Skip to main content
x

फोंडके, गजानन पुरुषोत्तम

 

ण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी १९६ ०मध्ये घेतल्यानंतर १९६० ते १९८३ अशी २३ वर्षे मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या जीव-वैद्यकीय (बायोमेडिकल) विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून डॉ.बाळ फोंडके नोकरीस होते. १९६७ मध्ये त्यांना जीवभौतिकी (बायोफिजिक्स) विषयात लंडन विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली.

लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च संस्थेत त्यांनी अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून व अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्यकेंद्रात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचे १०० शास्त्रीय शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. वैज्ञानिक सदरे व स्तंभलेखन ते सातत्याने करतात.

व्यावसायिक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक सदरे व स्तंभ, विज्ञानविषयक लेख, विज्ञानकथा, वैज्ञानिक विषयावरील पुस्तके व वैज्ञानिक शोध निबंधांचे नामांकित लेखक, वैज्ञानिक नियतकालिकांचे संपादक असे डॉ.बाळ फोंडके यांचे मौल्यवान कार्य आहे.

फोंडके यांच्या १६५ विज्ञानरंजन कथा व १० नाटके प्रसिद्ध झाली आहेत. ‘चिरंजीव’ या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा १९९० चा पुरस्कार लाभला. ‘आपण असे का वागतो’, ‘प्रकाशाची किमया’, ‘उद्याचे वैद्यक’, ‘अमानुष’, ‘युरेका’, ‘विज्ञान परिक्रमा’, ‘विज्ञान संवादिनी’, ‘गुडबाय अर्थ’, ‘कॉम्प्युटरच्या करामती’, ‘शापित वरदान आणि विमाने अदृश्य होतात’, ‘गोलमाल’, ‘अखेरचा प्रयोग’, ‘(वि) चित्र विज्ञान’, ‘खिडकीलाही डोळे असतात’, ‘विज्ञान विशेष’ अशी त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

‘उद्याचे वैद्यक’ व ‘ढ कॉम्प्युटरच्या करामती’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. विज्ञान लोकप्रिय करणार्‍यांना देण्यात येणारे इन्साचे इंदिरा गांधी पारितोषिकही त्यांना देण्यात आले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे संचालक व प्रमुख संपादक म्हणून ते १९८९ पासून कार्यरत होते. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादनही ते करतात.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व इंडियन सायन्स काँग्रेसचा पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, एन.सी.एस.टी.सी.चा राष्ट्रीय पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोकण मराठी साहित्य संमेलनाचे २००४ मध्ये ते अध्यक्ष होते.२०१५ साली कोकण मराठी साहित्य परिषदेचा  ‘कोकण साहित्य भूषण पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे. 

विविध विषयांचे व्यासंगी, सुबोध मराठी लेखक म्हणून विज्ञानकथा लेखनाच्या नव्या दालनात डॉ.फोंडके यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

- श्याम भुर्के

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].