Skip to main content
x

राहुरकर, वसंत गजानन

     राहुरकर हे विख्यात प्राच्यविद्याविशारद वाग्वैद्य रा.ना. दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर करणारे पहिले विद्यार्थी. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘ऋग्वेदातील ऋषी’ (‘सीअर्स इन द ऋग्वेद’) हा प्रबंध पुढे विद्यापीठाने प्रकाशित केला. याआधी राहुरकरांनी संस्कृतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तका-वरच्या मार्गदर्शिका प्रसिद्ध केल्या होत्या. दांडेकरांनीच राहुरकरांना पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागात अधिव्याख्याता म्हणून नियुक्त केले.

     काही काळ राहुरकर हे डेक्कन महाविद्यालयातील ऐतिहासिक तत्त्वावर आधारित विश्वकोशात्मक संस्कृत कोशात कार्य करीत होते. पुढे पुणे विद्यापीठात संस्कृत विभागात संस्कृत विषयाचे अधिव्याख्याता, नंतर संस्कृत प्रगत अभ्यास केंद्रात प्रपाठक व अखेर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात संशोधक म्हणून काम करत होते. संस्कृत इतकाच त्यांचा अर्धमागधी, प्राकृत, जैनधर्म यांचाही अभ्यास होता. महाराष्ट्र व गुजरात या प्रांतांत भरलेल्या अनेक प्राकृत परिसंवादांत त्यांनी उत्तम शोधनिबंध सादर केले.

      धर्मानंद कोसंबी स्मृतिव्याख्यानात आयोजित केलेल्या पंडित दलसुखभाई मालवाणिया यांच्या परिचयपर लघुभाषणात त्यांनी आवर्जून ‘धम्मानंदचरिया’ वंशकाव्यातील गाथा उद्धृत केल्या. राहुरकरांनी प्राचीन भारतीय संस्कृतीवरही लेखन केले. ग.बा. पळसुले यांच्याबरोबर त्यांनी ‘भारतवाणी’ या संस्कृत नियतकालिकाच्या संपादनाची धुराही सांभाळली.

     राहुरकरांचे अन्य कार्य म्हणजे संस्कृतचा प्रसार. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठातर्फे उज्जयिनीला कालिदास वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेले असताना उज्जयिनीच्या विद्यार्थी परिषदेने त्यांचा गौरव करून त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजिले. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या विरोधात निदर्शने केल्याने वसंतरावांना कारावासाची शिक्षाही भोगावी लागली.

      वसंतराव हे अतिशय ऋजू स्वभावाचे, ममताळू, राष्ट्रसेवक होते. शि.प्र. मंडळींनी त्यांचे हे गुण लक्षात घेऊन त्यांना नियामक समितीवर मानाचे स्थान दिले.

— प्रा. मो.गो. धडफळे

राहुरकर, वसंत गजानन