Skip to main content
x

फडके, नारायण सीताराम

     तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापक असलेल्या, मराठीप्रमाणे इंग्रजीतही लेखन करणार्‍या, अनेक कला व क्रीडा प्रकारांत रस घेणार्‍या नारायण सीताराम फडके यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी कर्जत, जि. अहमदनगर, महाराष्ट्र येथे झाला. वडिलांची फिरतीची सरकारी नोकरी असल्याने निफाड, बार्शी इत्यादी ठिकाणी प्राथमिक शिक्षण. इ.स. १९०४मध्ये वडिलांची पुण्यात बदली झाल्यावर नूतन मराठी विद्यालयामधून शालान्त परीक्षा (मॅट्रिक) व फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. व एम.ए. न्यू पुना कॉलेजात प्राध्यापक म्हणून १९१६मध्ये दाखल झाले.  त्यांचा पहिला विवाह १९२० मध्ये झाला. महात्मा गांधींच्या आवाहनानुसार स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांनी प्राध्यापकीचा त्याग केला. नंतर सेन्ट स्टीफन्स महाविद्यालय, दिल्ली, सिंध, हैद्राबाद व नागपूर येथील महाविद्यालयांत काम केले. काही काळ सक्तीची बेकारी अनुभवली. त्यामुळे अस्थिरता आली. मात्र कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात इ.स. १९२६ मध्ये रूजू झाल्यानंतर तेव्हापासून स्थिरता व १९५१मध्ये निवृत्ती घेतली. १९५१पासून पुण्यात कायमचे स्थायिक झाले. अंजली वार्षिकाचे व प्रकाशन, झंकार साप्ताहिकाचे संपादन इत्यादी विविध प्रकारचे कार्य त्यांनी केले.

      फडके यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा विचार करता, ते काहीसे स्वतःतच रंगलेले व स्थिर झालेले असून त्यात नंतर फारसा बदल झालेला दिसत नाही. जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्थिर नव्हे तर अधिकच दृढ झाला. त्यांच्यामध्ये व तत्कालीन महत्त्वाचे  कादंबरीकार वि.स.खांडेकर यांच्यात प्रदीर्घकाळ चाललेल्या ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या वादात त्यांनी कलेची एक बाजू सतत लावून धरली. त्यामुळे तत्कालीन भारतातील साहित्यावरचे साम्यवादी विचारसरणीचे सावट काहीसे दूर होऊन मराठी साहित्य व कला प्रांतातील वातावरण मुक्त व मोकळे राहण्यास मदत झाली. कलेच्या स्वायत्ततेच्या कल्पनेच्या संदर्भात त्यांनी साहित्यात राजकीय व्यक्ती नकोत हा आग्रहही धरला व कोल्हापूर येथे १९३२ मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असल्याने त्यावर बहिष्कारही घातला. आज साहित्य क्षेत्रावर राजकारण्यांची जी कुरघोडी दिसते, त्या पार्श्वभूमीवर फडके यांचा बाणेदारपणा उठून दिसतो. अशीच भूमिका संततीनियमनाच्या आचाराबाबत त्यांनी घेतली व तत्त्वासाठी नोकरीचा त्याग करून काही काळ सक्तीची बेकारी पत्करली.

     युगप्रवर्तक कादंबरीकार-

     फडके यांनी सर्वच वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केले. कादंबरीमध्ये ‘फडके-खांडेकर यांचे युग’ असा एक अर्थपूर्ण प्रयोग केला जातो. हरिभाऊंच्या पाल्हाळीक, काहीशा बोजड भाषेतल्या व शैलीतल्या मराठी कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूप दिले. विशेषतः बोलीभाषेला जवळची असणारी सुटसुटीत, सोपी भाषा दिली. त्यांच्या कादंबर्‍यांचीच संख्या ७४ आहे. या कादंबर्‍यांतून त्यांनी भारतातील सामाजिक, राजकीय चळवळी व घटना यांना स्थान दिले. गांधीप्रणित स्वातंत्र्याची चळवळ ते काश्मीर, हैद्राबाद, सुभाषबाबू व सावरकर विचारप्रणाली या सर्वांवर त्यांनी ‘प्रवासी’, ‘निरंजन’ ह्या कादंबर्‍या व काँग्रेसच्या विचारप्रणालीवर ‘शोनान’, ‘तुफान’, ‘अस्मान’ या आझाद हिंद चळवळीवरील कादंबर्‍या लिहिल्या. साहित्याप्रमाणेच संगीत, क्रिकेट, चित्रकला, शिल्पकला इत्यादी ललित कलांचाही त्यांनी व्यासंग केला व मराठी वाचकांना वेळोवेळी पाश्‍चात्त्य साहित्यकृतींचा व अन्य कलांचा परिचय करून देऊन त्यांची अभिरुची समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.

