Skip to main content
x

फडके, दत्तात्रेय यशवंत

     प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानावर आधारित वैज्ञानिक प्रगतीचे सुवर्णयुग विसाव्या शतकाच्या मध्यकाली जगभर अवतरले. स्वतंत्र भारतात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान रुजविण्यात डॉ. दत्तात्रेय यशवंत फडके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचा जन्म महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात, जमखंडी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात सोलापूर व नाशिक येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे व मुंबई येथे झाले. जन्मजात धाडसी आणि साहसी प्रवृत्ती असल्याने शारीरिक क्षमतेचा कस लागणारे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी रितीने तडीस नेणे, हा तर विद्यार्थिदशेपासूनचा फडके यांचा छंदच होता. त्याचीच सुधारून वाढविलेली आवृत्ती त्यांच्या वैज्ञानिक म्हणून जवळजवळ तीन दशकांच्या कारकिर्दीत दृष्टोत्पत्तीस येते. भौतिकशास्त्रात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर ते जर्मनीतील बॉन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे १९३४ साली ‘कन्टिन्यूअस स्पेक्ट्रा ऑफ गॅसेस अंडर प्रेशर’ या शाखेत संशोधन करून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. भारतात परतल्यानंतर १९३७ सालापासून तब्बल बारा वर्षे त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्या काळात प्रगत वैज्ञानिक संशोधनासाठी निरनिराळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संयंत्रे वापरण्याची निकड वाटायची. परंतु तशी संयंत्रे सहजासहजी मिळत नसत. अशा वेळी ही उपकरणे स्वत: आपल्या हाताने बनवावी लागायची. डॉ. फडके अशा तऱ्हेच्या कामात निष्णात होते.

     याच संदर्भात त्यांचा डॉ. होमी भाभांशी परिचय झाला. त्या वेळी डॉ. भाभा मुंबईतच टाटा मूलभूत संशोधन संस्था सुरू करण्याच्या कामात गुंतले होते. त्यांनी डॉ. फडके यांना आपल्या संस्थेत काम करण्यासाठी १९४९ साली पाचारण केले. तेव्हापासून १९७६ साली आपल्या मृत्यूपर्यंत डॉ. फडके टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि भाभा अणू संशोधन केंद्रात कार्यरत होते. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, आधारित संयंत्रांच्या उभारणीची पायाभरणी केली. त्याचप्रमाणे भाभा अणू संशोधन केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स तांत्रिक भौतिकी शाखेचा विस्तार करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते.

     प्रगत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या समान धाग्याने विणलेल्या निरनिराळ्या शाखांमध्ये आव्हानात्मक प्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेण्यासाठी कसोशीने आटोकाट प्रयत्न करीत राहणे, हा डॉ. फडके यांचा मूलमंत्र होता.

     कोलकात्याच्या व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉनची निर्मिती, विद्युत चुंबकीय सूक्ष्मतरंग विज्ञानाच्या विकासासाठी ‘सर्फर’ या स्वायत्त संस्थेचा प्रकल्प, संरक्षण दलात वापरली जाणारी निरनिराळी इलेक्ट्रॉनिक संयंत्रे आणि उपकरणे बनविण्याचे तंत्र, उच्च निर्वात तंत्रात लागणारे प्रगत पंप बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान, इत्यादी अनेक तंत्रांचा विकास आणि संशोधनात्मक सखोल अभ्यास भारतातच करून आपली स्वयंनिर्भरता आणि त्या अनुषंगाने आत्मविश्वास नव्या पिढीत निर्माण करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य डॉ. फडके यांनी केले.

     १९४८ साली ट्रान्झिस्टरचा (घनस्थिती विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्सचा मूलाधार) शोध लागला. त्यामुळे जुन्या निर्वात नलिकांवर आधारलेले इलेक्ट्रॉनिक्स तंत्र जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकणारे ‘घनस्थिती इलेक्ट्रॉनिक्स तंत्र’ अस्तित्वात आले. इलेक्ट्रॉनिक्स तंत्राची घोडदौड सुरू झाली. तो काळ म्हणजे संगणक युगाच्या उदयाचाही काळ होता. डॉ. फडके यांनी भारतात पहिलावहिला संगणक बांधण्याचे आव्हान स्वीकारले. ‘टिफ्रॅक’ (टी.आय.एफ.आर.ए.सी.) या नावाचा हा भला मोठा संगणक त्या काळात जनमानसांत प्रचंड कुतूहलाचा विषय झाला होता. अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची गरज भागविणारा प्रकल्पही डॉ. फडके यांनी हाती घेतला होता. ‘इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक एकक’ या नावाने सुरू झालेल्या या प्रकल्पाचे कालांतराने हैदराबादमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (इ.सी.आय.एल.) मध्ये रूपांतर झाले आहे. दूरचित्रवाणी संचाचे भारतातील पहिले उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केले.

