राजहंस, नारायण एकनाथ
नागपूर जिल्ह्यामध्ये संशोधनात्मक गोसेवेची मुहूर्तमेढ रोवून शेतकर्यांच्या मनामध्ये गोपालनाचे महत्त्व रुजवण्याचे प्रमुख कार्य नारायण एकनाथ तथा दादासाहेब राजहंस यांनी केले. मुळातच शेतीची आवड व शेतीचा सर्वांगीण विकास हेच जीवनाचे ध्येय असल्याने त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या नोकरीचा संपूर्ण सेवाकाळ हा कृषी व ग्रामीण विकास या खात्यांमध्ये पूर्ण केला. त्यांनी १९४८ ते १९८४ या तीन तपांच्या सेवाकाळात कृषि-अधिकारी ते उपसंचालक असा महत्त्वाच्या पदांचा टप्पा पूर्ण केला.
गोविज्ञान अनुसंधान केंद्र, नागपूर येथे अविरत कष्ट करून गोमूत्राचे जागतिक एकस्व (पेटंट) मिळवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. गोपालन करताना आपल्याकडील गोवंशापासून आदर्श गोवंश कसा सिद्ध करता येईल या दृष्टीने गेली १२ वर्षे ते सतत प्रयोगशील आहेत. या प्रयोगशील कार्याची दखल घेऊन त्यांना रा. स्व. संघातर्फे अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आला. त्यांना विश्वमंगल गोग्राम यात्रेच्या निमित्ताने गोवंशावरील अभ्यासासाठी १७ जानेवारी २०१० रोजी सन्मानपत्र देण्यात आले. याशिवाय त्यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे ७५ कृषी स्वयंसाहाय्यता महिला गटांची स्थापना करून १२०० महिलांना स्वयंपूर्ण करण्यात यश मिळवले. त्यांनी लिहिलेले ‘खतांचा समतोल व एकात्मिक वापर’ हे पुस्तक शेतकर्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरले. त्यांनी पडीक जमिनींवर वृक्षारोपण करण्यासाठी स्वयंसहायता गटाच्या ५ रोपवाटिका निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील रेंगेपार या एकाच गावामध्ये १७५ गोबरगॅस संच निर्माण केले. शासकीय स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील बिनकठड्यांच्या सर्व विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्यात यश मिळवले.
- मिलिंद कृष्णाजी देवल