पुरोहित, बाळकृष्ण लक्ष्मीकांत
बाळकृष्ण लक्ष्मीकांत पुरोहित यांनी १९४९मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून जी.बी.व्ही.सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात १९५०मध्ये याच महाविद्यालयात केली. त्यांची १९५२मध्ये पदोन्नतीने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी संक्षिप्त पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून १९५४मध्ये बी.एस्सी. (व्हेट.) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी सशस्त्र लष्करी दलाच्या विकृतिशास्त्र संस्थेत प्रशिक्षण घेतले. त्यांनी अमेरिकेतील कॅनसास स्टेट विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांची १९५८मध्ये विकृतिशास्त्र विभागात प्राध्यापक व १९६५मध्ये विभागप्रमुख म्हणून निवड झाली. त्यांनी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले.
डॉ.पुरोहित यांनी आपल्या कालखंडात पशुपैदास क्षेत्र आणि महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी विभागीय कुक्कुट पैदास केंद्रे पशु-संवर्धन खात्याकडे हस्तांतरित केली. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे, ध्येय-धोरणांमधील योग्य बदलांमुळे आणि त्यांच्या अखंड प्रयत्नांमुळे नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सर्व क्षेत्रांत अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या परिश्रमांमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाशी संलग्नता प्रस्थापित करून, तसेच योग्य प्रस्ताव सादर करून त्यांनी संशोधनाद्वारे पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. पदवी प्राप्त करण्याचा मार्ग खुला केला. डॉ.पुरोहित यांनी नागपूर विद्यापीठाशी निर्माण केलेले सलोख्याचे संबंध आणि सौहार्दपूर्ण वातावरण यामुळे त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने १९६८मध्ये प्रथम महाराष्ट्र कृषी विद्यापीठाशी आणि नंतर डॉ. पं.दे.कृ.वि.शी संलग्नता निर्माण करणे सुलभ झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अकोला येथे १९७१मध्ये पदव्युत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था स्थापन झाली.
- संपादित