Skip to main content
x

पवार, अप्पासाहेब

     गरीब मराठा शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा एके दिवशी एका मोठ्या राज्याचा शिक्षण संचालक, एका नव्या विद्यापीठाचा शिल्पकार आणि थोर इतिहास संशोधक होऊ शकेल असे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल, पण डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या बाबतीत मात्र हे प्रत्यक्षात घडलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयी आत्यंतिक तळमळ असणारा हाडाचा शिक्षक, बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी झटणारा शासकीय अधिकारी, मराठ्यांच्या तेजस्वी परंपरेचा अभिमान असणारा विद्वान इतिहास संशोधक, कुशल व कार्यक्षम प्रशासक, शिवाजी विद्यापीठाचा पहिला कुलगुरू व शिल्पकार म्हणून डॉ. अप्पासाहेब पवार यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

     डॉ. अप्पासाहेब पवार यांचा जन्म कर्नाटक राज्यातील, बेळगाव जिल्ह्यातील मुचंडी या छोट्या खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी १९२८मध्ये बी.ए., १९३०मध्ये एम.ए., १९३१मध्ये एलएल.बी.पदवी संपादन केली. बेळगावातील थोर सत्यशोधक राष्ट्रवीरकार शामराव देसाई आणि कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य थोर शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण या गुरूंचे त्यांच्यावर संस्कार झाले. ते उच्चशिक्षणासाठी १९३१मध्ये लंडनला गेले. तेथे पीएच.डी. व बार-अ‍ॅट-लॉ या शिक्षण क्षेत्रातील उच्च पदव्या संपादन करून ते १९३५ मध्ये मायदेशी आले.

     त्यांनी १९३५ मध्ये राजाराम महाविद्यालयात इतिहास-अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. अल्पावधीतच एक अभ्यासू व विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. १९४५ मध्ये त्यांची राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक झाली. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये स्वत:ला झोकून दिले. महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध बनविले, सुसज्ज अभ्यासिकेची सोय केली, क्रीडा परंपरा अबाधित राखण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांचा एक विद्यार्थी खाशाबा जाधव १९४८च्या ऑलिंपिक सामन्यात चमकला. त्यांच्याच कारकिर्दीत राजाराम महाविद्यालयाचे नाव आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतून खूप गाजले. सर्व जातींतील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व सवलत देऊन  त्यांनी अनेकांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. स्वत:च्या शिस्तप्रिय, वक्तशीर व करारी स्वभावाद्वारे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये  शिस्त निर्माण केली. महाविद्यालयाच्या आत्तापर्यंतच्या वैभवशाली परंपरेला शोभेल अशीच स्वत:ची प्राचार्यपदाची कारकिर्द निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

     १९४९ साली गुजरातमधील वीसनगरच्या एम.एन. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची बदली झाली. भिन्न भाषा, भिन्न प्रांत, रखरखीत वाळवंटाचे सान्निध्य, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग आणि नुकतेच सुरू झालेले महाविद्यालय अशा अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी महाविद्यालयाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची नोंद घेऊन १९५२ साली सरकारने त्यांची नेमणूक जुन्या मुंबई राज्याचे शिक्षण उपसंचालक म्हणून केली आणि केवळ दोनच वर्षांत, १९५४ साली शालान्त परीक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांची १९५८ साली द्विभाषिक मुंबई राज्याचे शिक्षण सहसंचालक व १९५९ साली शिक्षण संचालक म्हणून नेमणूक झाली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षण संचालक झाले.

     प्राथमिक शिक्षण हा माध्यमिक शिक्षणाचा पाया आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुधारल्याशिवाय उच्च शिक्षणात आवश्यक तो बदल करता येणार नाही, हे जाणून त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रमीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सुधारणेवर भर देऊन, सर्वत्र शिक्षणाचे जाळे विणले.