     १९२५ मध्ये त्यांची ‘कुलाब्याची दांडी’ ही पहिली कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि १९७८च्या दिवाळी अंकात त्यांची अखेरची ७४ वी कादंबरी ‘हेमू भूपाली’ प्रकाशित झाली. १९२५ ते १९४४  हा पहिला कालखंड कादंबरीच्या विकासाचा होता. त्यात त्यांनी विषयाचे, रचनेचे अनेक प्रयोग केले. तत्कालीन कालखंडातील राजकीय व सामाजिक घडामोडी, यांबरोबरच त्यांनी मानसशास्त्रीय समस्यांचाही उपयोग केला. त्यातून त्यांचा ‘उद्धार’, ‘इंद्रधनुष्य’, ‘खेळणी’ इत्यादी कादंबर्‍यांचे लेखन झाले. त्यांनी आपल्या कादंबरी. तत्कालीन कादंबरीकार खांडेकर व माडखोलकर यांनाही लोकप्रियतेत मागे टाकले व आपल्या तंत्राचा व रचना-कौशल्याचा तत्कालीन कादंबरीवर प्रभाव टाकला. कादंबरी म्हणजे फडक्यांचीच असे एक समीकरण त्यांनी निर्माण केले.

     त्यांच्या कादंबरीच्या दुसर्‍या कालखंडात (१९४४ ते १९७८) त्यांच्या कादंबरीचा केवळ विस्तार झाला. या कालखंडातही विषयाचे नाविन्य त्यांनी जपले. फडक्यांच्या कादंबरी-लेखनात विषयाचे नावीन्य, तंत्राची विविधता, प्रयोग व भाषेतील उत्तरोत्तर वाढत गेलेली सफाई इत्यादी गुण असूनही तिचा या कालखंडात संख्यात्मक विस्तार झाला, मात्र गुणात्मक विस्तार फारसा झाला नाही. पण फडके यांचे लेखन त्यांच्या पूर्वीच्या सर्व वैशिष्ट्यांसह अखेरपर्यंत चालू राहिले.

     फडके यांनी कथालेखनही विपुल प्रमाणात केले ‘मेणाचा ठसा’ ही त्यांची पहिली कथा (१९१२). १९२५ ते १९४० हा त्यांचा बहराचा काळ. ‘प्रतिभासाधन’मध्ये त्यांनी लघुकथेचे मंत्र व तंत्र उलगडून दाखवले व त्यानुसार स्वतः कथालेखनही केले. प्रारंभी ‘रत्नाकर’, ‘यशवंत’ व नंतर ‘किर्लोस्कर’ वगैरे नियतकालिकांतून त्यांनी मराठी कथेचे पाल्हाळीक, संपूर्ण सचित्र गोष्टीचे स्वरूप बदलून तिला इंग्रजीतील पो, मोपांसा, ओ. हेन्री इत्यादी कथालेखकांच्या परिशीलनातून एक आधुनिक व रेखीव स्वरूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कादंबरीप्रमाणेच तिची खेळकर, सुटसुटीत भाषा व शैली त्यांनी घडवली. आधुनिक मराठी लघुकथेचे श्रेय खांडेकरांपेक्षा फडक्यांनाच दिले पाहिजे, असे  गंगाधर गाडगीळांनी म्हटले. मात्र हे श्रेय देत असतानाच वाचकांची खुशामत करण्याची व तिचे जीवनानुभव मर्यादित करण्याचे अपश्रेयही त्यांनाच दिले पाहिजे असेही नमूद केले. फडके यांची कथा ही ‘Sleek American Magazine Story’ होती व जीवनातील खोल दुःखे व अनुभव व्यक्त करण्याचे तिने टाळले व दोन घटका वाचकांचे हलक्या-फुलक्या मनोरंजन करण्याचे माफक ध्येय तिने डोळ्यासमोर ठेवले. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या ‘माणूस जगतो कशासाठी? सारख्या काही कथा याला अपवाद आहेत. मराठीतील संपूर्ण सचित्र गोष्टीपासून आधुनिक लघुकथेपर्यंतच्या विकासाच्या प्रवासात फडके यांचा वाटा लक्षणीय आहे.

