Skip to main content
x

राजे, शैलजा प्रसन्नकुमार

     पूर्वाश्रमीच्या शकुंतला दत्तात्रय कोतवाल म्हणजेच शैलजा राजे यांचा जन्म मुंबईचा. त्यांनी कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली असून कथा, कादंबरी, ललितगद्य, बाल-साहित्य, अनुवाद, चरित्र असे साहित्याचे विविध प्रकार हाताळले आहेत. त्यांची १२०पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

     स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री-विषयक नियतकालिकांची संख्या वाढल्यामुळे ज्या लेखिकांच्या लेखनाला उत्तेजन मिळाले आणि विशेष लोकप्रियता लाभली त्यांपैकी एक शैलजाताई आहेत. बहुतेक कथा-कादंबर्‍या तारुण्यातील प्रेम, प्रेमाचा कैफ, स्वप्नभंग, विवाहबाह्य संबंध, निपुत्रिकाचे दुःख, मन एकापाशी आणि शरीर दुसरीकडे असल्यामुळे येणारी अगतिकता यांसारख्या विषयांभोवती गुंफल्या आहेत. कथानकाची साधीसोपी मांडणी आणि आयुष्यातले पेचप्रसंग सहजगत्या सोडविण्याची हातोटी, यांमुळे त्यांचे लिखाण रंजकतेकडे झुकते. घटनाप्रधानता, स्वप्नरंजन आणि आदर्शवाद हा त्यांच्या लिखाणाचा स्थायिभाव आहे. एकंदर ५३ कादंबर्‍या, ३९ कथासंग्रह, ४ ललितगद्य, २ चरित्रे, मुलांसाठीची सुमारे २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘स्वरवंदन’ (१९७०) हे ज्योत्स्ना भोळे यांचे नाट्यपूर्ण चरित्र आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘यज्ञ’ (१९६८) या कादंबरीसाठी भा.द.खेर यांच्याबरोबर त्यांनी सहलेखन केले. ‘वतन’ (१९७९) या चरित्रात्मक कादंबरीत त्यांनी रंगोबापू गुप्ते यांची सत्यकथा मांडली आहे. छत्रपती प्रतापसिंह राजांना न्याय मिळावा म्हणून आलवण नेसून ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणार्‍या रंगो बापूंची व्यक्तिरेखा रंगवताना त्यांनी घेतलेले परिश्रम जाणवतात. ‘तुळशीपत्र’ (१९७३) ही कादंबरी सावरकरांच्या येसूवहिनींवर लिहिली आहे. ‘खणानारळाची ओटी’ या ललितगद्यातून आई-मुलीचा पत्रव्यवहार समोर येतो. त्यामधून संसारात जमवून घेण्याचा उपदेश आई मुलीला करते.

     चमत्कृतिपूर्ण मांडणी, योगायोग, सुखद शेवट या लेखनवैशिष्ट्यांमुळे शैलजा राजे यांचे लेखन त्या काळात लोकप्रिय ठरले. त्यांच्या लेखनात पारंपरिक साचेबद्धता जाणवत राहते, तरीही काही आदर्श मूल्ये वाचकांच्या मनावर बिंबवण्याचे काम त्यांनी लेखनाद्वारे केल्याचे जाणवत राहते.

- मृणालिनी चितळे

राजे, शैलजा प्रसन्नकुमार