     त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी कित्येक प्रगत तंत्रज्ञानांवर विकासाचे कार्य भारतात सुरू केले गेले. त्यांतील वानगीदाखल खास लक्षणीय प्रकल्पांची व्याप्ती पाहिली की डॉ. फडक्यांच्या चौफेर भरारीची कल्पना करता येईल. अवघड प्रकल्प दृष्टिपथात आला की ते उत्साहाने कामाला लागत. ‘‘प्रकल्प पुरा करण्यात यश न मिळू शकेल तर? त्यापेक्षा एखादा साधा, सोपा प्रकल्प हाती घ्यावा, म्हणजे यशाची खात्री शंभर टक्के. अपयश तरी आपल्या पदरी नको यायला,’’ असा सोज्ज्वळ सल्ला कोणी देऊ लागला, तर डॉ. फडके अस्वस्थ होत असत. ते म्हणायचे, ‘‘अवघड प्रकल्पांना घाबरून पळपुटेपणा करण्यात कसली आली आहे मर्दुमकी? एखादे वेळी उडी मारताना पडायला होईलही, उडी चुकेलही; पण म्हणून उडी मारायचीच नाही, हे बरोबर नाही. संशोधन आणि विकास कार्यासाठी चुकण्याचा धोका पत्करायलाच पाहिजे.’’ या त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांनी कोलकात्याला व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन बनविण्याचे शिवधनुष्य उचलण्यात पुढाकार घेऊन काम सुरू केले. तेही १९६०-१९७० सालांच्या दरम्यान. अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारताच्या नव्या दमाच्या वैज्ञानिकांना जगात अग्रेसर प्रतीचे संशोधन करण्याची संधी अशा प्रकल्पांच्या पूर्तीमुळे मिळणार होती.

     प्रोट्रॉन, अल्फा कण अशासारख्या मूलभूत महत्त्वाच्या कणांची ऊर्जा लक्षावधी / कोट्यवधी इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी वाढवून, त्यांचा मारा इतर विशिष्ट अणूंवर करून घडवून आणता येणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करता यावा, असा यामागचा हेतू होता. त्यासाठी उच्च निर्वात-तंत्र, उच्च चुंबकीय क्षेत्रांची निर्मिती, मोजमाप वगैरेंवर पूर्ण पकड, अणुप्रक्रियांच्या अभ्यासाला लागणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती भारतातच करून हा प्रकल्प यशस्वी करून दाखविण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. डॉ. फडके यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी म्हणजे जून १९७७ मध्ये हा प्रकल्प यशस्विरीत्या पूर्ण झाला.

     त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला गेलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे भारतीय सेनादलातील रणगाड्यांवर लावल्या जाणाऱ्या ‘निशादर्शी’ (नाइट व्हिजन) उपकरणांचा देशांतर्गत विकास. शत्रूच्या गोटात चालू असणाऱ्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळीही स्पष्टपणे दिसावे अशी उपकरणे बनविण्याबाबत स्वयंनिर्भर होणे ही संरक्षण दलाची महत्त्वाची गरज होती. हा प्रकल्पही डॉ. फडके यांच्या मृत्यूनंतर पूर्णत्वाला गेला. त्यानुसार भारत सरकारच्या एका सार्वजनिक उपक्रमात अशा निशादर्शी उपकरणांचे नियमित उत्पादन करून ती भारतीय सेनेच्या सेवेत कार्यरतही आहेत.

     विद्युतचुंबकीय लहरींच्या वर्णपटांत सूक्ष्मलहरी-मायक्रोवेव्ह-अंतर्भूत आहेत. सूक्ष्मलहरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वांगीण सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने डॉ. फडके यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कार्य सुरू झाले होते. कालांतराने ‘समीर’ (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्टॉनिक इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च) या नावाची एक स्वयंपूर्ण संशोधन संस्था मुंबई आय.आय.टी.च्या संकुलात १९८४ सालापासून कार्यरत आहे.

     असे सर्वांगीण विकासकार्य करूनदेखील डॉ. फडके यांना प्रसिद्धी आणि नावलौकिकाची आशा अपेक्षा नसे. वैज्ञानिकांच्या कार्याचे फलस्वरूप म्हणजे निरनिराळ्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, अशी सर्वसाधारण मान्यता आहे. तथापि डॉ. फडके यांच्या नावे फारसे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची प्रसिद्धिपराङ्मुख वृत्तीच याला कारणीभूत आहे.

     डॉ. फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अध्यात्मासारख्या विषयातही डोळस, चौकस आणि तर्कशुद्ध, बुद्धिवादी भूमिकेतून त्यांनी केलेला अभ्यास आणि चिंतन. या संदर्भात स्वामी चिन्मयानंदांसारख्या अध्यात्ममार्गातील जाणकारांशी डॉ. फडके वेळोवेळी चर्चा करीत. अशा चर्चासत्रांमध्ये स्वामी चिन्मयानंद डॉ. फडके यांच्याबद्दल गौरवोद्गारही काढत असत.डॉ. फडके यांच्या भरीव कार्याचा भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.

- डॉ. गो. के. भिडे

फडके, दत्तात्रेय यशवंत