Skip to main content
x

फेल्डहौस, अ‍ॅन

     भारतीय साहित्य, तत्त्वज्ञान, भाषा, दैवते यांचा अभ्यास करणारी अनेक मंडळी आहेत, पण सातत्याने प्रतिवर्षी एकदोन वेळ अमेरिकेहून पुण्यात येऊन नवनवीन प्रकल्पांवर संशोधन करणार्‍या अ‍ॅन फेल्डहौस यांच्यासारखे खूपच विरळ. गेल्या चाळीस वर्षांत शेकडोंनी शोधनिबंध-ग्रंथ-प्रकल्प-प्रवास-फिल्डवर्कद्वारे मराठी संस्कृतीच्या सर्वांगांनी विचार करणारी ही ‘मराठीची लेक’ पाश्चात्त्य विद्वानांत आदरणीय ठरली आहे. वयाच्या विसाव्या वर्षी बी.ए. करीत असताना १९७० साली अ‍ॅन पुण्यात प्रथम आल्या आणि पुण्याच्या संस्कृतीच्या प्रेमात अडकल्या.

     १९७१ मध्ये मॅनहॅटनविले महाविद्यालयामधून बी.ए. झाल्यावर १९७६मध्ये युनिव्हर्सिटी पेन्सिल्व्हानियामधून पीएच.डी. झाल्या. त्यानंतर कोई महाविद्यालय, फोर्डहॅम विद्यापीठामध्ये पाच वर्षे प्राध्यापकी करून १९८१ ते १९८८ या काळात अरिझोना विद्यापीठात रिलिजअस स्टडीजच्या आठ वर्षे प्राध्यापिका होत्या. त्यानंतर हाइडेलबर्ग (जर्मनी), व्हीएन्ना (ऑस्ट्रिया), पॅरीस (फ्रान्स) जेरुसलेम (इस्रायल) आणि अमेरिकेत पेनसिल्व्हानिया या ठिकाणी अध्यापन केले. १९७९पासून प्रतिवर्षाला विविध प्रकल्पांच्या संशोधन-अभ्यासाच्या सुमारे बत्तीस शिष्यवृत्ती मिळवून २०११पर्यंत त्या जगभर हिंडल्या आहेत आणि नुकतीच २०११ ते २०१४ अशी तीन वर्षांची नॅशनल ग्रँट मिळवून महाराष्ट्रातील नद्या-पर्वत-वनराया यांचा जुन्या संदर्भग्रंथांद्वारे संशोधनात्मक अभ्यास करीत आहेत.

     गेली काही वर्षे लंडनच्या ब्रिटिश काउन्सिल ग्रंथालयाच्या हस्तलिखित संशोधनाच्या प्रकल्पावर त्या काम करीत आहेत. महाराष्ट्रातील मराठी हस्तलिखितांचा शोध, त्यांची विवरणात्मक सूची, त्यांची डिजिटल आणि फोटो आवृत्ती तयार करणे आणि महाजालावरही प्रचंड म्हणजे सुमारे दहा हजार ग्रंथांची लिखिते, तेराव्या शतकापासून आजतागायत माहिती दाखल करणे हे काम त्या पूर्ण करीत आहेत.

     मराठी हस्तलिखितांचा शोध घेण्यासाठी अनेक हस्तलिखित संग्रहालये, खासगी संग्रह, देवस्थाने, मठ-फड, परंपरागत ग्रंथ सांभाळणारे क्षेत्रस्थ यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. एकट्या पुणे शहरात त्यांना श्रीज्ञानेश्वरीची सव्वाशे हस्तलिखिते पाहावयास मिळाली आहेत. त्यांतील सर्वात जुने इ.स. १६९६ सालाचे आहे. त्याखेरीज अनेक मराठी संतांची (सुमारे तीस) चरित्रे- आत्मचरित्रे, यांच्या जुन्या पोथ्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या नावावर असणार्‍या चाळीस ग्रंथांचा शोध त्यांनी लावला आहे. अर्थातच या कामी त्यांना ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांचे सहकार्य मिळाले आहे.

     डॉ. अ‍ॅन यांच्या संशोधनाची सुरुवात प्राचीन मराठीच्या महानुभाव संप्रदायापासून झाली. डॉ.शं.गो. तुळपुळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यातूनच महानुभवांचा सूत्रपाठ (१९८३), रिद्धीपूरच्या दैवताचे कार्य (१९८४), वॉटर अँड वुमनहूड, रिलीजन मीनिंग ऑफ रिव्हर्स इन महाराष्ट्र (१९९५), कनेक्टेड प्लेसेस, रिजन पिलग्रिमेज अ‍ॅन्ड जिओग्रफिकल इमॅजिनेशन इन महाराष्ट्र (२००३) ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत.

