Skip to main content
x

राजगुरू, शरद नरहर

       पुरापर्यावरणातील योगदानाबद्दल खेतान स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविलेले डॉ. शरद नरहर राजगुरू यांचा जन्म पुणे येथे झाला. शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे येथे झाले. भूशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर जमशेदपूर येथील राष्ट्रीय धातू संशोधन प्रयोगशाळेत तांत्रिक साहाय्यक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. परंतु लवकरच पुण्यातील उच्च क्षमता स्फोटक कारखाना काही काळ व नंतर नागपूर येथील खंडेलवाल फेरो अ‍ॅलॉइज येथे काही वर्षे त्यांनी काम केले.

     मात्र पुढे राजगुरू यांनी सरकारी नोकरशाही संघटनांच्या कार्यपद्धतीमुळे हताश होऊन नोकरी न करण्याचा निर्णय घेतला व विनोबा भाव्यांप्रमाणे देशसेवा करावी या विचाराने प्रेरित होऊन कोणालाही न सांगता, नागपूरचा निरोप घेऊन, त्यांनी विनोबा भावे यांचा वर्ध्याचा आश्रम गाठला. विनोबा भावे यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. तीन दिवस विनोबा भाव्यांचा सहवास त्यांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला.

     त्यानंतर १९६० साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेतील पुरातत्त्व विभागात पर्यावरणीय पुरातत्त्वाचे व्याख्याता म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. त्यापूर्वी पुरातत्त्व विभागाचे त्या वेळचे प्रमुख व नंतर ज्यांनी पुरातत्त्व विभागाला जागतिक मान्यता मिळवून दिली, त्या प्रा. हंसमुख सांकलिया यांच्याकडे १९५८ साली त्यांनी पीएच.डी.च्या कामाला सुरुवात केली. भीमा खोऱ्यातील मुळा-मुठा नदी प्रणालीच्या उत्तर चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय इतिहासावर त्यांनी संशोधन करून आपला प्रबंध सादर केला.

    खडक आणि मातीच्या अभ्यासावरून त्यांनी पुरापर्यावरणीय अनुमान काढले. भारतातील जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये त्यांनी चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय घडामोडी व पर्यावरणीय पुरातत्त्वावर क्षेत्रीय संशोधन आणि समन्वेषण केले. याशिवाय महाराष्ट्रातील नेवासा, इनामगाव, नायकुंड, वाळकी; राजस्थानातील डिडवाना, बालाथल; सौराष्ट्रातील कुंतासी, पाद्री; मध्यप्रदेशातील समनापूर, कर्नाटकातील हुंसगी येथील उत्खननात त्यांनी भूपुरातत्त्वज्ञ म्हणून भूमिका निभावली. याव्यतिरिक्त, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व एम.एस. विद्यापीठ, वडोदरा यांच्यातर्फे होणाऱ्या उत्खननातही त्यांनी सल्लागार म्हणून काम केले.

     १९७३-७४ साली कॅनबरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठातील जैविक भूगोल आणि भू-आकृती विज्ञान विभागात व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करीत असताना, मध्य ऑस्ट्रेलियन वाळवंटात ऑस्ट्रेलियातील त्या वेळचा सर्वात जुना मानव ‘मंगोमॅन’चा शोध लावणाऱ्या पथकात ते होते. युरोप, मध्यपूर्वेकडील देश, दक्षिण आशियातील देश, चीन, जपान, कॅनडा, बांगलादेश इत्यादी देशांना भेट देणारे भारतातील ते एकमेव भूपुरातत्त्वज्ञ आहेत. चीनला ते संयुक्त राष्ट्र पर्यावरणीय प्रकल्पांतर्गत फेलो म्हणून गेले होते.

     १९९३ साली ते पुण्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था, डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर संशोधन संस्थेचे सहसंचालक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी हिरोशिमा विद्यापीठाबरोबरचा, प्रवरा नदीचे पुरापर्यावरण आणि ताम्रपाषाण संस्कृती यांविषयीचा प्रकल्प निवृत्तीनंतरही पूर्ण केला. पुण्यातील प्रागैतिहासाचा मागोवा घेणे व उघड होणाऱ्या पुराव्यांचे जतन व्हावे यांसाठी निवृत्तीनंतरही ते कार्यरत आहेत.

     राष्ट्रीय विज्ञान अकादमी, अलाहाबाद, भारतीय विज्ञान अकादमी, दिल्ली व विज्ञान अकादमी, बंगलोरचे ते फेलो आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये त्यांचे सुमारे ४०० शोधनिबंध  प्रसिद्ध झाले असून डिडवाना - राजस्थान येथील संशोधन व कुप्पगल - बेल्लारी येथील संशोधनावर त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

डॉ. सविता घाटे

राजगुरू, शरद नरहर