Skip to main content
x

पटवर्धन, माधव वासुदेव

     माधव वासुदेव पटवर्धन हे उत्तम विद्वान होते. विद्यार्थिदशेतच त्यांनी मिळविलेल्या सुप्रसिद्ध जगन्नाथ शंकरशेट व इतर शिष्यवृत्त्यांमुळे त्यांच्या यशाची पावती मिळते.  त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये १९३० पासून पदार्पण केले. प्रा. पटवर्धनांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कारकिर्द सुरू केली.

     त्यानंतर त्यांची न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे येथे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली. ५ वर्षांनंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत-प्राकृत प्राध्यापक म्हणून पुण्याला कार्यरत होते. १९६७ मध्ये ते निवृत्त झाले. शैक्षणिक कारकिर्दीत त्यांचे उत्तम शिक्षकाचे गुण व वडिलांसारखे प्रेम ह्या गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना येत असे. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये ‘मामा’ शब्दाने ओळखले जात. निवृत्तीनंतर त्यांनी आपले जीवन संस्कृत साहित्य व प्राकृत साहित्य ह्यांच्या अभ्यासासाठी वाहून दिले. अनेक संस्कृत-प्राकृत विषयांवर नियतकालिकांतून लेख लिहिले.

     विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे ज्ञान सुलभतेने व्हावे ह्यासाठी त्यांची झटपट नित्य सुरू असायची. त्यांच्या लेखणीतून बाहेर आलेल्या संस्कृत-प्राकृत विषयावर प्रकाशित पुस्तकांच्या मालिकेतून आपल्याला ती स्पष्ट जाणवते.

     १. दशैवकालिकसूत्र : एक अध्ययन - प्रथम भाग  (१९३३) व द्वितीय भाग (१९३६) इंग्लिश

     २. वेणीसंहार (मराठी अनुवाद)

     ३. बाणाची कादंबरी (काही भागांचे इंग्लिश अनुवाद)

     ४. हस्तिमल्ल या जैन लेखकाची संस्कृत-प्राकृत नाटके (इंग्लिश)-अंजनापवनंजय इत्यादी

     ५. वज्जालग्ग - प्राकृत सुभाषित संग्रह (इंग्लिश) १९६९

     ६. शांतरस व अभिनवगुप्तकृत रसास्वादोपपत्ती (प्रा. जे. एल. मसन) यांच्या सहकार्याने, इंग्लिश, १९६९.

     ७. भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाध्याय व रसास्वाद (प्रा. जे. एल. मसन) यांच्या सहकार्याने, इंग्लिश, १९७०

     ८. हालाची गाथा सप्तशती या ग्रंथाचा पहिला खंड १९८०

     ९. महिमभट्टाच्या व्यक्तिविवेकावरील परिचय ग्रंथाचे लेखन.

     १०. मराठी रघुवंश (गेयकाव्य) या पुस्तकाचे कर्ते १९८२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित.

     ११. आनंदवर्धनाचे ध्वन्यालोक अभिनवगुप्ताच्या लोचन टीकेसह, मराठी अनुवाद - पु.ल. वीरकरांच्या सहकार्याने.

     १२. आनंदवर्धनांचे ध्यन्यालोक अभिनवगुप्ताच्या लोचन टीकेसह इंग्लिश अनुवाद - जे.एल. मसन व डॉ. डी.एच.एच. डगलस यांच्या सहकार्याने - तीन खंड

     १३. सुभद्रा नाटिका, १९५०

     उपरोक्त लिखित साहित्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

     साहित्यशास्त्रातील संस्कृत ग्रंथांच्या मालिकेत आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक हा ग्रंथ अनमोल आहे. ज्यामध्ये ध्वनितत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. इतक्या मौल्यवान असलेल्या ह्या ग्रंथाचा मराठी अनुवाद १९ व्या शतकात लिहिला गेला हे विशेष. हा ग्रंथ १९८२मध्ये प्रकाशित झाला.

