Skip to main content
x

फोर्जेट, चार्लस्

        चार्लस् फोर्जेट यांचा जन्म भारतात चेन्नई (मद्रास) येथे झाला. स्थानिक चालीरीती आणि बोलीभाषांचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. ते वेशांतर करून शहरात हिंडत असत. फोर्जेट यांचा वर्ण आणि शारीरिक ठेवण भारतीयांसारखी होती. त्यामुळे स्थानिक लोकांना समजून घेण्यासाठी त्याचा त्यांना खूप फायदा झाला. १८५५ ते १८६३ या आपल्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत कुशलतेने मुंबई शहराचे व्यवस्थापन सांभाळले. बीट सिस्टीम, रात्रीची गस्त घालणे या दोन्ही पद्धती फोर्जेट यांनीच मुंबई शहरात प्रथम सुरू केल्या. बेमालूम वेशांतर करून गुन्ह्यांचा तपास करणे यासाठी त्यांची ख्याती होती. त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर एलफिन्स्टन यांच्या कानावर त्यांच्या या कामगिरीची कीर्ती पोहोचली. एलफिन्स्टन यांनी त्यांना बोलावून मला वेशांतर करून फसवून दाखवा अशी पैज लावली. त्यांनी एलफिन्स्टन यांच्या घरात प्रवेश करून दाखवून ही पैज जिंकली. निवृत्तीनंतर ते इंग्लंडमधील वायकोम येथे स्थायिक झाले. परंतु त्यांच्या भारतीय रंगरूपामुळे त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका उपस्थित करून इंग्लंडच्या उच्चभ्रू लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता.

         मुंबई शहराबद्दल त्यांच्या मनात अत्यंत जवळीक निर्माण झाली होती. मुंबई शहराच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी आपल्या वायकोम मधील घराचे नाव ‘कावसजी जहांगीर हॉल’ असे ठेवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्या घराचे शाळेत  रूपांतर  करण्यात आले. अशा या विलक्षण चतुर प्रामाणिक अधिकाऱ्याने मुंबई शहराच्या पोलीस प्रशासनावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.

- संपादित

फोर्जेट, चार्लस्