राहुडकर, वासुदेव बळवंत
संशोधक आणि गरजू शेतकरी यामध्ये दुवा साधण्यासाठी विशेष डोळस प्रयत्न करणाऱ्या वासुदेव बळवंत राहुडकर यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पाळोदी गावी झाला. त्यांचे आजोबा विठोबा राहुडकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनाही डोळस व चिकित्सक जाज्ज्वल्य राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले. राहुडकर यांचे आजोबा शेतकरी होते. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामधील वाडेगाव या गावी त्यांची काळी व सुपीक शेतजमीन होती. ही जिरायती जमीन कापूस, ज्वारी आणि खरीप कडधान्यांचे अमाप उत्पादन देत असे. त्यांचे वडील नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून पदवीधर झाले होते. त्यांचा वारसा चालवत राहुडकर यांनीही याच महाविद्यालयातून १९४९मध्ये कृषी पदवी मिळवली. त्यांनी शासकीय नोकरी करण्याचा धोपटमार्ग सोडून इतर भावंडांबरोबर प्रत्यक्ष शेती करणे पसंत केले. त्यांनी आपल्या कृषी ज्ञानाचा फायदा इतरांना करून द्यायचे ठरवल्यामुळे १९४९ ते १९५२ या काळात खामगाव येथील गो. से. विज्ञान व कृषी विद्यालयात कृषी तंत्रज्ञानविषयक प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना शेतकामासाठी मार्गदर्शन केले.
पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.मध्ये प्रवेश घेतला आणि कृषिविद्या या विषयाची पदवी प्राप्त केली. केंद्रीय कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याशी त्यांचा परिचय झाला. राहुडकरांनी कृषिशास्त्र विषयावरची सहा पुस्तके लिहिली व नागपूरच्या उद्यम प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली. त्यापैकी एका पुस्तकाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचीच प्रस्तावना लाभली. डॉ. देशमुख यांनी राहुडकरांच्या कामाचे महत्त्व ओळखून अमरावतीला अमेरिकन कापूस संशोधऩ अधिकारी या पदावर त्यांची नेमणूक केली, परंतु ही नोकरी अल्पकाळ टिकली. ते जुलै १९५५ रोजी नागपूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापकपदी रुजू झाले. तेथे त्यांनी कृषि-विस्तार या विषयाचे अध्यापन केले. याच काळात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा उपयुक्त पुस्तकांचे लेखन केले. सर्व कृषी महाविद्यालयांत कृषि-विस्तार हा नवीन विभाग १९५५मध्ये सुरू करण्यात आला होता. या विषयाचे १९५७मध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले. या विभागात ते ग्रामीण समाजशास्त्र, समाजसंशोधनाच्या पद्धती आणि संख्याशास्त्र हे विषय शिकवू लागले.
नागपूर विद्यापीठाने विद्यापीठातील दहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आर्वी खंडविकास संवर्गात ग्रामीण विकासाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत पाठवले होते. त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राहुडकर यांच्यावर सोपवण्यात आली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नावली तयार केली. त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करणे अपेक्षित होते. राहुडकर यांनी स्वतःसुद्धा या कामात भाग घेतला आणि आसपासच्या ग्रामसेवकांची माहिती नोंदवली. या माहितीचा त्यांना पुढील संशोधनासाठी फार उपयोग झाला. यशस्वी ग्रामसेवकांसाठी कोणत्या विशेष गुणधर्मांची आवश्यकता असते, या विषयावर त्यांनी स्वतःच प्रबंध लिहून नागपूर विद्यापीठाची एम.एस्सी. (कृषी) ही पदवी मिळवली. त्यांचा कृषि-विस्तार विषयावर पहिला शोधनिबंध १९५८ साली इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क सारख्या नामवंत नियतकालिकातून प्रकाशित झाला. त्यांना अमेरिकन सरकारची एक शिष्यवृत्ती मिळाली. त्याचा फायदा घेऊन त्यांनी कॅनसास विद्यापीठात नऊ महिनेच अभ्यास करून ग्रामीण समाजशास्त्र या विषयातील एम.ए.ची पदवी मिळवली. तेथून परत आल्यावर त्यांनी एम.एस्सी. (कृषी) या पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करायला सुुरुवात केली. नंतर त्यांची १९६२मध्ये पुण्याच्या कृषी संचालनालयात, कृषी माहिती अधिकारी या नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पुढील कृषि-विस्तार कार्याचा खरा प्रारंभ तेव्हाच झाला आणि नंतर त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. या काळात डॉ. राहुडकर यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य निर्माण केले. शेतकऱ्यांसाठी १९६५मध्ये ‘माहितीयुक्त शेतकरी’ हे कृषी मासिक सुरू केले. या मासिकाचे ते तीन वर्षे संपादक हाते. राहुडकर यांनी स्वतःचा शासकीय कार्यभार सांभाळून पुणे विद्यापीठातून १९६७मध्ये ग्रामीण समाजशास्त्र विषयासाठी अधिकृत मार्गदर्शक उपलब्ध नसतानाही चिकाटीने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. डॉ. राहुडकर यांची १९७२मध्ये नेमणूक डॉ. पं.दे.कृ.वि.त कृषि-विस्तार प्रमुख म्हणून झाली. त्यांनी नवीन इमारतीत कृषी प्रसार केंद्र स्थापन केले. तसेच विद्यापीठाचा स्वतंत्र छापखाना सुरू केला. त्यांनी ‘कृषी-पत्रिका’ हे कृषीविषयक माहितीचे नवीन मासिक सुरू करण्यात मोठा वाटा उचलला. त्यांनी शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती देण्यासाठी अनेक प्रकाशने विनामूल्य वितरित केली. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे ही सुरू केली. त्यांनी पिकांसाठी फिरता दवाखाना ही नावीन्यपूर्ण योजना राबवली. शेतकऱ्यांसाठी दैनंदिनी आणि कृषी दिनदर्शिका तयार करून छापण्याची त्यांची योजना ही भारतातील नावीन्यपूर्ण अशी पहिलीच योजना होय.
राहुडकर यांनी १९७५ ते १९७८ या काळात मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषि-विस्तार विभागप्रमुख म्हणून कार्य केले. ते १९७८मध्ये परत डॉ. पं.दे.कृ.वि.त संचालक, कृषि-विस्तार या पदावर रुजू झाले. ते याच विद्यापीठात १९८२ ते १९८४ या दोन वर्षांच्या कालावधीत अधिष्ठाता (कृषी) आणि संचालक, कृषी शिक्षण या पदावर कार्यरत होते. ते १९८४ अखेर तेथून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १९८५ ते ८६ या दोन वर्षांत भारत शासनाच्या पाटबंधारे विभागात मानद सल्लागार म्हणून कार्य केले. त्यांनी शेती विषयावर विविध लेख लिहिले आणि पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांनी कृषिशास्त्रावरील २०० पुस्तके आणि ५०००पेक्षा अधिक लेख लिहिले. त्यांनी लेखनासाठी अनेकांना प्रवृत्तही केले. यासाठी शिवाजी विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट. या सन्माननीय पदवीने गौरवले.
भारताला कृषिशास्त्राची दीर्घ परंपरा लाभली आहे. बरेचसे प्राचीन कृषीविषयक ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. दशरथशास्त्री यांनी संपादन केलेल्या मूळ संस्कृत ग्रंथ ‘कृषिशासनम्’च्या मराठी भाषांतराचे संकलन डॉ. राहुडकर यांनी केले. त्यांना १९८२मध्ये वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानाचा कृषी-साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९९२ आणि १९९४मध्ये मिळाले आहेत.