Skip to main content
x

पुरोहित, केशव जगन्नाथ

शांताराम

     ‘शांताराम’ या टोपण नावाने लेखन करणारे केशव जगन्नाथ पुरोहित यांचा जन्म नागपूर येथे झाला. चामोर्शी (जि. गडचिरोली), चंद्रपूर अशा ठिकाणी शालेय शिक्षण घेतल्यानंतर १९४०साली ते मॅट्रिक झाले. १९४६मध्ये एम.ए. (इंग्लिश) झाल्यानंतर विदर्भ महाविद्यालय, अमरावती; नागपूर महाविद्यालय आणि नंतर मुंबईचे इस्माइल युसूफ महाविद्यालय येथे त्यांनी इंग्लिशचे अध्यापन केले. तेथूनच १९८१मध्ये प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. १९४० साली वयाच्या सतराव्या वर्षी ‘सह्याद्री’ मासिकाच्या डिसेंबर अंकातील ‘वार्‍यावरील विचार’ या लेखाने त्यांच्या लेखनाला आरंभ झाला. ‘अनिल कवींच्या काव्यवैशिष्ट्यांवरील एका तरुण लेखकाच्या शंका’ असे या लेखाचे सूत्र होते. ‘सह्याद्री’ मासिकाच्या सप्टेंबर १९४१च्या अंकात ‘भेदरेखा’ ही शांतारामांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. वर्षाच्या आत त्यांच्या आणखी पंधरा लघुकथा प्रकाशित झाल्या आणि १९४२मध्ये ‘संत्र्यांचा बाग’ हा सोळा लघुकथांचा पहिला संग्रह बाहेर पडला.

     त्यानंतर ‘मनमोर’ (१९४६), ‘शिरवा’ (१९५७), ‘छळ आणि इतर कथा’ (१९५९), ‘जमिनीवरची माणसं’ (१९५९), ‘लाटा’ (१९६२), ‘धर्म’ (१९६२), ‘चंद्र माझा सखा’ (१९६९), ‘अंधारवाट’ (१९७७), ‘उद्विग्न सरोवर’ (१९८२), ‘चेटूक’ (१९८४), ‘निवडक शांताराम’ (संपादित) (१९८९), ‘काय गाववाले’ (१९८९), ‘संध्याराग’ (१९९०), ‘रेलाँ रेलाँ’ (१९९२), ‘चैत्रागम’ (२००४), ‘कृष्णपक्ष’ (२००६) असे शांतारामांचे स्वतंत्र पंधरा कथासंग्रह आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांच्या काही कथा अजून संग्रहनिविष्ट व्हावयाच्या आहेत. ‘सावळाच रंग तुझा’ (१९५०) हा लघुनिबंधसंग्रह, एक अपुरी कादंबरी, एक अप्रकाशित नाटक, काही अनुवाद असेही लेखन त्यांनी केले आहे. ‘प्रातिनिधिक लघुनिबंधसंग्रह’ (१९६२) हे त्यांचे संपादन, त्यांची लघुनिबंधविषयक दृष्टी व्यक्त करणारे आहे. ‘व्रात्यस्तोम’ (१९९५), ‘मी असता’ (१९९८), ‘आठवणींचा पार (१९९८), ‘ठेवणीतल्या चिजा’ (२००३) हे आत्मपर लेखन त्यांच्या समाधानी, प्रसन्नचित्त व आशावादी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविते. ‘सफरनामा’ (२००९) हा त्यांचा प्रवासलेखांचा संग्रह त्यांच्या परदेशप्रवासाचे वेगवेगळे अनुभव चित्रित करणारा आहे. त्यातून ज्याप्रमाणे नवा देश, नवी माणसे, नवे जीवन पाहिल्याचा आनंद प्रत्ययास येतो, त्याप्रमाणेच त्यांचे चिंतनशील मन, भारतीय संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती यांच्यासंबंधी त्यांच्या मनात उठणारे विचारतरंग यांचेही दर्शन घडते. ‘बीजाक्षरे’ (२००६) हा त्यांचा समीक्षात्मक लेखांचा संग्रह.  त्यांच्या साहित्यमीमांसेमधून, दीर्घकालीन अभ्यासातून व व्यासंगातून निष्पन्न होणारी प्रौढता व प्रगल्भता व्यक्त झाली आहे. या पुस्तकातून व पुस्तकाबाहेरील लेखांतून प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटलपासून मराठी कादंबरीपर्यंत, आणि तौलनिक भाषाभ्यासापासून मराठी कथेपर्यंत बहुविध विषयांसंबंधीची त्यांची चिकित्सक दृष्टी प्रकटते. वेगवेगळे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले असले, तरी त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वावर मोहर आहे ती कथाकाराचीच. अमरावती येथे १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले ते मुख्यत्वे कथाक्षेत्रातील कामगिरीमुळेच.