     महाराष्ट्रातील विद्यापीठातून संस्कृत साहित्यशास्त्र घेऊन एम.ए. होण्याची इच्छा बाळगणाऱ्या तसेच बी.ए.व एम.ए. ह्या परीक्षांसाठी मराठी साहित्यशास्त्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आवश्यक गरजांच्या पूर्तीसाठी संपूर्ण विषयावर मराठी भाषेतून लिहिला जाणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. पु.ना. वीरकरांच्या सहकार्याने संस्कृतातील हे विचारधन सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा.वा.पटवर्धनांनी टाकलेले हे पाऊल अभ्यासकांच्या दृष्टीने वंदनीय आहे. मराठीत आलेल्या अशा ग्रंथांमुळे साहित्यशास्त्र विषयक मूलग्राही चर्चा, चर्वणा सर्व काही मराठीत होऊ शकेल असे मत सुरेंद्र बारलिंगेनी प्रदर्शित केले, ते योग्यच वाटते.

     डॉ.वा.म.कुळकर्णी ह्यांनी असे म्हटले आहे की, आनंदवर्धन व अभिनवगुप्त यांच्यासारख्या असामान्य साहित्यशास्त्रकारांना प्रा.वीरकर व प्रा. पटवर्धन यांच्यासारखे संस्कृत पंडित व सहृदय भाष्यकार त्यांच्या ग्रंथाच्या मराठी रूपांतरासाठी लाभावेत, हा एक अपूर्व योग होय. भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाध्याय व रसास्वाद हा ग्रंथ प्रा. जे. एल. मसन यांच्या सहकार्याने इंग्लिशमध्ये लिहिला. पहिल्या भागामध्ये लेखकांनी रसाध्याय व रसास्वाद ह्यांविषयक प्रश्नांवर विचार मांडला. तसेच संस्कृत साहित्यावरील टीकात्मक विवेचनाने नैसर्गिक साहित्यिक अनुभव मिळतो. लेखकाच्या अभिनवभारती ह्या उत्कृष्ट पुस्तकाच्या अभ्यासाने रसविषयक विचारांबाबत असलेल्या मतभिन्नता व पूर्वी न बघितलेल्या विचारांचे वर्णन केले आहे. शांतरस आणि अभिनवगुप्तकृत रसास्वादोपत्ती प्रा. जे.एल  मसन यांच्या सहकार्याने लिहिले आहे.

     अभिनवगुप्ताच्या विचाराचे परीक्षण काश्मीर शैव संप्रदायाच्या आधारे ग्रंथबद्ध करण्याचा हा प्रथम प्रयत्न. लेखकाने ह्यामध्ये अभिनवगुप्ताने मांडलेल्या शांतरसाला विचारात घेऊन त्याचे संस्कृत काव्यशास्त्रातील सौंदर्यामध्ये रसतत्त्व कसे व किती मोलाचे योगदान आहे, ते दाखविण्याचा प्रयत्न केला. रसतत्त्व संकल्पना तत्त्वज्ञानात्मक बैठकीवर कशी आधारलेली आहे आणि अभिनवाला रस-संकल्पना संज्ञा द्यावी असे का वाटले, ह्या प्रश्नांचाही लेखकाने परामर्श घेतला.

      संस्कृत साहित्यात रस-संकल्पनेची उपयुक्तता विस्तृत रूपाने दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच लेखकांनी रसास्वाद व ब्रह्मास्वाद ह्यांमधील साम्य-भेद दाखविण्याचा प्रयत्न केला आणि सूचीमधून नंतरच्या लेखकांचे शांत रस व रसास्वाद ह्या बाबतीतील योगदान दाखविण्याचा प्रयत्न केला.