      लघुकथेबरोबरच लघुनिबंधाचा ‘गुजगोष्टी’ हा वेगळा वाङ्मयप्रकार त्यांनी इंग्रजीतील ‘रॉबर्ट लिंड’, ई.व्ही.ल्यूकस, चेस्टरटन वगैरेंच्या लघुनिबंधांच्या धर्तीवर मराठीत आणला व त्याची पुढे खांडेकर, कणेकर, ते ना.मा. संतांपर्यंत एक परंपरा निर्माण झाली. पुढे मात्र व्यक्तिदर्शनापेक्षा त्यात प्रदर्शन वाढल्याने तो प्रकार अस्तंगत झाला.

     ‘प्रतिभासाधन’, ‘प्रतिभाविलास’, ‘लघुकथालेखन मंत्र व तंत्र’, इत्यादी समीक्षाग्रंथांतून त्यांचे समीक्षा-विचार व्यक्त झाला आहे. त्याचा प्रभाव समकालिनांवर व पुढच्या दोन पिढ्यांवर तरी पडला. मात्र त्यांची टीका ‘प्रतिभासाधना’च्या वेळी बनलेल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या व आवडी-निवडीच्या वर्तुळातच फिरत राहिली. त्यांनी अन्य वाङ्मयप्रकार हाताळले असले, तरी कादंबरीकार म्हणूनच त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली व यश लाभले. प्रा.कुसुमावती देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘त्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले, तरी त्यात खांडेकरांच्या चित्रणातील अवास्तवता व अतिरंजितपणा नाही किंवा माडखोलकरांची उग्र शारीरिकता नाही. त्यांच्या शैलीची सहजता व रुचिर सौंदर्यदृष्टी यांमुळे हे चित्रण विशेष आकर्षक होते.’ ‘उद्बोधन आणि मनोरंजन ही दोन सूत्रे फडके-पूर्व साहित्यामागे होती, त्यात पहिल्यांदाच बदल करून तिला केवळ मनोरंजनाच्या वाटेने नेण्याचे व तिच्यावरील सर्व प्रकारची बंधने झुगारून देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य फडके यांनी केले व मराठी कादंबरीच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. मात्र त्यामुळे तंत्रवादालाच महत्त्व मिळाले व कलेसाठी कला नव्हे तर शेवटी ‘कलेसाठी जीवन’ या भूमिकेत तिची परिणती झाली, हेही तेवढेच खरे.

     महाराष्ट्रातील गेल्या पन्नास वर्षांतील महत्त्वाच्या घटना, चळवळी व विचारप्रणाली यांचा त्यांनी आपल्या कादंबरी-लेखनासाठी उपयोग केला व स्वतःला काळाच्या मागे पडू दिले नाही. लघुनिबंध या वाङ्मय प्रकाराचे विलायती रोपटे त्यांनी जाणीवपूर्वक मराठीत रुजवले व वाढवले. एकीकडून हरीभाऊ आपटे व दुसरीकडून बा.सी.मर्ढेकर यांच्यामधील मोक्याच्या टप्प्यावर फडके उभे असून, त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांची तंत्रशुद्धता, आधुनिकता, अद्ययावतपणा, बांधेसूदपणा, विलोभनीय भाषा व शैली यांमुळे त्यांच्या नावाने मराठी साहित्यातील एक कालखंड नेहमीच ओळखला जाईल व हेच त्यांचे मराठी साहित्याला योगदान म्हणता येईल. त्यांना मिळालेल्या अनेक मान-सन्मानांत रत्नागिरी येथील साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद (१९४०), ‘पद्मभूषण’ (१९६२) हे प्रमुख आहेत.

- डॉ. प्रल्हाद वडेर

फडके, नारायण सीताराम