    त्यांच्या शिक्षण संचालकाच्या कारकिर्दीत ग्रमीण भागात २५ प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालये, ४ हजारांहून अधिक प्राथमिक शाळा, १ हजारांहून अधिक नवीन माध्यमिक शाळा, १००हून अधिक उच्च शिक्षण देणार्‍या संस्था निर्माण झाल्या. एक महत्त्वाचे सैनिकी महाविद्यालय सातारा येथे त्यांनी सुरू केले. त्यांनी ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक अनुदान मंजूर करवून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणार्‍या शिक्षण संस्थांना स्थैर्य प्राप्त करून दिले. अनुदान देताना सर्वप्रथम खेडे, नंतर तालुका, त्यानंतर जिल्हा आणि शेवटी पुणे, मुंबई यांसारखी मोठी शहरे असा क्रम त्यांनी निश्चित केला. तळागाळातील समाजाला शैक्षणिकदृष्ट्या वर आणण्यासाठी नि:स्वार्थीपणे धडपडणारा  डॉ.अप्पासाहेब पवार यांच्यासारखा शिक्षणाधिकारी नसता तर मंत्री अनुकूल असूनही बहुजन समाजाला त्याचा फायदा झाला नसता. १९६२मध्ये अप्पासाहेब पवार यांची शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावाव्यतिरिक्त काहीही नसताना एका नव्या विद्यापीठाची उभारणी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. प्रारंभी ३४ महाविद्यालये व १४ हजार विद्यार्थीसंख्येवर विद्यापीठ सुरू झाले. कोल्हापूर शहराच्या दक्षिण-पूर्व दिशेकडील जुन्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंची ‘सागरमाळ’ म्हणून ओळखली जाणारी सुमारे एक हजार एकर जागा विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आली होती. १९६५पासून त्यांनी इमारतींच्या बांधकामाला प्रारंभ केला. अवघ्या तीन वर्षांत ३० इमारती बांधून घेतल्या. कुलगुरु पदाच्या बारा वर्षांच्या काळात त्यांनी ७०हून अधिक इमारतींचे बांधकाम, खेळाचे मैदान, रस्ते, पाणी, वीज आणि नयनमनोहर बगीचे अशा पायाभूत सुविधांसह निर्जन सागरमाळावर ज्ञानाचे नंदनवन उभे केले.

     त्यांनी विद्यापीठाच्या बाह्यांगाप्रमाणेच अंतरंगही कष्टपूर्वक घडवून नव्या प्रथा, परंपरा व योजना सुरू केल्या. विद्यापीठीय शिक्षण समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ‘बहि:शाल शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. विद्यापीठ जनतेपर्यंत नेण्याची (Taking the University to the People) त्यांची कल्पना होती. त्यासाठी बहि:शाल शिक्षण मंडळामार्फत ‘ग्राम शिबिरे’ भरवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी शेती, धान्योत्पादन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व आरोग्य यांसारख्या खेड्यातील जीवनाच्या विविध अंगाशी संबंधित विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद घडवून आणले. विद्यापीठ केवळ सुशिक्षितांपुरतेच मर्यादित राहू नये तर ते ग्रामीण भागातील जनतेचे बनावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. संलग्न महाविद्यालयांतून ‘खेडे दत्तक योजना’ त्यांनी अमलात आणली. समाजाच्या ज्ञानसाधनेची भूक भागविण्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकस्मृती व्याख्यानमाला, मराठा इतिहास व्याख्यानमाला, शाहूस्मृती व्याख्यानमाला असे उपक्रम सुरू केले. परिणामी लोकाभिमुख विद्यापीठाचा आदर्श शिवाजी विद्यापीठाने निर्माण केला.

     विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांनीच सोडवावेत, त्यांना स्वत:ची कर्तव्ये व जबाबदारी यांची जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘विद्यार्थी कल्याण मंडळा’ची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या हाती दर्जेदार पाठ्यपुस्तके पडावीत यासाठी ‘पाठ्यपुस्तक प्रकाशन योजना’, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण स्वकमाईतून घेता यावे यासाठी ‘कमवा आणि शिका योजना’, युवाशक्तीचा विधायक उपयोग करून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय सेवा योजना’, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ आणि विद्यापीठाचे भावी खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने ‘कॅच देम यंग स्कीम’ असे उपक्रम त्यांनी सुरू केले.

