Skip to main content
x

पवार, ललिता गणपत

चित्रपटसृष्टीत ज्या काळात पुरुष खलनायकांचा राबता होता, त्या काळात आपल्या खलनायकी भूमिकांसाठी लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी झाला. त्यांच्या वडिलांनी - लक्ष्मण सगुण यांनी मुलीचे नाव अंबिकाअसे ठेवले. उदरनिर्वाहासाठी लक्ष्मण सगुण हे कापडविक्रीचा उद्योग करत असत.

लहानपणापासूनच धीट स्वभावाच्या अंबिका यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात त्यांनी आर्य महिला’, ‘ठकसेन’, ‘पारिजातक’, ‘भीमसेन’, ‘पृथ्वीराज संयोगिता’, ‘नको गं बाई लग्नया चित्रपटांमधून कामे केली होती.

अमृतया नवयुग फिल्मच्या चित्रपटात त्यांनी साकारलेली चांभारणीची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली, तर नेताजी पालकर’, ‘भक्त दामाजी’, ‘गोरा कुंभार’, ‘संत बहिणाबाईया चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षणीय ठरल्या.

ललिताबाईंच्या भूमिकेतील वैशिष्ट्य लक्षात घेऊनच प्रभातने रामशास्त्रीया चित्रपटातील आनंदीबाईंच्या भूमिकेसाठी त्यांना निवडले. ललिताबाईंनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर महत्त्वाकांक्षी, करारी व निष्ठुर स्वभावाची आनंदीबाई यथोचितपणे साकारली. या चित्रपटातील आनंदीबाईंच्या भूमिकेमुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहोचले. यानंतर त्यांना झुमके’, ‘बैरामखान’, ‘संतानया हिंदी चित्रपटात कामे मिळाली. जय मल्हारया पहिल्या ग्रामीण धर्तीच्या चित्रपटात ललिताबाईंनी साकारलेली मुरळीची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती.

चित्रपटांमध्ये काम करत असतानाच चित्रपटसृष्टीतील अंबू यांनी गणपत पी. पवार यांच्याशी विवाह केला आणि त्या ललिता पवार या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. याच काळात त्या हिंदी स्टंटपटातही कामे करत असत. चित्रपटात मा. भगवान यांच्याबरोबर काम करत असताना मा. भगवान ललिताबाईंच्या थोबाडीत मारतात, असे दृश्य होते. त्याचे चित्रीकरण चालू असतानाच पहेलवान असणाऱ्या मा. भगवान यांनी जोराने ललिताबाईंच्या गालावर मारलेली चपराक ललिताबाईंचा गाल पॅरालाईज्ड करून गेली. डोळ्याची रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. त्या वेळेस तिरळा झालेला डोळा तीन वर्षांच्या उपचारांनंतरही सरळ झाला नाही. त्यांच्या तिरळ्या डोळयाचा परिणाम त्यांच्या अभिनयावर झाला नसला तरी त्यांना मिळणाऱ्या भूमिकांवर निश्‍चितपणे झाला. त्यानंतर प्रेक्षकांना त्या नायिकेच्या ऐवजी चरित्रभूमिका साकार करताना दिसू लागल्या. नायिकेच्या भूमिकेत वावरणाऱ्या या हाडाच्या अभिनेत्रीने त्यात कमीपणा न मानता किंवा या प्रसंगाने हरून न जाता, आपली अभिनय कारकिर्द सुरूच ठेवली व अभिनयाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला उत्तुंगता प्राप्त करून घेतली.

डोळा तिरळा झाल्यानंतर ललिता पवार यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट होता गृहस्थी’. यात त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी मानाचं पान’ (१९४९), ‘अमर भूपाळी’ (१९५१), ‘नंदकिशोर’ (१९५१), ‘छत्रपती शिवाजी’, ‘मायेचा पाझर’ (१९५२), ‘संत बहिणाबाई’ (१९५३), ‘कलगीतुरा’ (१९५५), ‘पायदळी पडलेली फुलं’ (१९५६), ‘देवाघरचं लेणं’ (१९५७), ‘सुखाचे सोबती’ (१९५८), ‘सतीचं वाण’ (१९६९), ‘चोरीचा माल’ (१९७६), ‘सासुरवाशीण’ (१९७८), ‘घरचा भेदी’ (१९८४), ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ (१९८४), ‘लिमिटेड माणुसकी’ (१९९४) अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अस्सल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. यापैकी अनेक भूमिका खाष्ट सासूच्या किंवा खलनायकी प्रवृत्तीच्या होत्या.

दरम्यानच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतही केवळ अभिनयक्षमतेच्या जोरावर त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजकपूर निर्मित अनाडीचित्रपटातल्या, वरकरणी खाष्ट पण प्रेमळ मिसेस डिसाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. यासाठी त्यांना १९५९ सालचा फिल्मफेअरहा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. श्री ४२०’ (१९५५), ‘गंगामाई’ (१९५५), ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस ५५मध्ये सीतादेवी, ‘सुजाता’ (१९५९)मध्ये गिरीबाला, ‘हम दोनो’ (१९६१)मध्ये मेजरची आई, ‘प्रोफेसर’ (१९६१) मध्ये सीतादेवी वर्मा याही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. दुसरी सीता’ (१९७४), ‘आज का ये घर’ (१९७६), ‘तपस्या’ (१९७६), ‘आईना’ (१९७७), ‘काली घटा’ (१९८०), ‘फिर वही रात’ (१९८०), ‘सौ दिन सासकेया चित्रपटांतूनही त्यांनी चरित्रअभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या.

गणपत पवारांबरोबरचा त्यांचा विवाह अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मुंबईच्या अंबिका स्टुडिओचे चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी विवाह केला. मात्र आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या एकाकी झाल्या आणि पुण्याला औंध भागात स्थायिक झाल्या. पुण्यातच त्यांचे निधन झाले.

       - संपादित

संदर्भ :
१) मराठी विश्वकोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई.
२) पुराणिक अरुण, अंबू उर्फ ललिता पवार, लोकप्रभा; ८ जून २०१२.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].