     त्यांनी अभ्यासासाठी महानुभाव साहित्य-तत्त्वज्ञान हा विषय १९७४ साली पक्का केला. ग्रंथालयातून पुस्तके वाचल्यावर, विविध मठांतील हस्तलिखिते पाहिल्यावर लक्षात आले की, या संप्रदायात खूप लिखाण झाले आहे, पण त्यांतील थोडेच इंग्लिशमध्ये आले आहे आणि जगाला माहीत झाले आहे. महानुभव वाङ्मय सांकेतिक लिपित होते. डॉ. अ‍ॅन यांनी सुरुवातीच्या काळात ती लिपीसुद्धा शिकून घेतली. महानुभाव सांप्रदायिकांच्या मठांतून हस्तलिखिते मिळवून अभ्यासली. केवढी जिद्द मराठी ज्ञानसंपादनाची! आणखी एक विशेष म्हणजे विद्यार्थिदशेत असताना पुण्याला येण्या-राहण्याच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी अ‍ॅन यांनी न्यूयॉर्कमध्ये वर्षभर टॅक्सी चालविण्याची जिद्द दाखविली. पुण्याला आल्यावर सुरुवातीला कोठावळे कुटुंबीयांच्या प्रेमळ आतिथ्याच्या आणि डॉ. तुळपुळे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचे ऋण त्या मान्य करतात.

     अ‍ॅन यांना लोकसंस्कृति-लोकधर्म-लोकदेवता या महाराष्ट्रीय वैशिष्ट्यांची उत्कंठा लागली होती. त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना वेगळी दृष्टी आणि शोधपद्धती हवी होती. जर्मनीतील या विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या गुरूला दक्षिणा म्हणून त्यांनी ‘विठोबा-म्हसोबा व खंडोबा’ या जर्मन ग्रंथाचे इंग्लिश रूपांतर करून प्रसिद्ध केले.

     डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी (इ.स. १००० ते १३५०) या ग्रंथाची कल्पना डॉ. तुळपुळे यांची. सुमारे आठशे पानांच्या या अपूर्व शब्दकोशाची शास्त्रीय आखणी १९८९ मध्ये अ‍ॅन यांनी सुरू केली. पेठे, गुणे, कोपरकर या सहकार्‍यांच्या मदतीने प्राचीन शब्द शोधणे आणि त्यांचा सर्वांगपूर्ण अभ्यास करून अर्थ मांडण्याचे काम अ‍ॅन यांनी केले. पुढे १९९४ मध्ये डॉ. तुळपुळे यांच्या निधनानंतर हे काम १९९९ मध्ये पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यापर्यंत सर्व परिश्रम अ‍ॅन यांनी घेतले. एकूण ६० फायलींमधून प्रत्येकी ३०० नोंदीचा त्यांनी अभ्यास केला. हे प्रचंड शिवधनुष्य पेलून त्यांनी प्राचीन मराठी अभ्यासातील प्राबल्य दाखविले आणि मराठीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी अरिझोनामध्ये प्राचीन मराठी अभ्यास मंडळही स्थापन केले. डॉ. सोन्थायमर यांनी गोळा केलेल्या धनगरी मौखिक परंपरेतील कथा-गीते त्यांनी इ.स. २००६मध्ये ग्रंथरूपाने प्रकाशित केली आणि संपादकत्वाची जबाबदारी पार पाडली. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकदेवता हा सोन्थायमर यांच्या ग्रंथाचे त्यांनी १९८९मध्ये भाषांतर केले होते. अलीकडे डॉ. रा.चिं. ढेरे यांचा ‘श्री विठ्ठल’ हा ग्रंथ इंग्लिशमध्ये रूपांतरित करून मराठीची अस्मिता-देवता जगभर पोहोचवली. न्यूयॉर्कमधील ऑक्स्फोर्ड विद्यापीठ प्रेसने २०११मध्ये या ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम पूर्ण केले.