     त्याचवेळी त्यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रात शिक्षण प्रसारालाही मोठी चालना दिली. त्यामुळे त्यांच्या कुलगुरुपदाच्या काळात महाविद्यालयांची संख्या   ३४ वरून ८४पर्यंत आणि विद्यार्थी संख्या १४ हजारांवरून ६४ हजारांवर पोहोचली. ‘व्यवसायाभिमुख आणि जीवनाभिमुख शिक्षण’ ही दृष्टी ठेवून त्यांनी शिवाजी विद्यापीठात अनेक अभिनव योजना आखल्या आणि त्या यशस्वीपणे राबवल्या. त्यांच्या अनेक योजना विद्यापीठ अनुदान मंडळाने नंतर देशभर राबवल्या. अलीकडे ‘नॅक’नेही ज्या योजनांची शिफारस करायला सुरुवात केली आहे, त्या योजना ५० वर्षांपूर्वी डॉ. पवार यांनी शिवाजी विद्यापीठात सुरू केलेल्या होत्या. यावरून त्यांची प्रगल्भ दूरदृष्टी दिसून येते. शिवाजी विद्यापीठ हेच डॉ. अप्पासाहेब पवार यांचे खरे ‘चिरंतन स्मारक’ होय.

     डॉ. अप्पासाहेब पवार हे मूळात मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि व्यासंगी संशोधक होते. अनेक संशोधन पत्रिकांमधून व स्थानिक वर्तमानपत्रांमधून त्यांनी ऐतिहासिक लेख लिहिले. मराठ्यांचा चुकीचा इतिहास सबळ पुराव्यानिशी खोडून काढण्याचे आणि खरा इतिहास उजेडात आणण्याचे कार्य त्यांनी केले. मराठा इतिहासाचे मूलगामी संशोधन व्हावे म्हणून त्यांनी कोल्हापूर, तंजावर, मद्रास इत्यादी ठिकाणांहून अत्यंत दुर्मिळ कागदपत्रे अतिशय परिश्रमपूर्वक जमा केली, संपादित केली आणि ती विद्यापीठामार्फत प्रकाशित करण्याची योजना सुरू केली. त्यासाठी त्यांनी विद्यापीठात ‘इतिहास ग्रंथमाला’ आणि ‘स्टडीज् इन मराठा हिस्ट्रीज’ अशा दोन ग्रंथमाला सुरू केल्या. त्यांच्यामुळेच ताराबाईकालीन कागदपत्रांचे तीन खंड, जिजाबाईकालीन कागदपत्रे, ताराबाईकालीन फारशी पत्रव्यवहार, राजर्षी शाहू महाराजांची कागदपत्रे, ‘Studies in Maratha History’’ इत्यादी अनेक खंड प्रकाशित झाले. या खंडाच्या माध्यमातून संभाजी महाराज, राजाराम महाराज व महाराणी ताराबाई, कोल्हापूरची राणी जिजाबाई यांच्या कारकिर्दीमधील अनेक अज्ञात घटना व व्यक्ती उजेडात आणल्या गेल्या. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचे सखोल संशोधन व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठ परिसरात १९७० साली ‘शाहू संशोधन केंद्र’ स्थापन केले. त्यासाठी ‘India office Library,London येथून शेकडो कागदपत्रे त्यांनी आणवली व त्यांचे संपादन केले. इतिहास संशोधनातील त्यांच्या योगदानामुळे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, वा.सी. बेंद्रे अशा इतिहासकारांच्या नामावलीत डॉ. अप्पासाहेब पवार यांचे नाव घेतले जाते.

     शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि इतिहास संशोधन अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत असतानाच, राज्य व केंद्र शासनाच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. २० जानेवरी १९७५ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरून डॉ. अप्पासाहेब पवार निवृत्त झाले. निवृत्तीनंतर शाहू महाराजांवरील संशोधनासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घ्यायचे ठरवले होते, पण दुर्दैवाने त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे शाहू संशोधन केंद्र, विद्यापीठाच्या स्वाधीन करून ते पुण्याला स्थायिक झाले. तेथेच त्यांचे निधन झाले.

डॉ. भाग्यश्री जाधव

पवार, अप्पासाहेब