पत्की, विश्वनाथ वामन
विश्वनाथ वामन पत्की यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवडे या गावी झाला. साखरपे, जंजिरा, बेळगाव, रत्नागिरी आणि कोल्हापूर या वेगवेगळ्या गावांतून शालेय पासून पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले. एम.ए.ची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली आहे. पत्रकारितेतील पदविका त्यांनी लंडन येथे मिळवली. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातल्या शिक्षकी पेशानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहिले. नंतर ते जनसंपर्क अधिकारीही झाले. जनसंपर्क, वृत्तपत्रविद्या, जाहिरातकला या विषयांचे अध्यापनही ते करीत असत.
लेखनाची मनस्वी आवड असल्याने पत्की यांनी, ‘आंधळा न्याय’ (१९३६), ‘साक्षात्कार’ (१९६४), ‘लक्ष्मणरेषा’ (१९६५), ‘शोभेची बाहुली’ (१९७९) अशा काही कादंबर्या आणि ‘आराधना’ (१९५५) ‘तुझं सुख ते माझं सुख’ (१९७६) इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध केले.
‘पश्चिमवारेे’ हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिले. याशिवाय लघुनिबंध हा वेगळा प्रकार त्यांनी हाताळला. त्यांचे लघुनिबंधांचे, ‘खरं सांगू तुम्हांला?’ आणि ‘वेळी-अवेळी’ हे दोन संग्रह प्रकाशित झाले.
पत्की यांच्या लेखनावर सुप्रसिद्ध लेखक ना.सी.फडके यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. ओघवते निवेदन, समर्पक शब्दकळा आणि ललित लेखनाच्या तंत्राची चांगली जाणकारी; अशी फडके यांची लेखन-वैशिष्ट्ये, पत्की यांच्या लेखनात जाणवतात.
‘युगप्रवर्तक फडके’(१९६७) हा फडके यांच्या साहित्याचे मर्म उकलून दाखवणारा समीक्षात्मक ग्रंथ, पत्की यांनी, शि.न.केळकर यांच्या सहकार्याने लिहिला.
कथा, कादंबरी, समीक्षा, चरित्रलेखन, प्रवासवर्णन आणि ललित निबंध अशा साहित्याच्या अनेक प्रांतांत विश्वनाथ वामन पत्की यांच्या लेखणीने चौफेर संचार केला. तरीही त्यांचे नाव मुख्यतः लक्षात राहते, ते त्यांनी केलेल्या काही सरस अनुवादांमुळे. भारताचे माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती एम.सी.छगला यांचे ‘रोझेस इन डिसेंबर’, भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे, ‘द कोर्स ऑफ माय लाइफ’ आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आत्मचरित्रांचा अनुक्रमे- ‘शिशिरातील गुलाब’, ‘माझा जीवन प्रवाह’ आणि ‘स्वप्नसिद्धीची दहा वर्षे’ अशा नावांनी पत्की यांनी सुरस अनुवाद केले आहेत, ते वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
‘दीपगृह’ (१९८३) हे वि.स.खांडेकर यांच्या खासगी पत्रांचे संपादन त्यांनी केले.
सरस अनुवाद आणि ना.सी.फडके यांच्या साहित्याचा घेतलेला मौलिक परामर्श या दृष्टीने वि.वा.पत्की यांचे लेखन लक्षात घेण्याजोगे आहे.
- मंदाकिनी भारद्वाज