Skip to main content
x

पवार, सुशीला बापूराव

वनमाला

     ‘श्यामची आई’  या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशीला बापूराव पवार यांचा जन्म उज्जैन येथे झाला. चित्रपटसृष्टीत आल्यावर आचार्य अत्रे यांनी त्यांचे नाव ‘वनमाला’ असे ठेवले. शालेय शिक्षण झाल्यावर ग्वाल्हेरच्या महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल बापूसाहेब पवार ग्वाल्हेर संस्थानचे मंत्री होते, तर धार्मिक प्रवृत्ती असणारी आई सीतादेवी ही गृहिणी होती. घरातल्या वातावरणामुळे लहानपणापासूनच घोडेस्वारी, टेनिस, बॅडमिंटन अशा खेळात त्या प्रवीण होत्या.

     बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर वनमालाबाई मुंबईला आल्या. त्यांनी बॉम्बे सेकंडरी ट्रेनिंग महाविद्यालयामधून १९३८ साली बी.टी. ही पदवी घेतली आणि पुण्यात येऊन आगरकर हायस्कूल येथे त्या नोकरी करू लागल्या. त्या काळात लेखक प्र.के.अत्रे पुण्याच्या कॅम्प सोसायटीच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. वनमालाबाईंशी त्यांची ओळख होती. त्यांनीच वनमालाबाईंना चित्रपटात काम करण्याविषयी सुचवले. आचार्य अत्रे त्या वेळी नवयुग चित्रपट लि. या संस्थेत एक पदाधिकारी होते. नवयुग फिल्म कंपनी त्या वेळी ‘लपंडाव’ हा चित्रपट तयार करत होती. अत्रेंनी ‘लपंडाव’ चित्रपटासाठी नायिका म्हणून वनमालाबाईंचे नाव सुचवले. टेनिस कोर्टवर टेनिस खेळणाऱ्या आधुनिक सुशिक्षित तरुणीची ती भूमिका होती. त्यांच्या त्या भूमिकेतले, त्या पोशाखातले फोटो मग त्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाले. १९४० साली ‘लपंडाव’ प्रदर्शित झाला आणि वनमालाबाई एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोचल्या.

      मिनर्व्हा मुव्हिटोनचे सर्वेसर्वा सोहराब मोदी ‘लपंडाव’ पाहण्यासाठी आले होते. वनमाला यांचे सौंदर्य आणि अभिनय पाहून त्यांनी आपल्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटासाठी नायिका म्हणून त्यांची ताबडतोब निवड केली आणि ‘कराराची रक्कम’ म्हणून १०१ रुपयेही दिले. पृथ्वीराज कपूर हे ‘सिकंदर’ चित्रपटाचे नायक होते आणि सिकंदरच्या पत्नीची म्हणजे ‘रुक्साना’ची भूमिका वनमालाबाईंनी केली होती. पुढे अत्रे नवयुग कंपनीतून बाहेर पडले आणि ‘आशा चित्र’ या संस्थेला त्यांनी ‘घरजावई’ या चित्रपटाची कथा दिली. चित्रपटात वनमालाबाईंना प्रमुख भूमिका मिळावी अशी अत्रे यांनी नवयुग कंपनीला अटही घातली. त्यानुसार ‘घरजावई’ चित्रपटात वनमालाबाईंनी भूमिका केली. हा चित्रपट १९४१ साली प्रदर्शित झाला. यानंतर प्र.के. अत्रे यांनी स्वत:ची ‘अत्रे चित्र’ संस्था स्थापन केली आणि १९४१ सालीच ‘पायाची दासी’ (मराठी) आणि ‘चरनोंकी दासी’ (हिंदी) हे चित्रपट काढले. या चित्रपटातल्या वनमालाबाईंच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. पुढच्या काळात अत्रे यांनी ‘वसंतसेना’, ‘बाइलवेडा’, ‘दिल की बात’, ‘परिंदे’ असे अनेक चित्रपट काढले. त्यांच्या सर्व चित्रपटात वनमालाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या. ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रह्मघोटाळा’ या चित्रपटातल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘चार्लीज आँट’ या इंग्रजी नाटकावर ‘मोरूची मावशी’ हा चित्रपट, तर ‘ब्रह्मघोटाळा’ हा चित्रपट ‘लग्नाची बेडी’ या नाटकावर बेतलेला होता. या चित्रपटातली ‘रश्मी’ची भूमिका तरुण प्रेक्षकांना आवडली होती.

     ‘मुस्कुराहट’, ‘कादंबरी’, ‘महाकवी कालिदास’, ‘परबतपे अपना डेरा’, ‘सुनो सुनाता हूँ’, ‘शरबती आँखे’, ‘हातिमताई’, ‘आझादी के बाद’ अशा हिंदी चित्रपटांतूनही वनमालाबाईंनी भूमिका केल्या होत्या. यामध्ये ‘परबतपे अपना डेरा’ या चित्रपटातल्या आंधळ्या नायिकेच्या भूमिकेसाठी शांतारामबापूंनी वनमालाबाईंना बोलावले होते. तसेच जेबीएच वाडिया यांनी वनमालाबाईंच्या डोळ्यांवरूनच ‘शरबती आँखे’ हा चित्रपट बनवला आणि त्यांना नायिकेची भूमिका दिली. १९५३ साली आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटात वनमालाबाईंनी श्यामच्या आईची भूमिका केली. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिला राष्ट्रपती पुरस्कार आणि सुवर्णपदक मिळाले. महाराष्ट्र शासनाने त्यांना व्ही. शांताराम हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट आणि त्यातील श्यामच्या आईची भूमिका वनमालाबाईंच्या अभिनयाने अजरामर झाली. १९५४ साली पडद्यावर आलेला के.बी. लाल यांचा ‘अंगारे’ हा चित्रपट वनमालाबाईंचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. मात्र अखेरपर्यंत त्या सार्वजनिक कार्यात मग्न होत्या. वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

- द.भा. सामंत

संदर्भ
१) वनमाला, 'परतीचा प्रवास', विहंग प्रकाशन, पुणे; २००७.
पवार, सुशीला बापूराव