     एकाच उत्कट भाववृत्तीने भारलेला, एकाच एका अंगाने विकास पावणारा एकलक्ष्यी अनुभव हा त्यांच्या ‘खार’, ‘चंद्र माझा सखा’, ‘जाणीव’ यांसारख्या कथांचा गाभा आहे. ‘खार’ या कथेने रसिक वाचकांचे व समीक्षकांचे लक्ष दीर्घ काळापासून वेधून घेतले आहे. स्फूर्तीचे चांचल्य व चापल्य, स्फूर्तीच्या निसटत्या स्पर्शानेही साफल्याची प्राप्ती घडण्याची शक्यता, तिच्या साहचर्यातील दिव्य आनंदाचा अनुभव, जे केवळ कलावंतच उमगू शकतो ते स्फूर्तीच्या प्राप्तीविना वाढणारे अनाम दु:ख, कलानिर्मितीचा क्षण, निर्मितीचा कष्टकारक अनुभव - या सार्‍यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती ‘खार’ या कथेत झाली आहे. पत्नीच्या सुखद सहवासातील आनंदाची जोड कलानिर्मितीच्या आनंदाला देऊन शांतारामांनी कथेला आणखी एक परिमाण दिले आहे.

     केवळ आधुनिकतेच्या तीव्र जाणिवेनिशी शांताराम कथालेखनास प्रवृत्त होत नाहीत. त्यांच्या संवेदनशीलतेचे नाते सनातन मानवी संबंधांशी आहे. त्यामुळे परंपरेने चालत आलेल्या या संबंधांतील भावसत्य उत्कटतेने जाणवले म्हणजे त्यांची कथा आकार धारण करते. कथालेखनाच्या दृष्टीने शहर, खेडे वा आदिवासींची वसाहत ही त्यांना सारखीच वाटतात. शहरी जीवनाचा अनुभव आणि खेड्यातील जीवनाचा अनुभव यांमध्ये त्यांचा विशेष काही अग्रक्रम असत नाही. शहरातला असो की खेड्यातला, माणूस तो माणूस, त्यात त्यांना भेद करावासा  वाटत नाही. शांतारामांनी साकार केलेली ही सारी माणसे ‘जमिनीवरची माणसं’ आहेत. सामान्य माणसांच्या सार्‍या मर्यादांची अटक त्यांच्या जीवनाला वेढून राहिलेली आहे. गुणदोषांची संमिश्रता हीच माणसाची प्रकृती आहे, याची जाणीव त्यांच्या कथा करून देतात. शांतारामांच्या बर्‍याच कथांतील व्यक्ती या केवळ सुट्या व्यक्ती म्हणून न येता समाजघटक म्हणून येतात. त्यांच्या कथेतील व्यक्तिदर्शनाचा परीघ मोठा आहे आणि वास्तवदर्शी जीवनचित्रणाला पूरक अशी समावेशक दृष्टी त्यांच्याजवळ आहे. सधन, संपन्न, रसिक आणि सौंदर्यवान स्त्री-पुरुषांप्रमाणेच गरीब, विपन्नावस्थेतील, मठ्ठ, कष्टकरी आणि बेताच्या रूपाच्या स्त्री-पुरुषांनाही त्यांची कथा नाकारत नाही. सामान्य स्थितीतील दरिद्री माणसांविषयीची लेखकाची जाण विशेष खोल आहे. त्यांचे कथाविश्व मध्यमवर्गीय विचारपद्धती, जीवनमूल्ये व नीतिसंकेत यांचे दर्शन घडविते. सामाजिक वास्तवाचा वेध घेणारे शांतारामांच्या कथांचे दुसरे रूप म्हणून भौगोलिक दृष्ट्या चामोर्शी, चांदा आणि गडचिरोली या प्रदेशात घडणार्‍या कथांचा उल्लेख करावा लागतो. या कथांच्या रूपाने वैनगंगेच्या परिसराला मराठी कथेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठसठशीत असे वाङ्मयीन अस्तित्व लाभले आहे.

