Skip to main content
x

पटेल, बाबुराव

     बाबूराव पटेल यांचे खरे आडनाव होते पाटील. पालघर तालुक्यात बंजारी जमातीत त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले असूनही त्यांनी इंग्रजी भाषेवर असामान्य प्रभुत्व मिळवले होते. मॅट्रिक अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था तूच कर’, असे सांगितले. त्यानंतर बाबूरावांनी गजकर्ण या रोगासाठी रिंगोसाईड नावाचे एक मलम तयार केले. लगेच त्यांना औषध निरीक्षकाची नोटीस आली आणि त्यांना हा धंदा बंद करावा लागला. नंतर त्यांनी गेव्हार्ट या कंपनीत नोकरी धरली. तेथे त्यांची विनायक घोरपडे (वासंती या बालनटीचे वडील) यांच्याशी ओळख झाली. घोरपडे महाराष्ट्र फिल्म कंपनीशी संबधित होते. त्याच सुमारास बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीतील अंग काढून घेतले होते. त्यामुळे दिग्दर्शनासाठी माणूस हवा होता. विनायकरावांनी कंपनीच्या चालकांशी बोलून बाबूराव पटेल यांना दिग्दर्शक म्हणून बोलावून घेतले आणि ‘किस्मत’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे त्यांच्या हाती सोपविली. त्यानंतर बाबूरावांनी मुंबईला विठ्ठलराव महिंद्रकर यांच्या मदतीने महिंद्रकर फिल्म सर्व्हिसेस ही वितरण संस्था काढली. त्यात त्यांना यश आले नाही.

     अकोल्यातल्या त्यांच्या एका मित्रासाठी बाबूरावांनी ‘पृथ्वीराज संयोगिता’ या बोलपटाची निर्मिती हाती घेतली. दिग्दर्शनाची सूत्रे नानासाहेब सरपोतदार यांच्या हातात सोपवली. याच काळात बाबूरावांनी ‘गंधर्व सिनेटोन’ या स्वत:च्या चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि ‘महानंदा’, ‘बाला जीवन’, ‘महाराणी’, ‘चाँद का टुकडा’ असे बोलपट निर्माण केले; पण पडद्यावर ते फार काळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे कंपनी बंद करून चित्रपटांच्या जाहिराती करण्याचे काम त्यांनी सुरू केले. सर्वप्रथम सागर मुव्हीटोनने आपल्या चित्रपटांच्या जाहिराती बाबूरावांच्या हातात सोपवल्या. १९३५ साली पाटकर यांच्याशी त्यांची गाठ पडली. पाटकरांचा स्वत:चा ‘न्यू जॅक प्रिटिंग प्रेस’ नावाचा छापखाना होता. त्या छापखान्यासाठी पाटकरांनी चित्रपटविषयक मासिक काढण्याचे ठरविले आणि संपादकाची जबाबदारी बाबूरावांच्या अंगावर टाकली. बाबूरावांनी ‘फिल्म इंडिया’ असे त्या मासिकाचे नाव ठेवले आणि ४ एप्रिल १९३५ रोजी पहिला अंक प्रसिद्ध केला. पहिल्याच अंकावर वाचकांच्या उड्या पडल्या आणि त्या अंकाच्या तीन आवृत्या १५ दिवसात प्रसिद्ध कराव्या लागल्या. पुढे पाटकरांनी त्यांना फिल्म इंडियात भागीदार म्हणून घेतले. त्यासाठी बाबूरावांना त्यांना तीन हजार रुपये भांडवलापोटी द्यावे लागले.

     १९३९ साली हिंदी चित्रपट धंद्याचा रौप्यमहोत्सव साजरा झाला, त्या प्रसंगी फिल्मी वृत्तपत्रांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा मान बाबूरावांना मिळाला.

     ‘फिल्म इंडिया’चा खप दिवसेंदिवस वाढतच होता. त्यांनी इंग्लंड-अमेरिकेचा दौरा करण्याचे ठरविले आणि इंग्लंड आणि हॉलीवूड येथील नामवंत नट-नट्या, दिग्दर्शक, निर्माते यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन फिल्म इंडियात त्याचे सविस्तर वार्तापत्र प्रसिद्ध केले.

     १९४४ साली बाबूराव पटेल यांनी आपली दुसरी पत्नी सुशीलादेवी यांना घेऊन ‘द्रौपदी’ हा चित्रपट पूर्ण केला. पुढे १९४६ साली त्यांनी एका चित्रपटसंस्थेसाठी ‘ग्वालन’ नावाचा बोलपट तयार करून दिला. त्यानंतर ग्वाल्हेरच्या विजयाराजे शिंदे यांनी त्यांना जनसंघामार्फत ग्वाल्हेरहून संसदचे तिकिट मिळवून दिले. बाबूरावांनी पुढील पाच वर्षे संसदही गाजवली. संसदेत गेल्यावर त्यांनी फिल्म इंडियाचे स्वरूप बदलून त्याला राजकीय रंग दिला.

- द.भा. सामंत

पटेल, बाबुराव