Skip to main content
x

पुजारी, बापूराव भाऊराव

बापूसाहेब पुजारी यांचा जन्म कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथे झाला. ते 1935 साली प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सांगलीला आले व हीच त्यांची कर्मभूमी झाली. ते 1941 साली गोळवलकर गुरुजींच्या उपस्थित रा. स्व. संघाचे ‘प्रतिज्ञित’ स्वयंसेवक झाले. त्यांनी 1946 साली मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडून दिले. त्यांनी 1947 साली संघबंदीच्या विरोधात सत्याग्रह करून सहा महिने तुरुंगवास भोेगला होता. पुढे आणीबाणीच्या काळात 1975 साली ते 21 महिने कारावासात होते. पुणे येथून प्रकाशित होणार्‍या तरुण भारत दैनिकाचे सांगली वार्ताहर म्हणून 1958 साली त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांची राजकीय वार्तापत्रे विशेष गाजली. त्यांची 1962 साली तरुण भारतचे दक्षिण महाराष्ट्राचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली.

अण्णासाहेब गोडबोले यांनी स्थापन केलेल्या सांगली अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळावर पुजारी यांची 1972 साली निवड झाली व त्यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केले. देशातील अर्बन बँकांना व्यापारी बँकांच्या बरोबरीने कार्य करण्याची सुविधा मिळावी, यासाठी डमरी समितीच्या अहवालाने पायाभरणी केली होती. पुजारी यांनी त्यावेळस सांगली येथे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सी. डी. दाते यांच्या अध्यक्षतेसाठी महाराष्ट्रातील ग्रमीण जनता व शेतकरी यांची एक परिषद भरविली होती. सहकार भारतीचे पहिले अधिवेशन सांगली येथे घेण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचे प्रमुख संयोजक म्हणून पुजारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सहकार भारतीचे वैचारिक अधिष्ठान महाराष्ट्रात बळकट व्हावे म्हणून पुजारी यांनी 12 वर्षे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्य केले.

महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशन स्थापनेचा मार्ग प्रशस्त करण्यात पुजारी यांनी 1981 साली महत्त्वाची भूमिका बजावली. ते 1983 पासून सलग 30 वर्षेया  फेडरेशनचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळत असून त्यांनी 1990-91 मध्ये फेडरेशनचे अध्यक्षपदही भूषविले होते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मुंबईत फेडरेशनचे स्वतंत्र कार्यालय व्हावे यासाठी पुजारी यांनी भरपूर प्रयत्न केले व वडाळा येथे झालेल्या कार्यालयात विविध सुविधाही निर्माण केल्या. पुजारी यांनी गुजरातमध्येही असे फेडरेशन निर्माण व्हावे यासाठी प्रयासांना चालना दिले व फेडरेशनच्या स्थापनेनंतर बडोदा येथे महाराष्ट्र व गुजरात येथील फेडरेशनचे संयुक्त सांस्कृतिक अधिवेशनही घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची 1992 साली ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स, नवी दिल्ली’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे संचालक म्हणून निवड झाली. त्यांनी निरनिराळ्या राज्यांत प्रवास करून देशपातळीवर अर्बन बँकांच्या चळवळीचे प्रभावी संघटन उभे केले. पुजारी यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनच्या चमूने 1992 साली जर्मनी, नेदरलँड, फ्राँस, हॉलंड, इंग्लंड या देशांचा व 1994 साली हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, जपान या देशांचा सहकारी चळवळीच्या अभ्यासासाठी दौरा केला. नरसिंहन समितीचा अहवाल आणि नियोजन आराखड्यातून सहकाराचा अध्याय वगळणे यावर पुजारी यांनी ‘हल्लाबोल’ केला आणि जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, स्पर्धा यांचे भारतीय समाजजीवनावर होणारे अनिष्ट परिणाम समाजापुढे मांडण्यासाठी जागृतीची मोहीमही सतत राबविली.

पुजारी यांनी ‘अपेक्स बँक ऑफ अर्बन बँक्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या निर्मितीसाठी तसेच अपेक्स बँकेचे उपाध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील कलम 56 रद्द करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन अर्बन बँकांचे सांगलीला आपत्कालीन अधिवेशन भरवून हाणून पाडला होता.

पुजारी हे एकात्म समाज केंद्राचे संस्थापक विश्वस्त असून केंद्राच्या वतीने त्यांनी डॉ. वसंत जुगळे व प्रमोद पुजारी यांच्यासोबत बचतगटाच्या माध्यमातून समाज उभारणी या विषयावर बांगलादेशाचा अभ्यासदौरा करून तेथील बचतगट व लोकजीवन यांचा अभ्यास केला होता. केंद्राचे महिला बचतगटांना मदत करण्याचे कार्य सुरळीतपणे व्हावे म्हणून पुजारी यांनी सांगली अर्बन को-ऑप. बँकेत मायक्रोबँकिंग विभाग सुरू केला. केंद्राला नाबार्ड बँकेकडून पहिल्या क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.

पुजारी यांचा अमृतमहोत्सव मराठवाडा विभागातर्फे औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात व पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे सांगली येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी सांगली येथे तीन दिवस वैज्ञानिक कृषी प्रदर्शन, महाराष्ट्रातील पाणीपुरवठा यावर परिसंवाद, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राबाबत चर्चासत्रे व बचतगटाच्या महिलांचे संमेलन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पुजारी यांना स्वामी नारायणानंद मठातर्फे ‘समाजप्रबोधन मार्तंड’, सांगलीच्या बिझनेस एक्सप्रेस फाउण्डेशनतर्फे ‘सहकार श्री’, महाराष्ट्र सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे ‘विष्णुअण्णा पाटील सहकारी जीवनगौरव पुरस्कार’ असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना अपेक्स बँकेची स्थापना करून सहकारी चळवळीला नवी दिशा दिशा दिल्याबद्दल दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात ‘राष्ट्रीय सहकार पुरस्कार’ही देण्यात आला आहे.

- संपादित

पुजारी, बापूराव भाऊराव