     शांतारामांच्या कथेचे एक रूप शहरी जीवनचित्रणातून उभे राहते. मुंबईखेरीज नागपूर, अमरावती, अकोला, रायपूर, बडनेरा, खांडवा, जबलपूर, कलकत्ता, दिल्ली अशा अनेक शहरांचा नामनिर्देश त्यांच्या कथांत येत असला, तरी मुंबईच्या विशिष्ट स्वरूपाचा प्रभाव त्यांच्या कथांतील जीवनव्यवस्थेवर विशेषत्वाने पडलेला आहे. मुंबई शहराचे अनेक तपशील कथानिवेदक सांगतात. या शहरातील ऐश्वर्य, सुखलोलुपता, विलासी जीवनमान ही एक बाजू; या शहरातील गर्दी, दारिद्य्र, झोपडपट्ट्या, सुखाच्या ओढीने धडपडणारे जीव ही दुसरी बाजू; मुंबईतील चित्रपटसृष्टी व तिच्या ओढीने उद्ध्वस्त झालेली माणसे ही तिसरी बाजू. शांतारामांच्या कथेतील स्त्री-पुरुषसंबंधाचे चित्रण अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विवेक, विकार व संस्कार यांतील संघर्षातून उत्पन्न होणारे ताण त्यांची कथा समर्थपणे पेलते. लैंगिक संबंधांचे मनमोकळे चित्रण ते करतात. त्या संबंधांतून कोणत्याही विशिष्ट मनोवैज्ञानिक समस्येची उकल करण्याचा त्यांचा खटाटोप नसतो. त्यामुळे त्यांच्या कथांत स्पष्टता व सहजता स्वाभाविकपणे उतरते. स्त्री, स्त्रीदेहाची आवाहकता, स्त्रीचा मोह, त्याचे स्वरूप व परिणाम यांचा प्रभावी आविष्कार ‘रती’, ‘अंधारवाट’, ‘विवस्त्र’, ‘अतिरेकी’ अशा कथांतून घडतो. स्त्री-पुरुषसंबंधांतील भीती व वासना यांचा माणसाला होणारा जाच ‘वाघ’सारख्या प्रतीकात्मक कथेत नेमकेपणाने मूर्त होतो. ज्या काळात मनोव्यापारांवर आणि मनोविश्‍लेषणावर फार भर दिला जात होता, त्या काळात मराठी कथेत शारीर अनुभवांची जाण ठेवण्याचे काम शांतारामांनी केले आहे. शांतारामांच्या कथांतील स्त्री आपले पाय जमिनीवर पक्के रोवून उभी आहे. संसारात वा पुरुषसंबंधात आपले स्थान (रोल) कोणते आहे, आणि आपली किंमत काय आहे, या वास्तवाचे तिला अचूक भान आहे. ती केवळ भावनेच्या भरात वाहून जाणारी नाही, तर स्वत:च्या शक्तीची जाणीव असणारी आहे. (‘गोपिका’, ‘प्रवास’).

     शांताराम आपल्या कथानुभवांना कथारूप देताना प्रथमपुरुषी निवेदनपद्धती, तृतीयपुरुषी निवेदनपद्धती आणि या दोन पद्धतींना दिलेली संवादांची जोड अशा निवेदनाच्या तीन पद्धती मुख्यत्वे उपयोगात आणतात. त्यांच्या कथांतील निवेदकाचे अस्तित्व नेहमी ठसठशीतपणे जाणवते. ऐसपैस भाषेत संथ सुरात सुरू होणारी शांतारामांची कथा निवेदकाच्या निवेदनातूनच व्यक्तीवर, घटनांवर वा वृत्तिप्रवृत्तींवर भाष्य करीत करीत अशा एका क्षणाशी येते की, तेथून कथेचा पुढचा रोख पूर्णपणे बदलून जातो. हा परिवर्तनाचा क्षण एक प्रकारे साक्षात्काराचाच क्षण म्हणता येईल. त्या क्षणातून काही वेळा जीवनाचा न्याय, व्यवहार सूचित होतो (‘गोपिका’), काही वेळा तो क्षण जीवनाची दिशा बदलून टाकतो (‘स्वार्थ-परमार्थ’, ‘दीक्षा’), काही वेळा तो जीवनसाफल्याचा अनुभव देतो (‘ओलावा’), काही वेळा तो पुढचे जीवन जगायला, त्या जीवनाला दिशा लाभायला साहाय्यक ठरतो (‘जाणीव’).

    मानवी जीवनातील वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमूल्यांचे सजग भान व्यक्त करणारी आणि प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, सामंजस्य या मूल्यांची जपणूक करणारी पात्रसृष्टी शांतारामांनी निर्माण केली आहे. तसेच साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात खेड्याकडून शहराकडे, सामंतशाहीकडून लोकशाहीकडे, एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आणि घराच्या दावणीला बांधलेल्या स्त्रीकडून आत्मभान आलेल्या स्त्रीकडे अशा बहुविध सामाजिक स्थित्यंतरांचा आलेख त्यांच्या कथासाहित्याने रेखाटला आहे.

     - प्रा. डॉ. विलास खोले

पुरोहित, केशव जगन्नाथ