Skip to main content
x

फडके, गोविंद नारायण

        गोविंद नारायण फडके यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुभद्राबाई होते. त्यांचे वडील मुंबईतच इस्माईल यूसुफ महाविद्यालय व नंतर रूपारेल येथे गणिताच्या अध्यापनाचे काम करीत असत. वडील शिक्षक असल्याने गोविंदरावांना घरातूनच शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण छबिलदास शाळेतून पूर्ण झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते बोर्डातून अकरावे आले. १९५२ साली त्यांनी इंटरची परीक्षा एलफिन्स्टन महाविद्यालयातून दिली व त्या वेळी ते विद्यापीठात दुसरे आले. त्या काळी समाजात अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे वारे असल्यामुळे ते आपसूकच अभियांत्रिकीकडे वळले आणि नावाजलेल्या मुंबईच्याच व्ही.जे.टी.आय. अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांना नागरी अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला.

        १९५५ साली त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फरीदपूरच्या आयआयटीत पुढचे शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर त्यांना नोकरी स्वीकारावी लागली. लोणावळ्याच्या सैन्य अभियांत्रिकीमध्ये ते रुजू झाले. परंतु तेथे स्वस्थ न बसता त्यांनी इंडियन रेल्वे सर्व्हिस इंजिनिअरिंगची परीक्षा दिली. १९५७ साली ते रेल्वे सेवेत साहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले. गोंदिया येथे त्यांची रेल्वे सेवेतील पहिली नेमणूक झाली. या ठिकाणी त्यांना नागपूर ते कलकत्ता जाणाऱ्या एकेरी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम देण्यात आले. या मार्गात येणाऱ्या नद्यांवरील पूल बांधून रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडले. त्यांच्या या कामगिरीमुळे सोबतच्या १०० अभियंत्यांपैकी त्यांची एक्स्क्ल्यूझिव्ह अभियंता म्हणून निवड करण्यात आली.

        या दरम्यान कलकत्त्यात (कोलकाता) हल्दिया हे नवीन बंदर उभारण्यात येत होते. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या बंदराच्या उभारणीसाठी आणि बंदरातून होणारा व्यापार संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी रेल्वेमार्गाची आवश्यकता होती. बंदर परिसरात २०० मैलांपर्यंत कुठेच चांगला दगड मिळत नव्हता आणि बंदर उभारण्यासाठी दगडांची आवश्यकता होती. बाहेरचा दगड आणण्यासाठी रेल्वेची नितांत गरज होती म्हणून या रेल्वे उभारणीच्या कामावर गोविंद फडके यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणापासून ते रेल्वे त्या मार्गावरून धावली जाण्यापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण केले.

        या दरम्यान त्यांना एक महत्त्वाची अडचण आली. गाळाच्या मातीने बनवलेल्या एका कालव्यावरील पुलाचा (हिजली टाइडल कॅनाल) एक हजार फूट लांब भराव पूर्णत: खचला आणि ३० फुटांवरून तो २० फुटांपर्यंत खाली आला होता. कॅनालमधली वाहतूक थांबली होती. हा पूल पुन्हा उभारणे गरजेचे होते. तेव्हा गोविंद फडकेंनी एक कल्पना मांडली. लोखंड बनवताना शिल्लक राहणारी पंचवीस ट्रेन राख पोलादपूरहून आणली गेली व खचलेला भराव पूर्ण करून रेल्वेमार्ग उभारण्यात आला. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यावरून तेव्हाच्या कलकत्ता मेट्रो रेल्वेचे महाप्रबंधक एम.एस.मुखर्जींनी त्यांची मेट्रो रेल्वेच्या कामात मुख्य अभियंता म्हणून नेमणूक केली.

        १९७२मध्ये सुरुवात झालेल्या पूर्णत: जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा १९८४मध्ये पूर्ण झाला. या रेल्वे प्रकल्पाला जगातील सर्व मेट्रो रेल्वेंचे निरीक्षण केलेल्या कॅनेडियन सरकारच्या खास वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने अगदी दहा पैकी दहा गुण दिले ही भारतीय अभियंत्यांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे. या प्रकल्पाच्या  उभारणीत अनेक अडचणी आल्या. त्या वेळचे रेल्वेमंत्री मधू दंडवते हे मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात होते. तेव्हा फडके यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना प्रकल्पाचे महत्त्व विशद करून सांगितले. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत तातडीने मिळाली व अल्पावधीतच हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने निघाला.

       पावसाळा लागल्यामुळे मेट्रोच्या खड्ड्यात पाणी जाऊ नये म्हणून रस्त्यात भिंती उभारल्या होत्या. भिंतीबाहेर भरपूर पाणी साचले. रस्त्याच्या शेजारील दुकानांत पाणी घुसले आणि संतप्त लोकांनी भिंती पाडून टाकल्या. मेट्रो रेल्वेच्या बोगद्यात पाणी घुसले. गाळ साचला व इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडल्या. त्यांनी पुन्हा बोगद्यातले पाणी व गाळ काढला, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बदलली.

        इंदिरा गांधी यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन होणार होते, पण त्याच वेळी त्यांची हत्या झाली. परंतु तेव्हा अभियंत्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला न बोलवता या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. देशातला हा पहिला प्रकल्प असेल, की ज्याचे उद्घाटन अभियंत्यांनी केले. ही रेल्वे सुरू होऊन २५ वर्षे झाली तरी एकही अपघात झाला नाही, हेच या प्रकल्पाच्या यशस्वितेचे उदाहरण आहे.

         गोविंद फडके यांची नेमणूक नंतर वेस्टर्न रेल्वेच्या प्रमुखपदी मुख्य अभियंता म्हणून झाली. १९९२ साली  ते नॉर्थ ईस्ट फ्राँटीयर रेल्वेच्या महाव्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही मुंबईतील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या प्रकल्पाचे प्रकल्प सल्लागार म्हणून त्यांनी चार वर्षांपर्यंत काम केले.

         वरील रेल्वे स्थानकांवर रंगीबेरंगी काचा लावून सूर्याचा वेगवेगळ्या रंगांतला प्रकाश पडल अशी त्यांची अभिनव रचना करण्यात आली. या संकल्पनेचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आले. सध्या गोविंद फडके पुण्यातच निवासाला असतात.

- दत्ता कानवटे

 

 

 

फडके, गोविंद नारायण