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’ म्हणून ओळखली जाते.

जवळजवळ पंचवीस वर्षे त्यांनी बालचित्रकलेवर संशोधन केले. सुट्टीच्या दिवशी लहान मुलांचे चित्रकला वर्ग ते विनामूल्य घेत असत. बरेच प्रयोग करून, मुलांची चित्रे त्यांच्याकडून समजून घेऊन बरेच चिंतन व मनन करून त्यांनी काही अनुमाने काढली आहेत. मुलांची चित्रे पाहायची नसून ती वाचायची असतात, असे ते म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रभर  बालचित्रकलेचा प्रसार केला. चर्निरोडच्या ‘बालभवन’तर्फे अनेक ठिकाणी बालभवन निर्माण करण्यात त्यांचे योगदान आहे. भाऊ दाजी लाड संग्रहालयामधील लहान मुलांच्या प्रदर्शनासाठी गॅलरी त्यांच्या प्रयत्नानेच सुरू झाली.

ग्रेड परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम उच्च कला शिक्षणातील मूलभूत अभ्यासक्रमाला पूरक असावा यासाठी त्यांचा आग्रह होता. राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात परुळेकरांचे योगदान मोठे आहे.

चित्रकला हा विषय इतर सर्व विषयांना पोषक असतो. व्यक्तिमत्त्व विकासासाठी या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय चित्रकार बनण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, असे ते ठामपणे प्रतिपादन करीत. कला सामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पहिल्याच राज्य कलाप्रदर्शनात मिळालेला राज्य पुरस्कार आणि तीन एकल प्रदर्शने त्यांच्या खात्यावर जमा आहेत.

- दा. ग. पुजारे

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].