     महिमभट्टाचा व्यक्तिविवेक हा एक परिचय ग्रंथ होय. महिमभट्टाच्या व्यक्तिविवेक ह्या ग्रंथांची उपयुक्तता, अनुमितिवादाला काव्यामध्ये हे बहुरंगी स्वरूप कसे प्राप्त झाले आहे; ह्यांचे पांडित्यपूर्ण विवेचन वाचण्यासाठी व अनुमितिवादाचा रसिकांना परिचय करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला हा परिचय ग्रंथ. संस्कृत सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासकांना या परिचय प्रबंधाचा पुरेपूर उपयोग होईल यात संशय नाही, असे मत डॉ. मधुकर आष्टीकरांनी महिमभट्टकृत व्यक्तिविवेक ह्या परिचय ग्रंथाच्या निवेदनात मांडले आहे.

     प्रा.पटवर्धन हे संस्कृतप्रमाणेच प्राकृत भाषेचेसुद्धा विद्वान होते. त्यांचे प्राकृत भाषेतील योगदानही अमूल्य आहे. त्याचा आढावा असा- जयवल्लभाच्या वज्जालग्गम् या प्राकृत सुभाषित संग्रहाचा रत्नदेवाच्या संस्कृत टीकेसह असलेल्या ग्रंथाची इंग्लिशमध्ये संशोधित प्रत लिहिली. यामध्ये प्रस्तावनेत विविध विषयांवर विचार-विनिमय केला आहे. साहित्यिक गुण, भाषेचे वैशिष्ट्य व विषयाची गहनता हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य. अनुवाद, टिपा, स्पष्टीकरण तसेच व्याकरण, व्युत्पत्ती आणि संस्कृतचा प्रभाव व मराठी-हिंदी भाषांतील शब्दसाम्य दाखविण्याचा प्रयत्न ह्यात केला गेला.

     हालाचा गाहाकोश भुवनपालाच्या संस्कृत टीकेसह दोन भागांमध्ये प्रकाशित झाला. गाहाकोश हा गाथासत्तसई म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात प्राचीन भारतातील सामान्य माणसाचे जीवन प्राकृत काव्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. प्रा.बेबर ह्यांची ही प्रत न समजणारी तसेच विद्यार्थी व विद्वान यांना जर्मन भाषेत जोडणारी नव्हती, म्हणून प्रा. पटवर्धनांनी त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकात देवनागरी लिपीसह त्याचा संपूर्ण अभ्यास इंग्लिशमध्ये करण्याची जबाबदारी यथार्थपणे पार पाडली. सहृदय पटवर्धनांनी गाथाकोशातील गाथांचे सौंदर्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

     प्रा. पटवर्धनांनी मिथकशास्त्र व ऐतिहासिक संदर्भ यांसह केलेला हा गाथाकोश तरुण आणि विद्वत अभ्यासकांच्या भविष्यातील अभ्यासासाठी अमूल्य देणगीच होय. दशवैकालिकसूत्र ह्या ग्रंथाचे चिकित्सक अध्ययन - जैन साधूसाठी असलेले नियम व त्यांच्या योग्य गुणवत्तेचे वर्णन ह्यात केले आहे. ह्याचे दोन भाग आहेत. व्याकरण दृष्टिकोणातून संदर्भाचा गोषवारा, सामान्य विवेचन आणि प्रत्येक भागाची विभागणी, परिणामात्मक दृष्टिकोणातून अध्ययन आणि पारंपरिक अध्ययन व्युत्पत्तीद्वारे दोन कुलिकांचे अध्ययन केले गेले आहे. त्यांनी टीकात्मक संशोधन लिखाणासाठी अनेक हस्तलिखितांचे अध्ययन केले. प्रा. पटवर्धनांनी आपले संपूर्ण जीवन संस्कृत-प्राकृत भाषांच्या अध्ययनासाठी खर्ची केले. त्यांच्या उपरोक्त लिखित साहित्याच्या खजिन्याकडे बघितले असता असे जाणवते की, संस्कृत-प्राकृत या भाषिक वर्गातील विद्यार्थी आणि विद्वान यांच्याकरिता पटवर्धनांचे हे अलौकिक कार्य नेहमीच उपयुक्त ठरेल ह्यात तिळमात्र संशय नाही.

सुचित्रा ताजणे

पटवर्धन, माधव वासुदेव