Skip to main content
x

फेणाणी-जोगळेकर, पद्मजा सुनील

तुरस्र गायिका व संगीतकार पद्मजा सुनील फेणाणी- जोगळेेकरांचा जन्म मुंबईतील एका कलासक्त कुटुंबात झाला. फेणाणी हे सारस्वत ब्राह्मण कुटुंब मूळ कारवारचे. वडील शंकर फेणाणी हे व्यावसायिक चित्रकार व संगीताचे विशेष प्रेमी. आई शैलजा फेणाणी या हस्तकलाकौशल्यात निपुण. थोरल्या भगिनी उषा फेणाणी या उत्तम व्यक्तिचित्रणकार. बालपणापासूनच पद्मजावर अभिजात संगीताचे संस्कार होत गेले. त्यांच्या थोरल्या भगिनी श्रीमती उषा फेणाणींनीच त्यांना संगीताचे प्राथमिक धडे दिले.

पद्मजा फेणाणींचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयातून झाले. त्यानंतर रुपारेल महाविद्यालयामधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर, सोमय्या महाविद्यालयामधून सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली.

वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी वडिलांचे मित्र सुप्रसिद्ध सतारवादक अब्दुल हलीम जाफरखाँ यांनी पद्मजाचे गाणे ऐकल्यावर तिला शास्त्रीय गायन शिकविण्याचा सल्ला दिला. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांना गुरू लाभला नव्हता; परंतु ग्रहणशक्तीतून त्यांचे गायन विकसित होत होते. वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनच्या ‘किलबिल’ या कार्यक्रमातून त्या गायल्या. वयाच्या अठराव्या वर्षी, १९८० साली या एकाच वर्षात वेगवेगळ्या २५ स्पर्धांत भाग घेऊन त्यांनी प्रत्येक स्पर्धेत प्रथम पारितोषिक  पटकावले होते. सी. रामचंद्र, जयदेव आणि एस.एन. त्रिपाठी यांसारख्या मातब्बर संगीत दिग्दर्शक असलेल्या परीक्षकांकडून पद्मजाला १९८० साली ‘सुरसिंगार’चा ‘एस.डी. बर्मन’ पुरस्कार लाभला.

त्यांचे खर्‍या अर्थाने शास्त्रोक्त संगीत  शिक्षण १९८० सालापासून रीतसर सुरू झाले. उत्तर भारतीय रागदारी संगीतातील सुप्रसिद्ध गायक पं. जसराज यांच्या त्या गंडाबंध शागीर्द झाल्या. पं. जसराज यांच्याकडे शिकत असतानाच पं. हृदयनाथ मंगेशकरांची त्यांच्याशी ओळख झाली. पुढे हृदयनाथांच्याही त्या शिष्या झाल्या. चार वर्षांच्या पं. जसराजांच्या तालमीनंतर त्या सुप्रसिद्ध सारंगीवादक पं. रामनारायण यांच्याकडेही पाचसहा वर्षे शिकल्या.

दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या पलीकडे’ या कार्यक्रमातून त्या खर्‍या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचल्या. ‘शब्दांच्या पलीकडे’ या कार्यक्रमात १९८१ साली  शांताराम नांदगावकरांचे ‘धुंद मंद ही अशीच सांज उतरली’ हे अनिल मोहिल्यांनी संगीतबद्ध केलेले गाणे त्यांनी सादर केले. दूरदर्शनवर हे त्यांचे पहिलेच सादरीकरण होते. या गाण्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. लता मंगेशकरांनी तिच्या गाण्याबद्दल गौरवोद्गार काढले. यानंतर त्यांची सांगीतिक कारकीर्द झपाट्याने फुलत गेली. ‘निवडुंग’ या चित्रपटासाठी १९८४ साली ‘केव्हातरी पहाटे’ व ‘लव लव करी पातं’ ही दोन गाणी हृदयनाथांनी पद्मजाच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली.

उपजत चांगल्या काव्याची जाण, भावपूर्ण व उत्कटतेने गाणे व जात्याच सुरेल आवाज यांमुळे त्यांची गाणी काव्यासह रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. शास्त्रोक्त संगीतासह त्यांनी गझल, भावगीत, चित्रपटगीते, भक्तिगीते गायली असून, मराठीप्रमाणचे हिंदी, बंगाली, गुजराती, उर्दू, पंजाबी, कन्नड इत्यादी भाषांतीलही गाणी गायली आहेत.

त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिफिती व गीतसंच निघाले आहेत. पद्मजा फेणाणी यांच्या सांगीतिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे गायन असलेला ‘गीत नया गाता हूँ’ हा एच.एम.व्ही.ने काढलेला गीतसंच. स्वतः पद्मजा यांनीच या स्वरबद्ध केलेल्या रचना आहेत. विशेष म्हणजे या गीतसंचाच्या उत्पन्नाची रक्कम मानधन म्हणून न घेता त्यांनी पंतप्रधानांच्या आपद्ग्रस्त निधीस दिली होती. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्याही मुक्तछंदातील कवितांना त्यांनी चाली दिल्या होत्या.

याशिवाय ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’ आणि ‘घर नाचले नाचले’ या तीन गीतसंचांमधून मराठीतील दिग्गज कवींच्या कविता त्यांनी गायल्या आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस यांच्या कविता यात आहेत. याबरोबरच मराठी गझल, तसेच त्यांचे ‘हे गगना’, ‘हे स्पर्श चांदण्याचे’ आणि ‘मेघा रे’ हे  गीतसंचदेखील प्रसिद्ध झालेे आहेत. दाग, जिगर अहमद् फराज इत्यादींच्या गझलांचाही त्यांचा संच असून ‘रंग’ हा सूफी शैलीतील हिंदी गीतांचा संचही प्रसिद्ध झाला आहे.

भारतात, तसेच परदेशांतही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. ‘मंगलदीप’, ‘भक्तिरंग’, ‘महफिल ए गजल’, ‘तेरे सुर और मेरे गीत’ असे वैविध्यपूर्ण  कार्यक्रमही त्या सादर करतात. हृदयनाथ मंगेशकरांच्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमांतूनही त्या गात असत.

त्यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ (२००१)  हा पुरस्कार मिळाला. त्यांना ‘मियां तानसेन’ पुरस्कार (१९८५),  ‘भारत निर्माण’ पुरस्कार (१९८८), ‘आदर्श नागरिक’ पुरस्कार (१९८५), ‘माणिक वर्मा’ पुरस्कार (२०००) इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले. कुसुमाग्रजांनी त्यांना ‘स्वरचंद्रिका’ म्हणून संबोधले आहे.

‘सगुण-निर्गुण’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील सदरातून त्यांनी आपल्या सांगीतिक जीवनातील अनुभव अतिशय संवेदनक्षमतेने शब्दबद्ध केले आहेत. त्या १९८८ साली व्यवसायाने अभियंता असलेल्या सुनील जोगळेकरांबरोबर विवाहबद्ध झाल्या. कलावंताची संवेदनक्षमता जपतानाच त्या सामाजिक बांधीलकीही तेवढ्याच मानतात.

माधव इमारते

फेणाणी-जोगळेकर, पद्मजा सुनील