     डॉ. अ‍ॅन फेल्डहौस यांनी सुमारे आठ ग्रंथ सहकार्यांच्या मदतीने संपादन करून प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये डॉ. लोथर लुट्झ स्मृतिग्रंथ (१९९४) मराठी साहित्य आणि धर्मपद्धतीतील स्त्रीदर्शन (१९९६), मराठी समाजातील स्त्री-दर्शन (१९९८), मराठी संस्कृतीतील घर (१९९८), डॉ. गुंथर सोन्थायमर स्मृतिग्रंथ (२००५), भारतातील प्रदेशवाद, राजकारण आणि संस्कृती (२००६) आणि दलित साहित्यासंबंधीचे डॉ. सोन्थायमर यांचे दोन ग्रंथ डॉ. फेल्डहौस ह्यांनी संपादित केले आहेत. त्यांमध्ये खंडोबा देैवतावरील शोधनिबंध (१९९७) आणि धर्म-साहित्य आणि कायदा यांवरील डॉ. सोन्थायमर यांचे शोधनिबंध (२००४) आहेत. याशिवाय डॉ. फेल्डहौस यांचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे विविध परिषदांमधून वाचलेले शोधनिबंध, गौरव-स्मृतिग्रंथांतून मांडलेले संशोधनात्मक विचार, विविध नियतकालिकांतील संशोधनात्मक लेखन, अशा निबंधांची संख्या सुमारे चाळीस होते. त्यांमधील काही विभाग असे.

१)  महानुभाव संप्रदाय, गुंडमराऊळ, महानुभावकालीन महाराष्ट्र, रिद्धिपूर, महानुभावांच्या यात्रा, महानुभवांचा कर्मठपणा.

२) मराठी संतविषयक लेखन, बहिणाबाई स्त्री-संत; मराठी स्त्री-संत, महाराष्ट्राच्या यात्रा-जत्रा, पुण्यभूमी महाराष्ट्र, गोंधळी परंपरा, महाराष्ट्रातील नद्या-उपवने, धार्मिक भूगोल, उत्सवी पुणे इत्यादी.

३) दैवते लोकदेवता, शिवदेवता, नद्या-पर्वत, महाराष्ट्रातील नदीदेवता, पैठण, मराठी धार्मिक संप्रदाय, गौतमी माहात्म्य इत्यादी.

     अलीकडील ३-४ वर्षे महाराष्ट्रातील नद्या-पर्वत यांचा जुन्या माहात्म्य ग्रंथांच्या आधारे संशोधन करण्याचा त्यांचा प्रकल्प चालू आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०१२मध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महाबळेश्वर, औरंगाबाद अशा वार्‍या करून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

     कै. दिलीप चित्रे यांच्या कार्याविषयी त्यांना खूप आत्मीयता होती. त्यांच्या काही आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्रीविठ्ठल’ आणि ‘पंढरपूर’ या ग्रंथांचे संपादन डॉ. झेलिस्ट यांच्या सहकार्याने त्या करीत आहेत. महाराष्ट्रातील जत्रा-यात्रा आणि लोकदेवता यांवरही त्या संशोधन करीत आहेत. ‘तेराव्या शतकातील महाराष्ट्र’ हा मोठा प्रकल्प त्यांनी नुकताच सुरू केला आहे.

     मराठी हस्तलिखितांची महाराष्ट्रातील परवड पाहून लंडनच्या ब्रिटिश काउन्सिल ग्रंथालयातर्फे अशा ग्रंथांचे मायक्रोफिल्मिंग आणि डिजिटायजेशन असा एक तीन वर्षांचा प्रकल्प त्यांनी नुकताच पूर्ण केला आहे. ज्या वेळी हे ग्रंथ विवरणात्मक सूचीमधून महाजालाच्या माध्यमातून अभ्यासकांसमोर येतील, त्या वेळी या संशोधन कार्याचे महत्त्व लक्षात येईल.

     भारत-महाराष्ट्र यासंबंधीचे गेल्या पंचेचाळीस वर्षांतील त्यांचे शोधकार्य पाहून अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. त्यामध्ये अमेरिकन अकादमी ऑफ रिलीजन, मेंबर ऑफ एशिअन स्टडीज कमिटी, बोर्ड डायरेक्टर साउथ एशिअन स्टडीज, अमेरिकन ओरिएन्टल स्टडीज, महाराष्ट्र कल्चर अ‍ॅण्ड सोसायटी कॉन्फरन्स फाउंडर मेंबर, सिलेक्शन कमिटी सदस्य, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन स्टडीज, एशिअन स्टडीजच्या उपाध्यक्ष, अध्यक्षा इत्यादी.

वा.ल. मंजूळ

फेल्डहौस, अ‍ॅन