Skip to main content
x

फादर दलरी

दलरी, गाय अल्बर्ट

      प्रो. गाय अल्बर्ट दलरी यांचा जन्म फ्रान्समध्ये १९२२ साली झाला. फ्रान्समध्ये असताना त्यांच्यावर फ्रेंच संस्कृत विद्वान प्रा. सिल्व्ह लेवी यांच्या कार्याची छाप पडली. त्यांना संस्कृत ग्रंथ समजावून घेण्याची इच्छा झाली; परंतु त्यासाठी देशांतर करावे लागेल, यामुळे ते काही काळ संस्कृत सोडून मराठीकडे वळले. भारतातील अध्यात्माची - विशेषत: वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाची त्यांना गोडी लागली आणि संत तुकारामांच्या १०१ अभंगांचे - जे वारकर्‍यांच्या नित्यपाठात होते त्यांचे - फ्रेंच भाषांतर त्यांनी १९५६ साली केले. हे सर्व अभंग फडावर गाईले जाणारे होते आणि त्यातून एखाद्या धर्मग्रंथापेक्षा मराठी धर्म संप्रदायावर अभ्यास करावा असे त्यांना वाटले. त्याखेरीज त्यांनी ‘इंडिया रिबेल कॉन्टीनेंट’, ‘महात्मा गांधी’, ‘तुकाराम’, ‘महाराष्ट्र संस्कृत’ असे ग्रंथ लिहिले. १९४३ ते १९७३मध्ये ते भारतात वास्तव्याला होते. १९६० साली त्यांनी विठ्ठल संप्रदायावर पीएच.डी. संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी म्हटले आहे, ‘‘महायुद्धामुळे घडलेल्या मानव संहारामुळे मनाला उद्विग्नता आली. भारताची हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा मी ख्रिश्‍चन असूनही मला खेचू लागली. पुण्यात आल्यावर मी वारकरी समाजाकडे खेचलो गेलो. १९५१ त्यांना कै. मामासाहेब दांडेकरांच्या दिंडीतून पायी वारी केली आणि नंतर पुढे आठ वर्षे पंढरपूर श्रीविठ्ठल यांचा अभ्यास सुरू केला. डेक्कन कॉलेजचे डॉ. एस.एम. कात्रे आणि डॉ. ह.धी. सांकालिया यांनी मला प्रोत्साहन दिले.’’

वारकरी संप्रदाय, क्षेत्र पंढरपूर, विठ्ठलदेवता या सर्वांचा इतिहास, भूगोल, मूर्तिविज्ञान इत्यादी विषयांवर संशोधनात्मक छायाचित्रे, नकाशे यांच्यासहित क्षेत्राभ्यास करून ‘कल्ट ऑफ विठोबा’ नावाचा ग्रंथ तयार केला. त्याला मूर्तिविज्ञानाची जोड दिली. ग्रंथ अलौकिक झाला. फ्रान्स आणि भारत दोन्ही देशात गाजला. पुणे विद्यापीठाच्या अनुदानातून तो प्रसिद्ध झाला आणि आता नुकतीच त्याची दुसरी आवृत्ती निघाली.

१९५६मध्ये संत तुकारामांच्या अभंगाचे फ्रेंच भाषांतर डॉ. दलरींच्या आग्रहाखातर फ्रान्सच्या रेडिओवर प्रसारितही झाले. फादर दलरींचा ‘कल्ट ऑफ विठोबा’ अभ्यासल्याखेरीज देशी-विदेशी, वारकरी संप्रदाय, विठ्ठल दैवत, पंढरपूर यांच्या अभ्यासकांना पुढे जाता येणार नाही. १९६० साली डेक्कन कॉलेजने तो प्रकाशित केला. अलीकडेच प्रा. जी.ए. दलरी एक अभ्यासाचा विषय बनले असून पुण्यातील एक विदुषी त्यांचे चरित्र लिहीत आहेत, असे कळते.

एक मात्र खरे, वारकरी संप्रदाय, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर यावर जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करायचा असेल, तर फादर दलरी यांच्या ‘कल्ट ऑफ विठोबा’शिवाय पर्याय नाही.

वा.ल. मंजूळ

फादर दलरी